स्मार्टफोन्समध्ये मोठ्या साइजच्या फाइल्स शेअर करण्यासाठी अनेक युजर्स आतापर्यंत ShareIt किंवा Xender या अ‍ॅप्सचा वापर करत होते. पण नुकतेच भारताने ५९ चिनी अ‍ॅप्स बॅने केले, त्यामध्ये ShareIt आणि Xender चाही समावेश आहे. त्यामुळे युजर्स सध्या अशा फाइल्स ट्रांसफर करण्यासाठी दुसऱ्या अ‍ॅपच्या शोधात आहेत. अशा युजर्सना आता गुगलकडून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. गुगल सध्या एक नवीन फीचरची टेस्टिंग घेत असून याद्वारे मोठ्या साइजच्या फाइल्स काही सेकंदांमध्ये दुसऱ्या फोनमध्ये ट्रांसफर करता येणं शक्य होणार आहे.

गुगल लवकरच Nearby Share हे फीचर आणणार आहे. हे फीचर अ‍ॅपलच्या AirDrop फीचरप्रमाणे काम करतं. याद्वारे अँड्राइड युजर्स एका डिव्हाइसमधून अन्य डिव्हाइसमध्ये फाइल्स पाठवू शकतील. कंपनीकडून या डिव्हाइसच्या बीटा टेस्टिंगला सुरूवात झाली असून काही बीटा व्हर्जन वापरणाऱ्या युजर्सना ही फीचर उपलब्ध करुन देण्यात आलं आहे. हे नवीन फीचर Android 6 आणि त्यानंतरच्या पुढील सर्व अँड्रॉइड डिव्हाइसला सपोर्ट करेल. अ‍ॅपलच्या AirDrop द्वारे युजर्स कॉन्टॅक्ट्स आणि फोटो कोणत्याही एक्स्ट्रा सेटअपशिवाय सेंड करु शकतात. त्याचप्रमाणे गुगलचं हे नवीन फीचर अँड्राइड ग्राहकांना पर्याय देईल. androidpolice च्या रिपोर्टनुसार, फोटो, व्हिडिओ आणि लिंक्सही या फीचरद्वारे शेअर करता येतील.

ज्या युजर्सना हे फीचर वापरायचं असेल ते बीटा व्हर्जनमध्ये ते वापरुन बघू शकतात. यासाठी युजरला गुगल प्ले सर्व्हिसेसमध्ये बीटा टेस्टरसाठी साइन-अप करावं लागेल. क्विक अपडेटनंतर युजर्सना शेअर शीटमध्ये Nearby Share हा पर्याय दिसेल.