अटल पेन्शन योजना केंद्र सरकारद्वारे राबवण्यात येत आहे. सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर या योजनेसाठी देण्यात येणारी रक्कम ऑटो डेबिट न करण्याचा निर्णय सरकारनं घेतला होता. परंतु आता ३० जून रोजी याचा कालावधी पूर्ण होणार असून १ जुलैपासून या योजनेत पैसे गुंतविणार्‍या लोकांच्या खात्यातून पैसे ऑटो डेबिट केले जाणार आहे. ११ एप्रिल रोजी करोनाच्या पार्श्वभूमीवर ‘पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी’नं ३० जूनपर्यंत या योजनेची रक्कम ऑटो डेबिट न करण्याच्या सूचना बँकांना दिल्या होत्या. परंतु आता याचा कालावधी पूर्ण होणार असल्यानं याची रक्कम ऑटो डेबिट करण्यासंबंधी ग्राहकांना ईमेलद्वारे सूचना पाठवण्यात आली आहे.

दरम्यान, ऑटो डेबिटमुळे काही ग्राहकांना समस्यांचा सामनादेखील करावा लागू शकतो, अशा शक्यता वर्तवण्यात येत आहे. करोना संकटादरम्यान अनेकाच्या वेतनावरही परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत ऑटो डेबिट त्यांच्यासाठी त्रासदायक ठरू शकतं असं म्हटलं जात आहे. याव्यतिरिक्त ३० सप्टेंबरपर्यंत ज्यांच्या निवृत्तीवेतन योजनेचे खाते नियमित केले गेले नसले तरी त्यांच्याकडून दंड आकारला जाणार नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

सध्या तरी कोणत्याही प्रकारचा दंड आकारला जाणार नाही. परंतु सर्वसाधारणपणे, उशीरा रक्कम जमा करण्यासाठी दंड आकारला जातो. दरमहा १०० रुपयांच्या योगदानावर दरमहा १ रुपयांचा दंड आकारला जातो. तसंत दरमहा १०१ ते ५०० रुपयांच्या योगदानावर २ रुपयांचा दंड आकारण्यात येतो. तर दरमहा ५०० ते १००० रुपयांच्या योगदानावर १० रुपये दंड भरावा लागतो. याशिवाय 1001 रुपयांपेक्षा जास्त योगदान दिल्यास १० रुपये दंड आकारला जातो.