अनेकांचा आवडता, तर काहींच नावडता असा पावसाळा ऋतू सुरु झाला आहे. रिमझिमत्या सरींमध्ये अखेर पावसाचं आगमन झालं आहे. तसं पाहायला गेलं तर आजची तरुणाई प्रत्येक ऋतूमध्ये नवनवीन स्टाईल, फॅशन आजमावत असते. मात्र पावसाळा हा तसा फॅशनच्या दृष्टीने गैरसोयीचा ऋतू. या ऋतूमध्ये कोणतीही फॅशन कॅरी करणं तसं अवघडचं असतं. या काळामध्ये हवामानामध्येही बदल झालेला असतो. त्याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर आणि आरोग्यावर होत असतो. खासकरुन केस आणि त्वचेसंबंधित समस्या निर्माण होताना दिसतात. त्यामुळे पावसाळ्यामध्ये केसांची आणि त्वचेची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.

१. जास्तीत जास्त पाण्याचे सेवन –
ऋतू कोणताही असला तरी शरीराला मुबलक पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे अनेक वेळा डॉक्टर देखील जास्तीत जास्त पाणी पिण्याचा सल्ला देतात. शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण मुबलक असेल तर त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर दिसून येतो. चेहऱ्यावर विशेष ग्लो येतो. पावसाळ्यामध्ये अनेक वेळा वातावरणातील बदलामुळे त्याचा परिणाम त्वचेवर होत असतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी पिण्याची गरज असते. त्यासोबत या काळामध्ये खासकरुन ग्रीन टीचे सेवन करावे.

२. मेकअपचा कमी वापर –
मेकअप म्हणजे महिला वर्गाच्या जिव्हाळ्याचा विषय. मात्र पावसाळ्यामध्ये मेकअप करताना विशेष काळजी घ्यावी लागते. याकाळामध्ये वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण वाढले असते. वातावरणातील या बदलाचा परिणाम आपल्या त्वचेवर होत असतो. आर्द्रतेमुळे त्वचेवरील रोमछिद्रे बंद होतात. ही रोमछिद्रे बंद झाल्यामुळे चेहऱ्यावर मुरुम, पुटकळ्या येता. त्यातच जर मेकअप केला असेल तर त्वचेरील रोमछिद्रे बंद होतात. परिणामी त्वचेला पुरेसा ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही.यामुळे अनेक वेळा त्वचेसंदर्भातील आजार उद्भवतात. त्यामुळे या दिवसांमध्ये कमीत कमी किंवा शक्यतो मेकअप करणं टाळावं.

३. तेलकट पदार्थांचे सेवन टाळावेत –
पावसाळा हा खवय्ये लोकांसाठीचा खास ऋतू. या दिवसामध्ये पाऊस पडला की हमखास कांदाभजी किंवा तळलेले पदार्थ खाण्याची इच्छा होते. मात्र हा मोह टाळला पाहिजे. शरीरामध्ये स्निग्धतेचे प्रमाण वाढलं तर अनेक वेळा स्थूलतेसारख्या समस्या निर्माण होतात. त्यासोबतच तेलयुक्त पदार्थ खाल्ल्यामुळे त्याचा परिणाम त्वचेवर होऊ शकतो.

४. केसांची काळजी –
पावसाळ्यामध्ये आर्द्रतेचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे त्याचा परिणाम केसांवर होऊ शकतो. डोक्यात खाज येणे, कोंडा होणे यासारख्या समस्या निर्माण होतात. या समस्येपासून सुटका करायची असेल तर केस शक्यतो कोरडे ठेवावेत. त्यासोबतच केसांना केवळ नारळाचंच तेल लावावं.त्यासोबतच केस स्वच्छ धुवावेत.