13 December 2017

News Flash

कृतज्ञता व्यक्त करण्यामुळे आरोग्यास फायदा

रिव्हय़ू ऑफ कम्युनिकेशनचे संशोधन

पीटीआय, वॉशिंग्टन | Updated: April 17, 2017 12:54 AM

( संग्रहीत प्रतिनिधिक छायाचित्र )

रिव्हय़ू ऑफ कम्युनिकेशनचे संशोधन

एखादे काम झाल्यानंतर त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हा माणसाचा स्थायीभाव. त्याचे अनेक फायदे कळतनकळत दिसून येतात. मात्र त्याचा आरोग्यासाठीही फायदा होत असल्याचे नव्या अभ्यासात दिसून आले आहे. कृतज्ञता व्यक्त करण्यामुळे व्यक्तीच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होत असून, दीर्घकालीन चांगले संबंध ठेवायचे असतील तर याचा मोठा फायदा होत असल्याचे अभ्यासात दिसून आले आहे.

अमेरिकेच्या मोन्टाना विद्यापीठातील संशोधकांनी कृतज्ञता व्यक्त करणे याचा मानसिक व शारीरिक आरोग्यावर नक्की काय परिणाम होतो, याचा अभ्यास केला.

कृतज्ञता व्यक्त करण्यामुळे संबंध, मानसिक व शारीरिक आरोग्यामध्ये सातत्याने वाढ होत जाते. तसेच यामुळे इतरांना मदत करण्याची सवय लागते. तसेच आशावाद, व्यायाम करण्याची सवय लागून शारीरिक आरोग्य उत्तम राहण्यास मदत होत असल्याचे मोन्टाना विद्यापीठाच्या स्टीफन एम योशिमुरा यांनी म्हटले आहे. तथापि, हे यावरील पुरेसे संशोधन नसून यावर आणखी अभ्यास करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

कृतज्ञता व्यक्त करून प्रतिसाद दिल्यामुळे औदार्य वाढीस लागण्यास मदत होते. ज्या वेळी आपण कोणाकडून भेटवस्तू घेतो, त्या वेळी भेटवस्तू दिल्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करतो. ज्या वेळी आपण सार्वजनिकरीत्या कृतज्ञता व्यक्त करतो, त्या वेळी आपला नि:स्वार्थी स्वभाव दिसून येतो. प्रत्येकाने याचा अनुभव घेण्याची गरज आहे, त्यामुळे आपले आयुष्य समाधानी होण्यास मदत होते, असे स्टीफन यांनी म्हटले आहे. याशिवाय कृतज्ञता व्यक्त करण्यामुळे आलेला मानसिक तणाव, चिंता, मत्सर आणि नोकरीसंबंधित ताण, अचानक राग येण्याची पातळी कमी होण्यास मदत होते.

जे लोक इतरांच्या तुलनेत जास्त कृतज्ञता व्यक्त करतात, ते कमी आजारी पडतात. अधिक चांगला व्यायाम करतात आणि चांगल्या दर्जाची झोप घेतात, असे स्टीफन यांनी म्हटले आहे.  हे संशोधन ‘रिव्हय़ू ऑफ कम्युनिकेशन’ या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे.

First Published on April 17, 2017 12:54 am

Web Title: gratitude is good for your health