गेल्या काही वर्षांत ‘ग्रीन टी’ आरोग्यदायक सांगितले जात असतानाच आता ‘ग्रीन कॉफी’ नावाचा एक नवीन प्रकार पुढे येत आहे. यात वैज्ञानिकांनी ग्रीन कॉफी बीन्स भाजण्याची नवी पद्धत शोधून काढली असून या कॉफीचे आरोग्य फायदे बरेच आहेत, असा दावा केला आहे.
अमेरिकेतील ब्रॅण्डिस विद्यापीठाचे डॅन पेरलमन यांनी कॉफी बीन्सपासून पीठ तयार केले असून ते अन्न व पोषणपूरक आहार म्हणूनही उपयोगी आहे. पारंपरिक कॉफी बीन्सपेक्षा ते वेगळे आहे. संशोधनात असे दिसून आले आहे की, कॉफी पिणे आरोग्यास चांगले असते. हार्वर्डच्या संशोधनानुसार जे लोक रोज तीन ते पाच कप कॉफी पितात त्यांच्यात ती न पिणाऱ्यांपेक्षा अकाली मृत्यू येण्याचा धोका १५ टक्के कमी असतो. कॉफीमध्ये सीजीए नावाचे अ‍ॅण्टिऑक्सिडंट असते त्यामुळे साखरेचे चयापचयात नियंत्रण होते परिणामी रक्तदाब आटोक्यात राहतो व हृदयरोग व कर्करोगाचे प्रमाणही कमी होते.
जेव्हा कॉफी बीन्स पारंपरिक पद्धतीने भाजले जातात तेव्हा २०४.४ अंश सेल्सियस तपमानाचा वापर १० ते १५ मिनिटे केला जातो, त्यामुळे सीजीएचे प्रमाण कमी होते. एका अभ्यासानुसार हे प्रमाण ५० ते १०० टक्केही कमी होते. पेरलमान यांच्या मते कॉफी बीन्स कमी भाजले व कमी तपमान ठेवले तर फायदा होतो. यात ते १४८ अंश सेल्सियस तपमानाला दहा मिनिटे भाजले जातात. बीन्सच्या वजनाच्या १० टक्के प्रमाण सीजीएचे असते व ते कमी होत गेल्याने तोटा होतो. यात पेरलमन यांनी कॉफी बीन्स भाजून त्याचे पीठ तयार केले जाते व ते द्रव नायट्रोजनच्या मदतीने कमी तपमानाला ठेवले जाते, त्यामुळे बीन्समधील लाभदायी घटकांचे ऑक्सिडीकरण होत नाही.
यात शेवटी गव्हाच्या पिठासारखे पीठ मिळते व ते चांगले लागते पण त्याची नेहमीसारखी कॉफी तयार करता येत नाही. त्यांचे कॉफी पीठ हे ब्रेकफास्टसाठी, स्नॅक बार्स, सूप व ज्यूस तसेच पोषक पेयात वापरले जाते. या पिठाला नेहमीच्या काफीचा स्वादही घेता येतो, यात वजनही कमी करता येते. लठ्ठपणा कमी होतो पण या दाव्यांना पाठिंबा देणारे पुरेसे संशोधन झालेले नाही. सीजीएचा फायदा होतो शिवाय पारबेकिंग पद्धत ही कमी खर्चाची आहे, त्यामुळे ग्रीन कॉफी तयार करून ती बाजारात आणणे सोपे आहे.