19 September 2019

News Flash

अ‍ॅक्युपंक्चर चिकित्सा पद्धती विधेयक मंजूर

अ‍ॅक्युपंक्चर चिकित्सा पद्धतीला गुरुवारी विधिमंडळात एकमताने मान्यता मिळाली.

दोन्ही सभागृहांत एकमताने मान्यता

अ‍ॅक्युपंक्चर चिकित्सा पद्धतीला गुरुवारी विधिमंडळात एकमताने मान्यता मिळाली. अ‍ॅक्युपंक्चर चिकित्सा पद्धतीचे विधेयक शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभा आणि विधान परिषदेत मांडले. हे विधेयक दोन्ही सभागृहांत एकमताने मंजूर करण्यात आले. महाराष्ट्राच्या वैद्यकीय क्षेत्रातील ही महत्त्वाची घटना आहे. अ‍ॅक्युपंक्चर चिकित्सा पद्धती ही महाराष्ट्रातील लोकप्रिय चिकित्सा पद्धत आहे. या चिकित्सा पद्धतीला तिच्या विकासासाठी योग्य ती संधी निर्माण करणे आवश्यक आहे, तसेच या चिकित्सा पद्धतीचे अध्यापन व व्यवसाय यांचे विनियमन करणे आवश्यक आहे. या दृष्टीने महाराष्ट्रात ही पद्धत लागू करण्यात आल्याची प्रक्रिया सुरू करीत आहोत, असे विनोद तावडे यांनी सांगितले.
अ‍ॅक्युपंक्चर ही शरीरावरील विशिष्ट बिंदूवर त्वचेमध्ये बारीक सुया टोचून त्याद्वारे वेदनामुक्त करणारी किंवा आजारपण बरी करणारी एक चिकित्सा पद्धत आहे. ही एक महत्त्वाची प्राकृतिक स्वरूपाची चिनी पारंपरिक चिकित्सा पद्धत आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार या चिकित्सा पद्धतीच्या वापरास सुमारे २५०० हून अधिक वर्षांपूर्वी सुरुवात झाली असावी. या चिकित्सा पद्धतीची संकल्पना ही अतिप्राचीन काळी विकसित झाली असावी, असे अनुमान चिनी प्रमाणावरून काढता येते, असे विनोद तावडे यांनी सांगितले.
अ‍ॅक्युपंक्चर चिकित्सा पद्धतीच्या विधेयकाची माहिती देताना विनोद तावडे म्हणाले, आशियातील शेजारील राष्ट्रांना अ‍ॅक्युपंक्चर चिकित्सा पद्धतीची ओळख सहाव्या शतकात झाली व तेथे ही पद्धत तत्परतेने स्वीकारली गेली. १६ व्या शतकाच्या प्रारंभापर्यंत ही पद्धत युरोपपर्यंत पोहोचली. गेल्या दोन दशकांमध्ये ही चिकित्सा पद्धती संपूर्ण जगभरात पसरली असून त्यामुळे या चिकित्सा पद्धतीच्या विकासाला चालना मिळाली आहे, असेही तावडे यांनी नमूद केले.

First Published on December 11, 2015 1:48 am

Web Title: govt approve acupressure system