16 November 2019

News Flash

‘शॉर्टकट’ रस्त्याच्या नावाने फसवणुकीला बसणार आळा, गुगल मॅप्सचं नवं फीचर

शहरातील नवीन प्रवासी आणि महिला यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे महत्त्वाचे फीचर

(संग्रहित छायाचित्र)

बऱ्याचदा ‘शॉर्टकट’ रस्त्याच्या नावाने प्रवाशांची फसवणूक करण्यात येते. चुकीच्या मार्गावरून जात असल्याची माहिती युजरला तातडीने मिळावी यासाठी गुगल मॅप्सलर लवकरच ‘ऑफ रूट अलर्ट’ हे नवं फीचर येणार आहे. सध्या याची चाचणी सुरू असून ही सुविधा भारतीय युजर्सला देणार असल्याची माहिती समोर आली आहे.  टॅक्सी अथवा कॅबमधून प्रवास करताना हे फीचर युजर्सना सर्वाधिक उपयोगी पडेल. या फीचरमुळे फसवणुकीला आळा घालता येणार आहे.

हे फीचर सध्या फक्त भारतीय युजर्ससाठी असेल अशी माहिती आहे.  याअंतर्गत युजरने गुगल मॅप्समध्ये आपला रूट फिड केल्यानंतर जर टॅक्सी वा कॅब चालक त्याशिवाय दुसर्‍या मार्गाने गेल्यास याची माहिती युजरला अलर्टच्या माध्यमातून कळणार आहे. एक्सडीए या टेक पोर्टलच्या वृत्तानुसार, ‘ऑफ रूट अलर्ट’ हे नवे फीचर टॅक्सी, कॅबमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन विकसित करण्यात येणार आहे. यानुसार,  निर्धारीत केलेल्या मार्गापेक्षा जर तुमची कॅब किंवा टॅक्सी 500 मीटरपेक्षा अधिक चुकीच्या रस्त्यावरून जात असल्यास तातडीने अलर्ट मिळेल. महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही हे महत्त्वाचे फीचर असणार आहे. याशिवाय काही दिवसांपूर्वीच गुगल मॅप्सने नवीन 3 फीचर्स लाँच केले आहेत.  जाणून घेऊ या 3 फीचर्सबाबत –

रिअल-टाइम बस –
आता गुगल मॅपवर तुम्हाला बसच्या प्रवासाची सगळी माहिती मिळेल. एखाद्या ठिकाणी पोहोचण्यासाठी किती वेळ लागणार याबाबतही कळेल. इतकंच नाही तर कुठे जास्त वाहतूक कोंडी आहे हे देखील समजू शकेल. गुगल लाइव्ह ट्रॅफिक डेटा आणि सार्वजनिक बस वाहतुकीचं वेळापत्रक यांच्या आधारे सर्व माहिती युजर्सना पोहोचवली जाईल.

ट्रेनचं लाइव्ह स्टेटस –
आता रेल्वेचं लाइव्ह स्टेटस पाहण्यासाठी तुम्हाला रेल्वेचं संकेतस्थळ किंवा अन्य अॅपचा वापर जाण्याची गरज नाही. कारण आता गुगल मॅपवरच तुमच्या ट्रेनबाबतची सर्व माहिती मिळणार आहे. सध्या केवळ लांबपल्ल्यांच्या गाड्यांसाठीच हे फीचर कार्यान्वित आहे. Where is my Train या अॅपच्या मदतीने कंपनीने हे नवं फीचर सुरू केलं आहे.

रिक्षासाठी नवं फीचर –
बस किंवा ट्रेनच्या प्रवासानंतर पुढील प्रवासाासठी रिक्षाचा वापर करणाऱ्यांना केंद्रीत करुन हे फीचर सुरू करण्यात आलं आहे. बस किंवा ट्रेन सोडल्यानंतर कोणत्या ठिकाणाहून रिक्षाचा प्रवास परवणारा असेल किंवा रिक्षाच्या प्रवासासाठी किती भाडं आकारलं जाणार अशाप्रकारची सर्व माहिती मिळेल. हे फीचर केवळ दिल्ली आणि बंगळुरुच्या युजर्ससाठी उपलब्ध असून लवकरच अन्य शहरांमध्येही ही सेवा सुरू करण्याचा गुगलचा प्रयत्न आहे.

First Published on June 13, 2019 11:46 am

Web Title: google maps new off route alert feature sas 89