५९ चिनी अ‍ॅप्स बॅन केल्यानंतर आता सरकारकडून या अ‍ॅप्सना काही प्रश्नांची यादी पाठवण्यात आल्याचं समजतंय. येत्या तीन आठवड्यांमध्ये विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देण्यास त्यांना सांगण्यात आलं आहे. माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून जवळपास ७० प्रश्नांची यादी या अ‍ॅप्सना पाठवण्यात आली आहे.

‘टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून जवळपास ७० प्रश्नांची यादी पाठवण्यात आली आहे. टिकटॉक, हेलो आणि शाओमी यांसारख्या कंपन्यांना ही प्रश्नांची यादी पाठवण्यात आली असून त्यावर तीन आठवड्यात उत्तर देण्यास सांगण्यात आलं आहे. त्यात डेटा मॅनेजमेंटसारख्या विविध प्रश्नांची विचारणा करण्यात आली आहे.

जवळपास ७० प्रश्नांच्या यादीमध्ये कमकुवत सिक्युरिटी आणि अनधिकृत डेटा अ‍ॅक्सेसबाबतही उत्तर देण्यास सांगितलं आहे. विविध कंपन्यांकडून त्यांची रचना, डेटा संकलन प्रक्रिया याबाबतचे प्रश्न विचारण्यात आले आहेत. बंदी घातल्यामुळे सरकारसमोर आपली बाजू मांडण्याची मागणी या अ‍ॅप्सकडून केली जात असताना, आता सरकारने त्यांना ७० प्रश्नांची विचारणा केली आहे. भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने कुठली अ‍ॅप्स धोकादायक आहेत, कुठली धोकादायक नाहीत अशा बाबींबरोबरच भारतीय ग्राहकांचे व देशाचे हितसंबंध जपण्यात येत आहेत की नाही याची माहिती या प्रश्नांच्या उत्तरांमधून मिळणं सरकारला अपेक्षित आहे असं समजतंय.

दरम्यान, भारत-चीन सैनिकांमध्ये सीमेवर झालेल्या संघर्षानंतर राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचं सांगत भारत सरकारने ५९ चिनी अ‍ॅप्सवर भारतात काही दिवसांपूर्वीच बंदी घातली आहे.