मोबाईल वापरताना त्याच्या सुरक्षेबाबत काळजी घेणं आवश्यक असल्याचे आपण विविध माध्यमांतून सातत्याने वाचत असतो. मात्र प्रत्यक्षात वेळ येते तेव्हा आपल्याला अनेक गोष्टींची माहिती नसते. गुगल आणि अँड्रॉईडमध्ये आपल्याला आवश्यक असलेल्या अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. मात्र कधीकधी या सुविधा धोक्याच्या ठरु शकतात. नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार जीपीएस बंद केल्यावरही गुगलला आपले लोकेशन शोधता येणार आहे. आता हे कसे काय तर गुगलकडे अशी यंत्रणा आहे जी अँड्रॉईड फोनला सपोर्ट करते.

काही दिवसांपूर्वी गुगलव्दारे अशाप्रकारे जीपीएस बंद असेल तरीही लोकेशन दिसत असल्याचा आरोप अनेकांनी केला होता. आता तो आरोप गुगलने मान्य करत अॅण्ड्रॉईड स्मार्टफोन सातत्याने युजर्स लोकेशन ट्रॅक करत असतो असे म्हटले आहे. युजर्सने आपल्या स्मार्टफोनमधील लोकेशन आणि जीपीएस हे ऑप्शन बंद केले असतील तरीही हे लोकेशन दिसते, याबाबत स्पष्टीकरण देताना आपण ही त्रुटी दूर करू असे सांगितले आहे. या समस्येवर सध्या कोणताच मार्ग नसून कंपनी त्यादृष्टीने प्रयत्न करत आहे. तुम्ही फोन फॉरमॅट केला तरीही हे लोकेशन बंद होत नाही. मात्र अशाप्रकारे आपले लोकेशन शेअर होणे सुरक्षेच्यादृष्टीने धोक्याचे आहे.