16 October 2019

News Flash

Gudi padwa 2019 : सोप्या भाषेत गुढीपाडवा आणि गुढी यांची माहिती

आपल्या धार्मिक गोष्टींची , सणांची माहिती अवाजवी तपशीलासह किंवा बोजड उदाहरणांसह दिलेली असते.

(संग्रहित छायाचित्र)

– मकरंद करंदीकर
आपल्या धार्मिक गोष्टींची , सणांची माहिती अवाजवी तपशीलासह किंवा बोजड उदाहरणांसह दिलेली असते. त्यात सांगणाऱ्याचा दोष नसतो कारण ती तशाच प्रकारे आजवर सांगितली जाते. म्हणून हा थोडा FAQ धर्तीवर सोपा धर्मार्थ सांगण्याचा प्रयत्न आहे.

मला माहिती असलेले कांही संदर्भ असे –
१) पूर्वापार म्हणजे मोहेंजोदरो व हडप्पा संस्कृतीच्या काळातसुद्धा प्रत्येक घरावर उंच ठिकाणी दिवा लावलेला असे. ध्वजा, पताका , गुढ्या (नंतरच्या काळात आकाशकंदील ) लांबून पटकन दिसतील अशा ठिकाणी लावण्याची खूप जुनी परंपरा आहे. कुठल्याही सार्वजनिक आनंदाच्या महोत्सवाला गुढ्या–तोरणे उभारली जातात.

२) घरात सहज उपलब्ध असलेली बांबूची काठी आणि रंगीत रेशमी वस्त्र यासाठी वापरले जाते.

३) आंब्याची फळे पाडव्यापर्यंत बरीचशी तयार होतात तरीही कांही कारणाने तसाच राहिलेला मोहोराचा तुरा आणि पाने गुढीला बांधतात. आंब्याची पाने धार्मिक विधीत पवित्र मानली जातात आणि मोहोर हा अंकुराचे, वृद्धीचे प्रतीक आहे. त्याचा गोड वासही मोहवितो म्हणून तो मोहोर !

४ ) पाण्याने भरला असेल तरच तो कलश अन्यथा तो तांब्याच असतो. तो उलटा घालण्यामागे तो ओसंडून वाहिल्याचा, रिता झाल्याचा संकेत असतो. त्याच्या चमकदारपणामुळे, गुढी खूप लांबूनही नजरेत भरते. कावळ्यासारखे कांही पक्षी ही गुढी उचकटण्याची शक्यता असते. हे पक्षी चमकदार तांब्यापासून घाबरून दूर राहतात.

५) गुढीला गोड कांहीतरी म्हणून साखरेच्या गाठ्यांची / बत्ताशांची माळ घालण्याची पद्धत अलीकडे अस्तित्वात आलेली आहे. या माळा होळीला बाजारात मिळतातच म्हणून त्या पुढे गुढीला घातल्या जात असाव्यात.

६ ) कडुनिंब हा सौम्य परंतु अत्यंत परिणामकारक जंतू आणि कीटकनाशक आहे. माणसाला त्रास न होता जंतूंचा नाश करण्याची क्षमता त्यात आहे. त्याची चटणी खाण्यामागे, कडक उन्हाळ्यात शरीराच्या अंतर्गत शुद्धीकरणाचा उद्देश आहे. भारत हा मधुमेह्यांची जागतिक राजधानी होण्याच्या मार्गावर आहे. कडुनिंब हा मधुमेहाला प्रतिबंध करतो. दंतमंजनात कडुनिंब अत्यंत परिणामकारक आहे.या परंपरेमुळे कडुनिंबाचे महत्व अधोरेखित होते.

७) या दिवशी पंचांगातील वर्षफलाचे वाचन केले जाते.पूर्वी शेती हा मुख्य व्यवसाय होता आणि शेतीची प्राथमिक कामे या काळात सुरू झालेली असतात. या दृष्टीने वर्षभराच्या कामांचे नियोजन करता येण्यासाठी ते फारच उपयुक्त होते. ते ऐकायला सर्व कुटुंबीय सणाच्या दिवशी एकत्र बसत असत ही त्याची आणखी एक कौटुंबिक – सांस्कृतिक बाजू!

८) केक खाऊन, मद्यप्राशन करून, मांसाहार करून न्यू इयर सेलिब्रेट करण्याची पद्धत आणि संस्कृती इथली नाही. इतक्या कडक उन्हाळ्यात या गोष्टी इथे पचतही नाहीत. इथला वर्षारंभ हा इथले वातावरण, निसर्ग आणि परंपरा यांच्याशी पूर्णपणे निगडित आणि शास्त्रशुद्ध आहे.
मात्र याचे भान सर्वांनीच अत्यंत अभिमानाने ठेवायला हवे.६ एप्रिलपासून सुरु होत असलेले श्री शालिवाहन शके १९४१, विकारीनाम संवत्सर तुम्हा सर्वांना अत्यंत शुभकाराक, सुखकर, मंगलदायक, आरोग्यसंपन्नतादायक जावो!

First Published on April 3, 2019 2:00 pm

Web Title: gudi padwa 2019 date know significance of the festival of chaitra sukladi
टॅग Gudi Padwa 2019