गुगलमुळे अनेक कामं सोपी झाली आहेत, गुगलने तुम्हाला अनेक सुविधा दिल्या पण त्यासोबतच तुमची अनेक खासगी माहितीही गुगलने स्वतःकडे ठेवली आहे. जर तुम्हाला वाटत असेल की ‘गुगल लोकेशन’ बंद केल्यानंतर तुम्ही कुठे आहात, कुठे जात आहात याची माहिती गुगलला मिळणार नाही तर तुम्ही चुकीचा विचार करताय. कारण तुमची परवानगी असो किंवा नसो पण दिग्गज कंपनी गुगल ही इंटरनेट वापरताना तुमच्या प्रत्येक कृतीवर लक्ष ठेवते. तुम्ही कधी-कुठे जातात याची सगळी माहिती गुगलकडे असते.

असोसिएटेड प्रेस(AP)या वृत्तसंस्थेने केलेल्या अभ्यासातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. यानुसार अॅन्ड्रॉइड आणि आयफोनमध्ये गुगलकडून अनेक सेवा पुरवल्या जातात. या सेवांचा वापर करण्यासाठी गुगल लोकेशनचा वापर गरजेचा आहे. जर तुम्ही पर्सनल सेटिंग्समध्ये जाऊन लोकेशन ऑफ केलं तरीही गुगलचं तुमच्यावर लक्ष असतंच, असा दावा प्रिंसटन युनिव्हर्सिटीत कंप्यूटर सायंसमध्ये रिसर्च करणाऱ्यांनी केला आहे. असोसिएटेड प्रेसच्या विनंतीनुसार प्रिंसटन युनिव्हर्सिटीकडून यावर अभ्यास करण्यात आला, त्यानंतर ही माहिती देण्यात आली आहे. लोकेशन हिस्ट्री ऑफ केल्यानंतर तुम्ही कुठे जात आहात याची माहिती गुगलचे काही अॅप साठवतात असं ठामपणे यामध्ये सांगण्यात आलं आहे. ही माहिती समोर आल्यानंतर जगभरातील तज्ञांनी चिंता व्यक्त केली असून कोट्यवधी लोकांच्या खासगी आयुष्यावर यामुळे परिणाम होऊ शकतो असं म्हटलं आहे.

तर, लोकेशन हिस्ट्री ऑफ केल्यानंतर तुम्ही कुठे जात आहात याची माहिती गुगलमध्ये राहत नाही. हे सत्य नाहीये. युजर्सना चांगली सेवा देण्यासाठी लोकेशनच्या पर्यायाचा वेगवेगळ्या प्रकारे वापर केला जातो, असं गुगलने म्हटलं आहे.

गुगलला कसं रोखायचं –

लोकेशन हिस्ट्री बंद करण्यासाठी सेटिंग्समध्ये जाऊन ‘वेब अॅंड अॅप अॅक्टिव्हिटी’ ऑफ करावं.