आज, रविवारी , ५ जुलै रोजी चंद्रग्रहण, गरूपौर्णिमा व व्यासपूजन आहे. आजचं ग्रहण भारतातून दिसणार नाही. या छायाकल्प चंद्रग्रहणामध्ये कोणतेही ग्रहणविषयक धार्मिक नियम पाळायचे नसतात. तसेच हे चंद्रग्रहण भारतातून दिसत नसल्यामुळे गुरूपौर्णिमेच्या उत्सवामध्ये कोणतीही अडचण येणार नाही. परंतु करोनामुळे आपणास यावर्षी घरात राहूनच गुरुपौर्णिमा साजरी करावयाची आहे.

भारतीय संस्कृतीमध्ये गुरूशिष्य परंपरेला महत्त्वाचे स्थान आहे. आई, वडील आणि गुरू ही तीन दैवते सांगण्यात आली आहेत. गुरू आपणास ज्ञान देतो.जो जो आपणास ज्ञान देतो, तो आपला गुरूच असतो. गुरूचे आपल्यावर अनंत उपकार असतात. या उपकारांची फेड उभ्या आयुष्यात करता येणार नाही. निदान आषाढपौर्णिमेच्या म्हणजे गुरुपौर्णिेच्या दिवशी ज्ञानदाता गुरूला वंदन करून त्याच्याबद्दलची आपली आदराची भावना व्यक्त करणे आपल्या हाती असते. पूर्वी विद्येच्या प्रत्येक शाखेमध्ये गुरुपौर्णिमा मोठ्या स्वरुपात साजरी व्हायची परंतू सध्या संगीत, नृ्त्य आणि अध्यात्म क्षेत्रांमध्ये गुरुपौर्णिमा साजरी केली जात असते. गुरूने जे ज्ञान आपणास दिले ते संगीत व नृत्य क्षेत्रात गुरुपुढे सादर केले जाते.

करोनामुळे यावर्षी गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरू आणि शिष्यांना एकत्र येणे शक्य होणार नाही. परंतु वेगवेगळ्या ॲानलाइन ॲपमुळे येत्या रविवारी आपली कला गुरूंसमोर सादर करता येऊ शकेल. महर्षी व्यास हे तर संपूर्ण जगताचे गुरू म्हणून रविवारी व्यासपूजनही करावयाचे आहे असे दा. कृ. सोमण यांनी सांगितले.