आघाडीची टेक कंपनी गुगल, आयफोनच्या ‘सफारी’ ब्राउझरसाठी तब्बल 1.5 बिलियन डॉलर्स म्हणजे जवळपास 1.15 लाख कोटी रुपये दर वर्षाला अ‍ॅपल कंपनीला देते. सफारी ब्राउझरमध्ये डिफॉल्ट सर्च इंजिन म्हणून गुगल दिसावं यासाठी कंपनी ही रक्कम मोजते. विशेष म्हणजे एवढी मोठी किंमत गुगल कंपनी फक्त युके या एका देशासाठी मोजते.

एखाद्याने आयफोनमधील सफारी ब्राउझर इंटरनेट सर्फिंगसाठी ओपन केल्यास त्याला गुगल सर्च इंजिन डिफॉल्ट दिसावं यासाठी कंपनी ही रक्कम मोजते. युके सरकारच्या ‘कॉम्पिटिशन अँड मार्केट ऑथोरिटी’च्या (UK government’s Competition and Markets Authority)एका रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे. ही किंमत फक्त एका देशासाठी आहे. जगातील अन्य देशांसाठी कंपनी किती पैसे अ‍ॅपलला मोजते याबाबत आकडेवारी अद्याप मिळालेली नाही. यापूर्वी 2014 मध्येही गुगलने अमेरिकेत डिफॉल्ट सर्च इंजिनसाठी अ‍ॅपलला 1 बिलियन डॉलर्स मोजल्याचं वृत्त आलं होते.

फायदा काय –
याहू, बिंग, डकडकगो अशा अनेक सर्च इंजिनप्रमाणेच गुगल हे एक सर्च इंजिन सर्व युजर्ससाठी उपलब्ध आहे. पण बहुतांश आयफोन वापरकर्ते सेटिंग्समध्ये जाऊन सर्च इंजिनची सेटिंग बदलत नाहीत. त्याचा थेट फायदा गुगलला होतो. त्यामुळे कंपनी इतकी मोठी रक्कम अॅपलला देते.