केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने भारताला २०२५ पर्यंत क्षयरोगमुक्त करण्यासाठी खासगी रुग्णालयांना त्यांच्याकडे दाखल करण्यात आलेल्या क्षय रुग्णांबाबत सरकारला सूचित करण्याचे आदेश दिले आहेत. आरोग्य मंत्रालयाकडून महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये रुग्णांना क्षयरोगाबाबत माहिती देण्यासाठी कॉल सेंटर उभारले जाणार आहेत. या टोल फ्री क्रमांकांवर रुग्णांना २४ तास सेवा दिली जाणार आहे.त्याचप्रमाणे रुग्णांना क्षयरोगासंबंधी सर्व माहिती दिली जाणार असून त्यांच्या शंकांचे निरसन केले जाणार आहे. रुग्णालयांमध्ये नोंद केल्या जाणाऱ्या क्षय रुग्णांच्या संख्येवर लक्ष दिले जाणार असल्याचे आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले. क्षय रोगाच्या रुग्णांच्या संख्येबाबत योग्य माहिती मिळून त्यांची नोंद व्हावी हे आमचे लक्ष असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. यासाठी मंत्रालयाने इंडियन मेडिकल असोसिएशनची मदत देखील घेतली आहे. भारतात क्षय रोगाच्या प्रकरणाची नोंद होत नसल्याची चिंता वर्ल्ड हेल्थ ऑर्गानायजेशनने त्याच्या अहवालात व्यक्त केली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार २०१५ मध्ये प्रत्येकी एक लाख लोकसंख्येमागे क्षयरोगाची २१७ प्रकरणे समोर आली तर २०१६ मध्ये प्रत्येकी एक लाख लोकसंख्येमागे २११ अशी घट यात दिसून आली.

दरम्यान २०१६मध्ये जगभरात नव्याने क्षयरोग होणाऱ्या रुग्णांची संख्या १.०४ कोटी असून यातील ६४ टक्के रुग्ण भारतातील आहेत. असा अहवाल वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनने प्रसिद्ध केला आहे.