News Flash

फॅशनबाजार : रेशमी जुल्फें..

दिवाळीत किंवा कोणत्याही सणांना आपल्या भारतीय संस्कृतीत स्त्रिया विशेषकरून साडीच नेसतात.

आपल्याला सुंदर बनविण्यात अनेक गोष्टींचा सहभाग असतो. त्यातली एक गोष्ट म्हणजे आपले केस. केवळ सुंदर केस असूनही चालत नाही. त्यांची रचनाही तितकीच आकर्षक असावी लागते. सध्याच्या फेस्टिव्ह मूडसाठी अशा कोणत्या केशरचना करता येऊ शकतात, त्याविषयी.. नवरात्र संपून दिवाळीची लगबग सुरू झाली आहे. काहींनी खरेदी केली असेल, काहींची बाकी असेल. बरेचदा सण, उत्सवांसाठी कपडे किंवा दागिन्यांची जोमानं खरेदी केली जाते. अलीकडे तर स्त्रिया स्वत:चा चेहरामोहराही सुधारून घेतात, पण केसांकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. फार तर एखादा वेगळा कट करून स्वत:चा लूक बदलला जातो. मात्र आपली केशरचनाच आपल्या सौंदर्यात मोलाची भर घालत असते. अत्यंत सोप्या पण तरीही आकर्षक अशा केशरचना करून तुमच्या लूकला फेस्टिव्ह टच देता येऊ  शकतो. त्यासाठीचे साहित्यही आजकाल बाजारात सहज उपलब्ध असते..

दिवाळीत किंवा कोणत्याही सणांना आपल्या भारतीय संस्कृतीत स्त्रिया विशेषकरून साडीच नेसतात. त्याशिवाय हेवी वर्कचे ड्रेसेस, वनपीस व लेहंगा हे अलीकडचे काही प्रकार. जर्दोसी, कुंदन वर्क, रेशमी धागे, बुट्टे, सिक्वेन्स अशा सुंदर कलाकारीने सजलेल्या या कपडय़ांवर अत्यंत हलक्या, सोप्या पण तरी उठावदार केशरचना आवश्यक असतात. साडी मग ती कुठलीही असो, पारंपरिक किंवा डिझायनर त्यावर आपल्या पद्धतीचा अंबाडा खूप छान दिसतो. त्या अंबाडय़ाला गोल गजरा लावला तर आणखीनच सुरेख. या अंबाडय़ालाच वेगवेगळ्या पद्धतींनी सजविता येतं. पुढच्या केसांचा थोडा विस्कटलेला असा लूक करून मागे अंबाडा घालून त्यातून खालच्या केसांची साधी किंवा अनेक पेडींची वेणी घातली तर सुंदर दिसते. त्याशिवाय, पुढच्या केसांचा मधे भांग पाडून किंवा कडेला भांग पाडून मागून एकदम चापूनचोपून अंबाडा घालणे, हीसुद्धा एलिगंट केशरचना वाटते. दिवसभराच्या कार्यक्रमासाठी अशा केशरचना उत्तम टिकू शकतात. गोल, अंडाकृती अशा कोणत्याही चेहऱ्याला बन शोभून दिसतो.

लांब केस असतील, तर ते थोडे कुरळे करून मोकळे सोडता येतील. खालच्या बाजूनेच केवळ कुरळे करून वरील केसांच्या दोन बटा मागे घेऊन पीन लावल्यास, सुटसुटीत व नीट अशी केशरचना होते. यातही मधून किंवा एका बाजूने भांग पाडता येऊ  शकतो. साडी किंवा लेहंग्यावर या रचना सुंदर दिसतात. एखादी वेणीही आपल्या लूकला सुंदर बनविते. पाचपेडी वेणी किंवा अनेक पेडींचीही वेणी घालता येते. त्यात कंटेंपररी लूक हवा असेल तर केसांना थोडे कुरळे करून सर्व केस एका बाजूला घेऊन त्यांची वेणी घालता येते. यात पुढच्या केसांच्या बटा मोकळ्या सोडाव्यात व पेडीही वरून सुरू न करता खांद्यापासून घालाव्या व शेवटपर्यंत घ्याव्यात. आणखीनच सोपी केशरचना हवी असेल, तर सर्व केस एका बाजूला घेऊन खांद्यावरून पुढे घ्यावेत व ते तसेच राहावेत, म्हणून त्यावर हलकासा स्प्रे करावा. एखादा पंजाबी ड्रेस किंवा वनपीसवर हे सुंदर दिसेल.

आपली केशरचना आपल्या पेहरावातील महत्त्वाचा भाग आहे. त्याला ओळखून यंदाच्या दिवाळीत एखादी सुंदर केशरचना नक्की करून पाहा.

  • केशरचना करताना शक्यतो खूप आकडे किंवा पिना लावणे टाळावे. केसांची ओढाताणही करू नये.
  • सध्या खूप सजावट केलेल्या केशरचनांपेक्षा सुटसुटीत, साध्या रचनांचा ट्रेंड आहे.
  • लहान केसांच्याही अनेक साध्या, सुटसुटीत रचना करता येतात. मात्र, त्याचवेळी तयार रचनाही बाजारात सहज मिळू शकतील. वेगवेगळे हेअरबँड, मॅजिक बँड सारख्या वस्तू वापरून आकर्षक रचना होऊ शकतात.
  • रचना आकर्षक असण्याबरोबरच ती कशा प्रकारे कॅरी केली जाते ते देखील महत्त्वाचे असते. त्यामुळे शक्यतो सवयीच्या रचनांमध्येच वैविध्य आणणे चांगले.
  • केशरचना करण्यापूर्वी केस स्वच्छ धुतलेले असणे गरजेचे आहे. केसाला तेलकटपणा असेल तर चांगली केशरचना होणार नाही.
  • केसांना रंग दिलेला आवडत असेल, तर एखादी वेगळ्या रंगातील बट रचनेत गुंफल्यानंतर हटके लुक देऊ शकते.
  • सध्या केसांच्या रंगांमध्ये चॉकलेट रोझ, पमकिन, ग्रे, स्मोकी व्हॉयलेट ही थोडीशी जांभळट करडी शेड, वेगळे काही आवडत असेल तर मर्मेड ब्लू किंवा डेनिम ब्लू, ऑटम रेड या रंगांचा ट्रेंड आहे.
  • आपल्या चेहऱ्याचा आकार लक्षात घेऊन हेअरस्टाईल निवडावी.
  • हेअर स्टाईल करण्याइतकेच ती सोडवून केस मोकळे करणेही महत्त्वाचे आहे. स्प्रे, जेली यांचा वापर केला असेल, तर केस थोडे कडक होतात. अशावेळी नाजूकपणे केस मोकळे करावेत. नाहीतर ते तुटण्याची शक्यता असते.
  • केस मोकळे केल्यावर त्याला तेलाने मसाज करून, ते धुवून कंडिशनर लावावे.

सध्याच्या काळात खूप नीटनेटकी केशरचना मुलींना नको असते. लग्न असो नाहीतर एखादा कार्यक्रम मेसी लूकच मुलींना हवा असतो. त्यामुळे केस मोकळे सोडणे किंवा मेसी बनसारख्या केशरचना उत्तम पर्याय ठरतात. उंची व केसांची लांबी, पोत पाहून केशरचना ठरविता येतात. यात पोषाखही महत्त्वाचा असतो. बाजारातही अनेक बन्स विकत मिळतात. घरच्या घरी सोप्या पद्धतीने हे बन्स लावता येऊ  शकतात.

सुरेखा भगत, हेअर स्टायलिस्ट

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2016 3:27 am

Web Title: hairstyles fashion
Next Stories
1 कर्करोगासाठी ‘एनआयसीपीआर’, ‘आयुष’मध्ये करार
2 चालणे, सायकलिंगचा फायदा मधुमेही रुग्णांना
3 संधिवातामुळे हृदयविकाराचा धोका
Just Now!
X