29 October 2020

News Flash

चेहरा व केसांच्या सौंदर्यासाठी संजीवनी ठरेल ग्रीन टी

घरच्या घरी ही ‘ग्रीन टी ट्रीटमेंट’ करता येते.

‘ग्रीन टी’चा उपयोग सौंदर्योपासनेतही करता येतो. अनेक सलॉन ट्रीटमेंटसाठी हल्ली ग्रीन टी बेस्ड प्रॉडक्ट्स वापरताना दिसतात. याच सलॉन स्टाइल ट्रीटमेंट घरच्या घरी करता येतील का? ग्रीन टी ट्रीटमेंटसाठीच्या ‘डू इट युवरसेल्फ’ ट्रिक्स अर्थात घरगुती उपचार..

नेहमीच्या चहा-कॉफीला फाटा देत अनेकांनी ‘ग्रीन टी’चा आरोग्यदायी पर्याय स्वीकारला आहे. ग्रीन टी जेवणानंतर घेतल्यास पचनास मदत होते, हे आपण जाणतो. पण केवळ पिण्यासाठी नाही तर सौंदर्यवर्धक उपचारांसाठी ग्रीन टी फायदेशीर आहे. नितळ त्वचा आणि निरोगी केसांसाठीचा सर्वात नैसर्गिक आणि सुरक्षित मार्ग म्हणून ग्रीन टीकडे पाहता येईल. ग्रीन टी वापरून त्वचा आणि केसांचं आरोग्य कसं वाढवता येईल हे सांगणाऱ्या काही डीआयवाय ट्रिक्स..

ग्रीन टी हा प्रमुख घटक असणारी उत्पादनं वापरल्याचे अनेक फायदे असले तरी घरच्या घरी ही ‘ग्रीन टी ट्रीटमेंट’ करता येते. शॅम्पूने केस धुतल्यानंतर कंडिशनर लावण्याऐवजी कंडिशिनग म्हणून ग्रीन टीचं पाणी केसांना लावावं. केसांच्या फॉलिकल्ससाठी हे पाणी नवसंजीवनी ठरतं. ते केसांना पोषण देतं आणि त्यांच्या वाढीला चालना देतं. सेलिब्रेटींसारखे चमकदार आणि मऊसूत केस हवे असतील तर ग्रीन टीच्या पानांमध्ये एक अंडं फोडावं आणि दही घालून ते चांगलं एकजीव करावं. हे मिश्रण केसांच्या मुळांपासून टोकापर्यंत लावावं आणि ते अर्धा तास लावून ठेवावं. नंतर कोमट पाण्याने केस धुवावेत.

चेहऱ्यासाठीही ग्रीन टी फायद्याचे-
आयुष्यभरात किमान एकदा तरी आपण मुरुमांचा त्रास सहन केलेला असतो. तारुण्यपीटिका म्हणजे तरुण मुलींना सगळ्यात मोठा शत्रू वाटतो. या मुरुमांपैकी काही सहजगत्या निघून जातात, तर काही डाग सोडून जातात. त्यानंतर आपण स्वत:वर ढीगभर क्रीम, गोळ्या आणि चेहऱ्याला लावायच्या उत्पादनांचा मारा करतो. पण हे डाग काही जात नाहीत. एक घरगुती उपाय करून बघा.. ग्रीन टीच्या काही टी बॅग्ज घेऊन त्या गरम पाण्यात घाला. पाणी गाळून थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्या. त्यानंतर प्रत्येक वेळी चेहरा धुण्यासाठी साध्या पाण्याऐवजी त्वचेला हितकारक असणारं हे द्रावण वापरावं. ग्रीन टीनं चेहरा धुतल्यानंतर पुसू नका. त्वचेत हे द्रावण हळूहळू मुरू द्यावं. हा क्रम सातत्याने पाळल्यास चेहऱ्यावरचे डाग हळूहळू नाहीसे होतील आणि मुरुमांनाही प्रतिबंध होईल. त्याचप्रमाणे अचानक मुरुमं येणंही बंद होईल. त्याजोडीला तुम्ही नंतर चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावू शकता.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2020 1:59 pm

Web Title: green tea benifits nck 90
Next Stories
1 पिंपल्सवर रामबाण उपाय म्हणजे हळद ; जाणून घ्या हळदीचा फेस पॅक बनवायची पद्धत
2 मिनिटांत मिळणार गाडीचा इन्शुरन्स; ongoची डिजिटल अन् पेपरलेस प्रक्रिया
3 राम्बुतान फळ खाण्याचे फायदे माहित आहेत का?
Just Now!
X