News Flash

Gudi Padwa 2018 : असा साजरा झाला सातासमुद्रापार गुढीपाडवा

परदेशातही मराठीची शान

लंडनमध्ये गुढीपाडव्यानिमित्त मराठी कुटुंबियांच्या गॅलरीमध्ये उभारण्यात आलेली गुढी

महाराष्ट्रातील सणवार म्हणजे मराठी संस्कृती आणि मराठी माणसाची ओळखच. उत्साहाने हे सण साजरे करणे, सजून-धजून देवाला जाणे आणि आपल्या नातेवाईकांसोबत गोडाधोडाचे जेवण करणे असा सणाचा खास बेत असतो. पण कधी शिक्षणासाठी तर कधी नोकरीच्या निमित्ताने परदेशात राहणाऱ्या तरुणांचे प्रमाण वाढले आहे. परदेशात राहूनही आपले सण साजरे करण्यातली मजा काही औरच. प्रसंगी उपलब्ध होतील त्या गोष्टींमध्ये मित्रमंडळींना बोलावून मोठ्या उत्साहात सण साजरे करण्याचा परदेशात ट्रेंड आहे. कालच देशाच्या कोपऱ्याकोपऱ्यात साजरा झालेला गुढीपाडवा म्हणजेच मराठी नववर्षाचा पहिला दिवस सातासमुद्रापारही अतिशय उत्साहात आणि आनंदात साजरा झाला. लंडन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा याठिकाणी गुढीपाडवा कसा साजरा झाला पाहूयात…

अमेरिकेत राहणाऱ्या प्राजक्ता जोशी यांनी सांगितले, आम्ही कामानिमित्ताने खऱ्या अर्थाने सातासमुद्रापार असलो तरीही मराठी सणांना आणि संस्कृतीला जिवंत ठेवण्याचा, जपण्याचा प्रयत्न आम्ही याठिकाणी राहूनही करतो. सुदैवानी या वर्षी पाडवा रविवारी असल्याने आम्हाला त्याच दिवशी साजरा करता आला. मात्र जर मधल्या दिवसांना आला तर आम्ही त्यानंतर येणाऱ्या रविवारी सण साजरा करतो. तिथी, वेळ या सगळ्या गोष्टी बदलतात खऱ्या पण राहत असलेल्या ठिकाणच्या संस्कृतीशी जुळवून घेत सणवार साजरे करावे लागत असल्याने आम्ही काढलेला तो मार्ग आहे.

अमेरिकेत मोठ्या शहरांमध्ये मराठी लोकांची संख्या खूप जास्त आहे. त्यामुळे अनेक घरी हा सण अगदी यशोचितपणे साजरा केला जातो. तसेच मराठी मंडळातही सर्व मराठी सण मोठ्या उत्साहात साजरे होतात. अमेरिकेसारख्या बरीच ठिकाणी मंदिरेही असल्याने सणावाराला लोक त्याठिकाणी जाऊन देवाची प्रार्थना करतात. विशेष म्हणजे पूजेला लागणारे सर्व साहित्य याठिकाणी असणाऱ्या इंडियन स्टोअरमध्ये सहज उपलब्ध होते. गुढीसाठी लागणारा कडूलिंबाचा पाला आणि साखरेच्या गाठी मात्र याठिकाणी उपलब्ध होत नाहीत. नातेवाईक जवळ नसल्याने भारतातील इतर प्रांतातून आलेल्या मित्रमंडळींसोबत हा सण अतिशय उत्साहाने साजरा केला जातो. पुरणपोळी आणि कटाची आमटी किंवा श्रीखंड-पुरी असे पदार्थ करुन एकत्रितपणे त्याचा आस्वाद घेतला जातो. नऊवारी साडी, परकर-पोलके यांसारखे पारंपरिक कपडे घालून सणाचा आनंद द्विगुणित कऱण्याचा आम्ही प्रयत्न करतो असेही त्या म्हणाल्या. त्यामुळे तुम्ही तुमच्या संस्कृतीपासून जितके दूर जाता तितके अधिक जवळ येता.

अमेरिकेतील प्राजक्ता जोशी यांच्या घरातील गुढी, सोबत मुलगी गार्गी जोशी

कॅनडामध्ये राहणाऱ्या सुचित्रा त्यागराजन सांगतात, व्हँकुव्हरमध्ये मराठी मंडळामध्ये गुढीपाडव्याच्या निमित्ताने एकत्रिकरण आयोजित करतात. याठिकाणी गुढी उभारली जाते. तसेच मराठी लोकांसोबत जेवणाचेही आयोजन केलेले असते. साधारण एका विशिष्ट भागात राहणारे लोक यानिमित्ताने एकत्र येतात आणि गप्पागोष्टींमध्ये सण साजरा केला जातो. याबरोबरच अमेरिकेतील अमृता चंद्रात्रे यांनीही आपल्या भावना लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या, मराठी लोकांचा गुढीपाडवा असतो त्याच दिवशी तेलगू लोकांचा युगादी सण असतो. भारतीय लोक हे दोन्ही सण एकत्रितपणे साजरे करतात. याठिकाणी असणाऱ्या मंदिरांमध्ये पारंपरिक वेशात येतात आणि देवाची आरती करुन सण साजरा केला जातो. यावेळी मंदिरामध्ये प्रसादाचेही आयोजन केले जाते.

ऑस्ट्रेलियातही मराठी मंडळांमध्ये आणि मराठी लोकांच्या घरी गुढीपाडवा अतिशय उत्साहात साजरा करण्यात आल्याचे याठिकाणी राहणाऱ्या मराठी लोकांनी सांगितले. जेवणामध्ये घरी तयार केलेले मिष्टान्न आणि नवीन कपडे घालून उभारलेली गुढी आम्हाला महाराष्ट्राची आठवण करुन देते असे येथे राहणाऱ्यां लोकांनी सांगितले. नवीन पिढीला परदेशात राहूनही आपली संस्कृती माहित असायला हवी यासाठी आम्ही आवर्जून प्रत्येक सण साजरा करतो असे येथील लोकांनी सांगितले.

ऑस्ट्रेलियातील मोहोळकर यांच्या घरातील गुढी

आम्ही राहतो तिथून मराठी मंडळ काहीसे लांब आहे. मात्र आम्ही दरवर्षी घरी न चुकता गुढी उभारतो असे लंडनमध्ये राहणाऱ्या रोहन कर्वे याने सांगितले. शिक्षणासाठी लंडनमध्ये गेलेला रोहन मागची जवळपास ७ वर्षांपासून लंडनमध्येच राहतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2018 1:00 pm

Web Title: gudi padwa is marathi new year celebration this is a first day of the hindu years the gudi padwa festival marks the commencement of the hindu luni solar calendar year people in maharashtra erect
Next Stories
1 शुक्राणूंच्या कमतरतेने आजारपणाचा धोका अधिक
2 Gudi Padwa 2018: सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर उभारली शुभेच्छांची गुढी
3 Video: नववर्षाच्या शोभायात्रेतील विविध रंग
Just Now!
X