गुगलने काही वर्षापूर्वी मोबाईल मार्केटमध्ये एन्ट्री केली आणि अनेक बड्या कंपन्यांना टक्कर देत टेलिकॉम क्षेत्रात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. नुकतेच कंपनीने आपले आणखी २ नवीन मोबाईल लाँच करण्याची घोषणा केली असून लवकरच ते फोन ग्राहकांना उपलब्ध होतील. गुगलने एचटीसीसोबत आपण या फोनची निर्मिती केली असल्याचेही सांगितले आहे. पिक्सेल २ आणि पिक्सेल २ XL हे हायटेक फीचर्स असणारे स्मार्टफोन अॅपलला टक्कर देण्याची शक्यता तज्ञांकडून व्यक्त होत आहे. कंपनीने अधिकृतपणे अद्याप या दोन्हीही फोनच्या फिचरबाबत कोणतीही ठोस माहिती दिलेली नसली तरीही ती लिक झाली आहे.

पिक्सेल २ स्पेसिफिकेशन

या फोनमध्ये ५ इंचाची एचडी स्क्रीन आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ९३६ प्रोसेसर असेल असाही दावा करण्यात येत आहे. शिवाय ६४ जीबी (अंदाजे किंमत ४२ हजार रुपये) आणि १२८ जीबी (अंदाजे किंमत ४९ हजार रुपये) स्टोरेज असे दोन फोन लाँच केले जातील. पिक्सेल २ मध्ये ऑटो फोकस फीचर्ससह १२ मेगापिक्सेलचा सिंगल रिअर कॅमेरा असून 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा असेल असेही म्हटले जात आहे.

पिक्सेल २ XL स्पेसिफिकेशन

लिक झालेल्या रिपोर्टनुसार, या फोनमध्ये ६ इंचाची एचडी स्क्रीन आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८३६ प्रोसेसर असेल. याबरोबरच ६४ जीबी (अंदाजे किंमत ५५,७५० रुपये) आणि १२८ जीबी (अंदाजे किंमत ६२,२५० रुपये) स्टोरेज असे दोन पर्याय उपलब्ध असतील. या दोन्हीची रॅम ४ जीबी इतकी असेल. पिक्सेल २ XL मध्ये १२ मेगापिक्सेल सिंगल रिअर कॅमेरा आणि १२ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा असेल. रिअर कॅमेऱ्यात फेस डिटेक्शन आणि ऑटो लेझर फोकस हे विशेष फीचर्स मिळण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.

या दोन्ही फोनच्या बॅटरी बॅकअपविषयीच्या चर्चांना उधाण आले असून पिक्सेल २ मध्ये २७०० मिलीअॅम्पिअर्सची आणि पिक्सेल २ XL मध्ये २५२० मिलीअॅम्पियर्सची असेल असे बोलले जात आहे. याशिवाय फोनमध्ये फास्ट चार्जिंग फीचर असेल.