गुढीपाडवा…..य़ा नावातच कमालीचं मांगल्य भरलेलं आहे. सगळ्या जुन्या गोष्टी गेल्या वर्षीच विसरून एका नव्या वर्षाचं आनंदी मनाने स्वागत करण्याचा हा दिवस. झालं गेलं विसरून जा आणि आयुष्याला एका नव्या दमाने, चांगल्या वातावरणात सामोरे जा हाच संदेश गुढीपाडव्याचा हा सण आपल्या सगळ्यांना देतो.

गुढीपाडव्याच्या दिवशी आपण आपल्या घराची आणि परिसराची स्वच्छता करतो. एका चांगल्या दिवसाला चांगल्या प्रकारे सुरूवात आपण करतो. पण प्रत्येक सण साजरा करणं हे आपल्यापैकी सर्वांनाच शक्य होत नाही. नोकरदार वर्गामध्ये अनेकांना या सणाच्या दिवशी सुट्टीही मिळत नाही. मग हा सण साजरा तर करायचा आहे पण वेळ नाही, अशा तगमगीमध्ये माणूस सापडतो. आपल्याला आपलं काम तर करायचं असतंच पण त्याचसोबतीने घरात गुढीही उभारायची असते. पण अनेकदा गुढी कशी उभारायची हेही माहीत नसतं. तर पाहुयात गुढीपाड़व्याच्या मंगलदिनी गुढी कशी उभारावी ते,

१. मध्यम उंचीची एक काठी घ्यावी

२. या काठीच्या टोकाला एक पिवळा, लाल किंवा नारिंगी रंगाचा एक कपडा बांधावा. या कपड्याला सोनेरी रंगाची बाॅर्डर असेल तर छानच. काळा कपडा अर्थातच वापरू नये.

३. काही कडुनिंबाची आणि आंब्याची पानं घेत ती या कपड्याभोवती लावावीत

४ यानंतर झेंडूच्या फुलांचा एक हार या कपड्याभोवती घालावा. साखरेच्या बत्ताशांची माळ घालावी

५. या काठीच्या टोकावर पितळी किंवा चांदीचा तांब्या उपडा घालावा. तांब्या नसल्यास ग्लासचाही वापर अनेक जण करतात.
आणि यानंतर ब्रह्मध्वजाचं प्रतीक समजली जाणारी ही गुढी अतिशय आनंदाने आणि सन्मानपूर्वक आपल्या घरात लावावी. यावेळी ही गुढी शक्यतो एका कोनात लावावी.