Apple च्या अ‍ॅप स्टोअरमधून GPay सध्या गायब झाल्याचं दिसत आहे. याचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट असलं तरी Google Play डाऊनलोड करणाऱ्यांना हे अ‍ॅप दिसत नाहीये. असं असलं तरी ज्या युझर्सनं यापूर्वी हे अ‍ॅप आपल्या फोनमध्ये डाऊनलोड केलंय त्यांचं अ‍ॅप सध्या सुरू आहे. परंतु या अ‍ॅपचा वापर करताना मात्र ग्राहकांना अनेक समस्या भेडसावत आहेत.

गुगलनं दिलेल्या माहितीनुसार Google Pay मधील काही तांत्रिक समस्या दूर करण्यासाठी ते अ‍ॅप स्टोअरमधून काढून टाकण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. अँड्रॉईड युझर्सना मात्र हे अ‍ॅप वापरण्यात कोणतीही अडचण येत नसून ते प्ले स्टोअरवरदेखील उपलब्ध आहे. Google Pay हे अ‍ॅप वापरताना आयफोनच्या युझर्सना पैसे भरताना अडचणींचा सामना करावा लागू शकतो, असं गुगलनं म्हटलं आहे. सध्या यामध्ये असलेली तांत्रिक अडचण दूर करण्यावर काम सुरू असल्याचंही सांगण्यात आलं आहे. हे वृत्त प्रकाशित होईपर्यंत हे अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध नव्हतं. अ‍ॅप स्टोअरमध्ये हे अ‍ॅप पुन्हा आल्यानंतर एक त्याचं एक अपडेटही देण्यात येणार असल्याचं गुगलनं स्पष्ट केलं आहे.

यापूर्वी काही अ‍ॅप्स अ‍ॅप स्टोअरमधून हटवण्यात आली होती. आपल्या युझर्सना कोणत्याही प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागू नये यासाठी अ‍ॅपल काही तांत्रिक अडचणी असल्यास त्या दूर करण्यासाठी संबंधित अ‍ॅप हटवत असते. यामुळे किती ग्राहकांना समस्यांना सामोरं जावं लागत आहे याबाबत मात्र कंपनीनं कोणतीही माहिती दिलेली नाही. अ‍ॅपमध्ये कोणती समस्या होती आणि त्यामुळे किती युझर्सला समस्या होत आहे याबाबत कंपनीनं कोणतीही माहिती दिली नाही. लवकरच हे अ‍ॅप पुन्हा एकदा अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरमध्ये दिसणार असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे.