News Flash

Google I/O 2018: भटकंती सोप्पी होणार… गुगल मॅप्सवर हे पाच भन्नाट फिचर्स येणार!

ग्रुपने भेटणे असो किंवा एखाद्याला पोहचायला किती वेळ लागेल या संदर्भातील माहिती असो किंवा हॉटेल रेटिंग असू द्यात सगळं काही असणार आहे गुगल मॅप्समध्ये.

Google I/O 2018: भटकंती सोप्पी होणार… गुगल मॅप्सवर हे पाच भन्नाट फिचर्स येणार!
गुगल मॅप्स अपडेट होणार

गुगलने पुन्हा एकदा स्मार्टफोन युझर्सला खास भेट दिली आहे. कॅलिफोर्नियामध्ये सुरु झालेल्या गुगल आयओ २०१८मध्ये गुगलने अनेक महत्वाच्या घोषणा केल्या. त्यापैकी सर्वसामन्यांना सर्वात उपयोगी ठरणारी घोषणा म्हणजे अपडेट होणाऱ्या गुगल मॅप्सबद्दल. भारतीयांकडून सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या गुगलच्या सोयींपैकी एक असणारी गुगल मॅप्सची सुविधा अपग्रेड होणार आहे. नवीन अपडेट्समुळे गुगल मॅप्स वापरण्यास अधिक सोप्पे आणि खाजगी होणार असल्याने युजर्सला आता गुगल मॅप्सच्या सहाय्याने भटकंती करणे जास्त सोयीस्कर ठरणार आहे. जाणून घेऊयात गुगलने मॅप्समध्ये केलेले पाच महत्वपूर्ण बदल

> फॉर यू टॅब

या नवीन फिचरमुळे तुमच्या आजूबाजूच्या परिसरामधील मोठे सोहळे आणि कार्यक्रमांची माहिती तुम्हाला एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. उदाहर्णार्थ तुम्हाला तुमच्या परिसरामधील एखाद्या भन्नाट कॅफेबद्दल माहिती हवी असल्यास तुम्ही या फॉर यू टॅबचा उपयोग करु शकता. तुम्ही राहत असलेल्या परिसरातील सर्वाधिक चर्चेत असणारी कॅफे आणि भेटण्यांच्या ठिकाणांची माहिती तुम्हाला हा टॅब ओपन केल्यावर गुगल मॅप्सवर पत्त्यासहीत उपलब्ध होईल. समाजमाध्यमांवरील लाईक्स आणि चर्चांच्या आधारावर या कार्यक्रमांचे रेटिंगही फॉर यू टॅबमध्ये दाखवले जाईल. या रेटिंगमुळे कार्यक्रमाचा दर्जा निश्चित करण्यास युझर्सला मदत होईल.

> गुगल प्लॅनिंग

भटकण्याचा प्लॅन असो किंवा एखाद्या लग्नाला जाण्यासाठी एखाद्या नाक्यावर भेटणे असू द्यात. नेहमी फोनवरून ‘अरे कुठे उभा आहेस?’, ‘नक्की कुठे यायचयं?’, ‘काय? असलं काही लॅण्डमार्क इथे दिसतं नाहीय’ अशा अनेक प्रश्नांचा पाऊसच पडतो आणि अनेकदा भेटण्याच्या प्लॅनमध्येच कंटाळा येतो. मात्र यापुढे तुम्हाला गुगल मॅप्समधील ग्रुप प्लॅनिंग हे फिचर वापरून गुगल मॅप्सवरच कोण कुठे आहे हे समजू शकेल. ज्या जागी भेटायचे आहे त्या जागेवर गुगल मॅप्सवर प्रेस करून ठेवायचे. त्यानंतर ती जागा शॉर्टलिस्टेट करुन ठेवल्यास तुम्ही कुठे आहात हे गुगल मॅप्स वापरणाऱ्या मित्रमैत्रिणींना दिसेल. त्यानंतर तिथेच तुम्हाला चॅट करण्याचा पर्यायही उपलब्ध असेल. सध्या चॅट करण्यासाठी गुगल मॅप्सचा टॅब बंद करावा लागतो मात्र यापुढे गुगल मॅप्सवरच चॅट करण्याची सोय उपलब्ध होईल. तसेच हॉटेल बुकिंग आणि टॅक्सी बुकिंगसाठीही तुम्ही ग्रुप प्लॅनिंगचा उपयोग करु शकता.

> गुगल लेन्स

गुगल मॅपवरील स्ट्रीट व्ह्यू आणि इतर डेटा आता मोबाईलच्या कॅमरा लेन्सच्या माध्यमातून वापरता येणार आहे. म्हणजेच कॅमेरा ऑन ठेऊन अधीक सोप्प्या पद्धतीने भटकंती करण्यासाठी गुगल स्ट्रीट व्ह्यूचा वापर करता येणार आहे. व्हच्यूअल असिस्टंटला कॅमेराची जोड देऊन तुमच्या आजुबाजूच्या परिसरातील महत्वाच्या ठिकाणांची माहिती तुम्हाला मॅप्सवर गुगल स्ट्रीट व्ह्यूच्या माध्यमातून उपलब्ध होईल.

> ईटीए (एक्झॅक्ट टाइम ऑफ अरायव्हल)

‘आलोच रे.. पाच मनिटांमध्ये’, ‘अरे इथेच आहे’ अशा बतावण्या मारणाऱ्यांसाठी हे फिचर जरा धोकादायक ठरू शकते. कारण या फिचरमुळे यापुढे अशा लेटकमर्सला खोटं बोलता येणार नाही. इटीए फिरचमुळे गुगल असिस्टंच्या सहाय्याने एखाद्या ठिकाणी पोहचायला समोरची व्यक्ती सध्या कुठे आहे यावरून किती वेळ लागेल याचा अंदाज बांधता येणार आहे. यामध्ये प्रवासात येणारे ट्रॅफिक वगैरे सारखे अडथळ्यांचा वेळ समाविष्ट करुन निश्चित स्थळी पोहचण्यास येणाऱ्या व्यक्तीस किती वेळ लागेल हे समजू शकणार आहे.

> युआर मॅच स्कोअर

तुम्ही भेट दिलेल्या ठिकाणाला आता या पुढे गुगल मॅप्सवरच रेटिंग देता येणार आहे. मशिन लर्निंगचा वापर करुन एखाद्या ठिकाणाबद्दल मॅप्स वापरणाऱ्यांना आयती माहिती उपलब्ध करुन देण्यासाठी या फिचरचा समावेश गुगलने केला आहे. सोप्प्या भाषेत सांगायचे झाले तर एखाद्या हॉटेलला किंवा चित्रपटगृहाला आता गुगल मॅप्सवरच तुम्हाला रेटिंग देता येणार आहे.

गुगल मॅप्समधील ही सर्व फिचर्स पुढील दोन ते तीन आठवड्यांमध्ये गुगल मॅप्सच्या अॅण्ड्रॉइड तसेच आयओएस दोन्ही सिस्टीमसाठी उपलब्ध होतील. त्यामुळे आता गुगल मॅप्सचा आवाका वाढल्याने भटकंतीसाठी अनेक अॅप्स डाऊनलोड करण्याची गरज नाही असेच म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2018 10:09 am

Web Title: google io 2018 here are some key new features that are coming to google maps soon
Next Stories
1 माशांचे तेल संधिवाताविरुद्ध उपयुक्त
2 अँड्रॉइड ‘पी’ येतोय!
3 सेल्फ सव्‍‌र्हिस : ज्यूसरची देखभाल
Just Now!
X