जगाची थाळी
प्राजक्ता पाडगावकर – response.lokprabha@expressindia.com
मटारची उसळ, करंजी, मटारभात हे पदार्थ अनेकांच्या अतिशय आवडीचे असतात. पोषणदृष्टय़ाही संपन्न असलेला हा देखणा आणि गुणी मटार माणसाचा फार जुना सांगाती आहे.

पावसाळ्याचे दिवस आणि रोजच्यासारखा घरी यायला झालेला उशीर! घरी येऊन पायावर पाणी घेऊन फ्रिज धुंडाळून काही मिळते का ते पाहावं आणि ऑटो-पायलट मोडवर कांदे टोमॅटो चिरायला घ्यावे. कशात तरी घालता येतील या बेताने. फ्रिझरमधली हिरव्या मटारची पिशवी काढून झट्कन उसळ करावी आणि मऊसूत पावासोबत खायला घ्यावी! बेत साधासाच मात्र मन प्रसन्न करणारा! किंचित दाब दिला की कुस्करले जाणारे मटारचे दाणे, रस्स्यात बुडून नरम होणारा पाव आणि  पोटात त्याची गरम ऊब! इवले सुख असे अवचित भेटते! या इवल्या सोहळ्याच्या क्षणी कोणाला मटार बघून आनुवंशिकशास्त्र आठवले तर? हा काय प्रकार आहे नेमका? आजची मटारची कथा आहेच मोठी रंजक!

ग्रेगोर जोहान्न मेंडेल या ऑस्ट्रियन  शास्त्रज्ञ-पाद्रय़ांनी  १८५६ ते १८६३ मध्ये चर्चच्या छोटय़ा जमीन तुकडय़ावर मटाराच्या जवळजवळ २८ हजार रोपटय़ांची लागवड करून, त्यांना संक्रमित करून, त्यांच्या नवनव्या जाती तयार केल्या. त्यांनी प्रत्येक पिढीगणिक आनुवंशिकता कशी नव्या पिढीपर्यंत पोचते, नव्या पिढीला जुन्या पिढीकडून जनुकीय पातळीवर नेमके काय आणि कसे प्राप्त होते, या सगळ्याच्या तपशीलवार नोंदी ठेवल्या, त्यातील बदल टिपले आणि त्यावर गणितेदेखील मांडली. त्यांनी त्यातून दोन कायदे शोधून काढले, ‘लॉ ऑफ सेग्रेगेशन’ आणि ‘लॉ ऑफ इनडिपेन्डंट अ‍ॅसॉर्टमेंट’. यांनाच पुढे ‘लॉ ऑफ इनहेरिटन्स’  असे संबोधले जाऊ लागले.

मटारच्या दाण्यांचा आकार, त्यांच्या आवरणाची जाडी, त्या दाण्यांचा रंग, झाडाची उंची, नेमक्या किती उंचीवर आणि कोणत्या रंगाची फुले झाडाला येतात, याच्या तपशीलवार नोंदी ठेवून त्यांनी हे सिद्धांत मांडले होते. हा सगळा शोध क्रांतिकारी होता. समकालीन चार्ल्स डार्वनि यांना मात्र या संपूर्ण शोधाची अजिबात माहिती झाली नव्हती. त्यांचा आनुवंशिकशास्त्राचा शोध निराळ्या दिशेने सुरू होता. पुढे अनेक दशके मेंडेल यांच्या शोधाचे महत्त्व कोणालाच उमजले नव्हते. मात्र २०व्या शतकाच्या सुरुवातीला तीन युरोपीय शास्त्रज्ञ आणि अभ्यासक यांनी पुन्हा मेंडेल यांचा अभ्यास तपासून पहिला आणि त्यातील  स्वतंत्र वैचारिक भूमिका, नव्याच क्षेत्राविषयी अभ्यास आणि या अभ्यासाची भासणारी गरज याचे आकलन त्यांना झाले. त्यामुळे मेंडेल हे मरणोत्तर प्रकाशझोतात आले. त्यांना आता आनुवंशिकता शास्त्राचे पितामह म्हणून सन्मानित करण्यात येते.

मटारचे आणि मानवजातीचे नाते तसे खूपच जुने आहे, मानवाने सर्वात पहिल्यांदा ज्या काही पिकांची लागवड मोठय़ा प्रमाणात करायला सुरुवात केली, त्यातील एक म्हणजे मटार! बर्मा, थायलंड इथल्या स्पिरिटमध्ये ख्रिस्तपूर्व ९७५० या काळातले मटारचे दाणे आढळून आले. ख्रिस्तपूर्व ७००० मधले मटारचे दाणे इराकमध्येदेखील सापडले आहेत. भारतात, अफगाणिस्तानात ख्रिस्तपूर्व २००० पासून मटारची लागवड होत असल्याचे पुरावे आढळतात. हडप्पा, मोहेंजोदारो इथे मटार, मटारची डाळ मोठय़ा प्रमाणात वापरात असल्याचे पुरावे आढळतात. ख्रिस्तपूर्व ३००० आणि ४००० मध्ये इजिप्तमध्ये आणि जॉर्जयिामध्ये मटार वापरण्यात येत असावा. ख्रिस्तपूर्व ५०० पर्यंत ग्रीक आणि रोमन लोकदेखील वाळवलेल्या मटारदाण्यांचा उपयोग करत असत. ख्रिस्तपूर्व ६००च्या दरम्यान चीनमध्ये मटार पोचला त्याच्या चिनी नावावरून हे स्पष्ट होते. तिथे त्याला ‘हू तोऊ’ अर्थात ‘परकीय कडधान्य’ असे नाव होते. पुढे चार्लमॅग्नेच्या काळात साधारण ८०० सालात फ्रान्समध्ये मटार पोचला. १३व्या शतकापर्यंत फ्रान्समध्ये हिरवे कोवळे मटार खाणं हे एक फॅड झालं होतं! पॅरिसच्या रस्त्यावर विक्रेते कोवळे मटार मोठय़ा जोशात विकत असत. मधल्या काळातील दुष्काळांत गरीब शेतकरी आणि कष्टकरी वर्गात वाळवलेले मटार अर्थात वाटाणे खाण्याची प्रथाच निर्माण झाली. वर्षभर पुरवठय़ाला पडणारे, गरिबांसाठी प्रथिनयुक्त असे अन्न म्हणून मटार नावारूपास आला. १८७० मध्ये पहिल्यांदा डबाबंद अन्नपदार्थ बनवण्यात आले, कॅम्पबेल कंपनीने पहिले काही पदार्थ डबाबंद केले, त्यात मटार असावेत. डबाबंद मटारची चव आणि रंग दोन्ही बदलत असे तरी ब्रिटिश आणि अमेरिकी लोक मोठय़ा चवीने हे मटार खात असत. १९२० साली पदार्थ ताजे असताना गोठवण्याचे तंत्र विकसित झाले, त्यातदेखील मटारची वर्णी लागली. आजपर्यंत मटार ताजे कमी आणि गोठवलेले अधिक जगात सर्वत्र वापरले जातात.

अशा या मटारापासून जगात विविध प्रकारचे खाद्यपदार्थ तयार केले जातात. अधिककरून उसळीसारखे किंवा सूपसारखे पदार्थ तयार केले जातात. इटलीमधली मटार उसळ करण्याची एक पद्धत आहे, नुसताच कांदा लोण्यावर परतून त्यात थोडे मीठ, मिरपूड घालून त्यावर कोवळे किंवा गोठवलेले मटार टाकून त्याची उसळ करायची. दुसरा प्रकार आहे, वाळवलेले डुकराचे मांस, हॅम घालून उसळ करायची. ही अशी सरसरीत हॅम घातलेली उसळ पास्त्यावरदेखील घालून खाल्ली जाते.

फ्रेंच लोकदेखील साधारण अशीच कृती वापरून मटारच्या उसळीसारखे किंचित सरसरीत पदार्थ तयार करतात.

कॅरिबियन देशांत, मागल्या पिढीत तिथे गेलेले भारतीय लोक मोठय़ा प्रमाणावर आहेत. तिथे पिवळ्या वाटाण्याची आणि हिरव्या वाटाण्याची उसळ, आमटी आणि असे अनेक पदार्थ सर्रास बनवले जातात. त्यात कधी डुकराचे किंवा इतर मांस वापरले जाते. जगभरात मटारचे दाणे, वाटाणे हे अनेक शतकं संपूर्ण दाण्याच्या स्वरूपात वापरले जात होते. १९व्या शतकापासून सोललेला आणि फोडून डाळ केलेला वाटाणा वापरात आला. चीनमध्ये त्याउलट त्यांनी मटारची निराळी जात निर्माण केली, ज्यात बाहेरचे हिरवे टरफलदेखील कोवळे आणि गोड करण्यात आले. अतिशय बारीक कोवळ्या दाण्यांनी भरलेल्या या चपटय़ा शेंगा भाजीसारख्या चिरून सूप्स, नुडल्स, भात अशा अनेक पदार्थामध्ये वापरल्या जातात. जपान, तवान, थायलंड, मलेशिया आणि इतर दक्षिण आशियायी प्रांतात मटार कोवळे असताना सोलून खाल्ले जातात किंवा त्याचे सूपदेखील आवर्जून बनवण्यात येते. ग्रीस, टय़ुनिशिया, टर्की आणि सायप्रस इथे मटार उसळीत बोकडाचे मांस आणि बटाटे घालतात. हंगेरी, सर्बयिा इथे मटारचा करंजीसदृश पदार्थ बनवला जातो. अमेरिकेत नवीन फॅडनुसार, गाईच्या दुधाची अ‍ॅलर्जी आहे किंवा ते आवडत नाही, अशा लोकांसाठी मटारपासून दूध बनवले जाते.

एक इवलासा मटारचा दाणा, मात्र त्याची विस्मयकारक सफर संपूर्ण जगभर  झाल्याचे आढळते. त्यातील पिष्टमय पदार्थ, जीवनसत्त्व बी -सिक्स, क त्याचसोबत इतर खनिज घटक आणि प्रथिने या सगळ्याने मटारचा एक दाणा परिपूर्ण आहारच ठरतो जणू!

या दाण्याने मानवाला उत्तम आहारच दिला नाही तर अभ्यासाचे एक संपूर्ण नवे दालन खुले करून दिले, आनुवंशिकता शास्त्र!
सौजन्य – लोकप्रभा