योगेश आहिरे – response.lokprabha@expressindia.com
ट्रेकर्स ब्लॉगर
ठरलेला ट्रेक अचानक रद्द झाला. हातात उरलेल्या अर्ध्या दिवसात एखादा झटपट ट्रेक करायचे ठरले. माथेरान व्हाया सनसेट पॉइंट आणि हाश्याची पट्टी हा मस्त ट्रेक तेवढाच झकास पार पडला.

शनिवार-रविवार दोन दिवसांचा ट्रेक काही कारणास्तव बारगळला. रविवारी सकाळी नऊ वाजता ट्रेकर मित्र सतीश कुडतरकर सोबत बोलणे झाले. त्यानुसार तासाभरात भेटून किमान अध्र्या दिवसाचा तरी ट्रेक करून येऊ असं ठरलं. अध्र्या दिवसात सहज होऊ शकेल असा सोप्पा आणि साधा ट्रेक म्हटल्यावर क्षणात माझ्या डोळ्यासमोर माथेरान आलं. १५ दिवसांपूर्वीच पिसारनाथ शिडीच्या वाटेने जाऊन आलो होतो. त्यानंतर हाश्याची पट्टी मनात होतीच, त्यासोबत सनसेट पॉइंटची वाट जोडायचं ठरवलं. दहा सव्वादहाच्या सुमारास सतीशला डोंबिवलीतून घेऊन बुलेटवरून पनवेल नेरेमाग्रे धोदाणीत पोहोचेपर्यंत साडेबारा वाजले. धोदाणीतून मंकी पॉइंट, सनसेट पॉइंट, हाश्याची पट्टी माग्रे लुईझा पॉइंट आणि उत्तरेला पेब किल्ल्यासमोरच्या डोंगराला वळसा घालत पेब किल्ल्यामाग्रे माथेरान (धोदाणीतील मंडळी नेरळच्या बाजूला जाण्यासाठी अजूनही हाच मार्ग वापरतात.) या चार प्रचलित वाटांनी माथेरान गाठता येते.

UFO spotted during solar eclipse viral video
सूर्यग्रहण लागताना आकाशात दिसले ‘UFO’? व्हिडीओत कैद झालेले दृश्य पाहा; तुम्हीही व्हाल चकित
navi mumbai buses marathi news, navi mumbai bus poor condition marathi news
डिझेल बसगाड्यांची दुरवस्था, एनएमएमटीच्या डिझेलवरील बसगाड्यांची तात्पुरती डागडुजी करण्यावर भर
Thief snatches mangalsutra of woman when she was busy in making reels
धक्कादायक! भरदिवसा रस्त्यावर रिल करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र चोरट्यांनी नेले ओढून, Video व्हायरल
Ten people were poisoned by eating shingada shev
नागपुरात शिंगाड्याचे शेव खाताच मळमळ, उलट्या, पोटदुखी! झाले असे की…

यातील मंकी पॉइंट आणि पेब माथेरानची वाट आधी झाली होती. धोदाणेश्वर महादेव मंदिराजवळ जोमा चौधरी यांच्या घरासमोर गाडी लावली. हेल्मेट त्यांच्या घरात ठेवून बाटलीत पाणी भरून निघालो. डावीकडे माथेरानच्या पॅनोरमा पॉइंटपासून मंकी पॉइंटपर्यंतचा भाग होता. मंदिरामागून टेपाडावर चढलो. समोर आंब्याचे मोठे झाड होते. तिथून थोडय़ा अंतरावर अगदी तसेच एक मोठे वडाचे झाड होते. धोदाणीतून सनसेट पॉइंट व चिंचवाडीकडे जातानाच्या या खुणा. भर दुपारी चांदण्यात चालताना पहिल्या दहा मिनिटांतच काय वाटले असेल हे सांगायची गरज नाही!

वडाच्या झाडाखाली सावलीत बसलो तेव्हा सनसेट पॉइंटकडून खाली उतरलेल्या डोंगर सोंडेवर थोडा झाडोरा पाहून बरे वाटले. थोडी विश्रांती घेऊन पाण्याचे घोट घेत पुढे निघालो, उजवीकडे चिंचवाडीची वाट सोडून डावीकडे मुख्य वाटेने चढाईला सुरुवात झाली. उन्हाचा तडाखा होता. तसेही सह्यद्रीत सर्व ऋतूत भटकणे होतच असते. उलट त्याचं विविध हंगामात वेगवेगळे रूप अनुभवणे, त्यानुसार इथल्या निसर्गात घडणारा बदल, जसे हवा, पाणी, झाडी, वनस्पती, फळं, फुलं, पक्षी, प्राणी हे सर्व जाणून घेण्यासाठी ठरावीक काळाचे बंधन नसते. योग्य नियोजन, अभ्यास, आत्मविश्वास सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वत:ची शारीरिक व मानसिक क्षमता ओळखून उन्हाळी भटकंती चांगल्या प्रकारे जमू शकते. अर्थात कसलेल्या ट्रेकर्सना हे सांगायची गरज नाही. सुरुवातीच्या पानगळीच्या जंगलातून वाट थोडी वर जाताच उजवीकडून चिंचवाडीतून येणारी वाट येऊन मिळाली. वाटेत बरीच गावकरी मंडळी भेटली, भर उन्हात निघालोय याचं त्यांनाही नवल वाटले. जिथे, जेव्हा सावली मिळेल त्या ठिकाणी थांबून दम खात पुढं निघायचं असाच क्रम होता. छोटंसं वळण (ट्रॅव्हर्स) घेऊन ठरावीक उंचीवर आलो तेव्हा डावीकडे पेब किल्ला स्पष्ट नजरेत आला, तर पाठीमागे मलंगगड, तावली, म्हैसमाळ व चंदेरी. अरुंद नाकडय़ावरचा छोटासा टप्पा पार करून वाट जंगलात शिरली. आडवं जात मधला ओढा पार करून मंदिरापाशी आलो.

एक किस्सा राहिलाच सांगायचा.. मंदिराच्या थोडे अलीकडे वाटेत दोघे जण भेटले. अगदी भेदरलेल्या अवस्थेत. आम्हाला पाहताच आमच्याकडे पाणी मागितले. पाणी दिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा नूरच पालटला. बहुधा त्यांनी बऱ्याच वेळानंतर माणसं पहिली असावीत, असं वाटत होतं. बोलणं झाल्यावर कळलं की, दोघे मूळचे नगर भागातले. पनवेलजवळ कुठेतरी कामाला होते. या वाटेने माथेरानला जायला निघालेले. पण सकाळपासून वाट चुकून भटकत कुठूनतरी कसेतरी मूळ वाटेला लागले. सोबत पुरेसं पाणी, खायचं प्यायचं सामान नाही. वाट चुकल्याने अतिरिक्त श्रम होऊन उन्हात दमछाक झालेली, त्यामुळे वर न जाता अध्र्यातून बहुतेक मंदिरापासून परतत होते. तसं पाहिलं तर ही एकदमच साधीसोपी आणि सरळ वाट होती. पण ही नवखी माणसं पुरेशी माहिती आणि तयारीअभावी अशीच निघालेली. त्यांना दोनचार गोष्टी समजावून सांगून परतीच्या वाटेवर लावून दिलं.

मंदिराच्या आवारात मस्त झाडी आणि मोकळी जागा होती. जुन्या दगडाला शेंदूर फासलेल्या या देवाजवळ गणपती बाप्पा व हनुमान यांच्या मूर्ती, शिविलग तसंच साईबाबांचा फोटो होता. मूळ मंदिर कुणाचं ते काही कळलं नाही. असो. पण मंदिराची जागा मात्र खूप प्रसन्न होती. इथून पुढे मस्त जंगलातून आडवी चाल होती. याला हवं तर छोटा पदर म्हणता येईल. नंतर सौम्य चढाई, वाटेत केळी, खजूर, सरबत असं एक एक करत पाऊण तासात झाडीच्या टप्प्यातून बाहेर आलो तेव्हा वर सनसेट पॉइंटचं टोक आणि त्यावरील रेिलग स्पष्ट दिसलं. पॉइंटच्या कडय़ापर्यंत अंदाजे दोन अडीचशे फूट चढाई बाकी होती. कडा डावीकडे आणि दरी उजवीकडे अशी मळलेली वाट होती. एका वळणावर खाली पदरातले जंगल, त्यामागे हाश्याच्या पट्टीकडून आलेला दांड, त्याच्याही मागे निमदा डोंगर, पलीकडे म्हातारीची िखड होती. हीच िखड गेल्या पंधरवडय़ात पिसारनाथच्या वाटेने चढताना पलीकडच्या बाजूने पाहिली होती.

या सर्वाच्या मागे पश्चिमेला दूरवर प्रबळगड आणि कलावंतीण दुर्ग होता. पदरातल्या टप्प्यातून निघाल्यावर अवघ्या दहा मिनिटातच रेिलग जवळ आलो. तीन वाजत आले होते. समोर स्टॉलवर स्थानिक तरुण सायंकाळी होणाऱ्या गर्दीसाठी तयारीला लागला होता. पॉइंटच्या मोकळ्या मदानात मोठय़ा झाडांखाली बसायला पार होता. स्टॉलवाल्याकडून पाणी घेऊन सतीश तिथेच थांबला. मी म्हटलं, आलो आहोत तर टोकावर जाऊन येऊ. स्टॉलच्या मागून दोन चार पायऱ्या उतरून निमुळत्या टोकावर गेलो. याच पॉइंटला पॉक्र्युपाइन पॉइंट असेही म्हणतात. टोकावरून पश्चिमेकडे प्रबळगड कलावंतीण दुर्ग, खाली चिंचवाडी धोदाणी होते. आम्ही आलो ती वाट, पूर्वेला मंकी पॉइंट, हार्ट पॉइंट ते पार ईशान्येला पॅनोरमा पॉइंटपर्यंतचा माथेरानचा झाडीभरला भाग होता. संपूर्ण माथा गर्द झाडीने व्यापलेला होता. मागे कुठेतरी वाचलेलं की माथेरानमध्ये दर एकरी दोन हजारपेक्षा अधिक झाडे आहेत. त्यात ४० पेक्षा अधिक वेगवेगळ्या प्रकारांची आहेत.

उजव्या बाजूला मंकी पॉइंटच्या मधली दरी होती. त्यात झेपावलेले सरळसोट कडे होते. पावसाळ्यात याच कडय़ातून अनेक धबधबे याच दरीत स्वत:ला झोकून देतात. तसेच पेबच्या िखडीतून येणारे ओढे धोदाणी गावाच्या दिशेने जात पुढे गाढेश्वर तलावात मुख्य भर घालतात. मंकी पॉइंटपासून पॅनोरमा पॉइंटपर्यंत नीट निरखून पाहिलं तर या भागातल्या कडय़ात भरपूर प्रमाणात दरडी कोसळल्याचं दिसतं. २००५ साली झालेल्या अतिवृष्टीत माथेरानच्या या भागात पेब किल्ला तसेच सिद्धगड भागात बरीच पडझड झाली होती. २०१२ साली मंकी पॉइंटची वाट केली तेव्हा ही भरपूर ठिकाणी वाट खचलेली. आता त्या पट्ट्यात झाडी, गवत नाही. थोडेफार असेल ते उन्हाने आणि वणवा लावून जळून नष्ट झालेले आहे.

सनसेट पॉइंटहून निघून लुईझा पॉइंटच्या दिशेने चालू लागलो. आता उन्हाची फिकीर नव्हती. होती ती मस्त गर्द झाडांच्या सावलीतून वाट. मला माथेरानच्या या लाल चिरांच्या वाटा फार आवडतात. वाटेतल्या कोरोनेशन पॉइंटवर घटकाभर जाऊन आलो. तिथून पुढच्या दहा मिनिटात लुईझा पॉइंटवर आलो. इथं पॉइंटवर परीट घडीच्या र्पयटकांची तुरळक गर्दी होती.  स्टॉलवाले हाश्याच्या पट्टीचे राहाणारे.  त्यांनी विचारलं, ‘सनसेटहून आलात ना’! मी म्हणालो, ‘हो आणि आता हाश्याच्या पट्टीतून खाली उतरणार’. भेळ संपवून पॉइंटवर आलो. माथेरानचा नऋत्येला असलेला हा प्रसिद्ध पॉइंट आहे. याच्या बरोब्बर खाली तीनेकशे फुटांवर लहान वाडी दिसते. तीच हाश्याची पट्टी.

हाश्याची पट्टी याआधी बऱ्याच वेळा इथून पाहिलेली आणि आज भेट देण्याचा योग आला होता. उजवीकडे प्रबळगड, कलावंतीण सुळका डावीकडे इको पॉइंट, लॉर्ड्स पॉइंटपासून दूरवर वन ट्री हिलपर्यंतचा भाग होता. दक्षिणेकडे मोरबे धरण, इर्शाळगड, लॉर्डस पॉइंट, इको पॉइंटचा कडा होता. याच इको पॉइंटच्या घळीतून दोन तीनशे फूट खाली उतरून कडय़ातून आडवे चालत सतीश आणि त्याच्या ‘गिरीविराज’ हायकर्सच्या टीमने हनिमून पॉइंट आणि लॅण्डस्केप पॉइंटची प्रस्तर िभतीची चढाई केली होती. तसेच लुईझा पॉइंटला चिकटून असणारा सुळकादेखील सर केला होता. त्या मोहिमेतल्या बऱ्याच आठवणी सतीशने सांगितल्या. घडय़ाळात पाहिले साडेचार वाजत आले होते. लुईझा पॉइंटच्या थोडं अलीकडे एक घर लागतं. त्याच्या अलीकडे कमानीतून पायऱ्या उतरत थेट हाश्याच्या पट्टीत उतरता येते. सुरुवातीला बांधलेल्या पायऱ्या आहेत, त्या पुढे मोठी, प्रशस्त वाट आहे. ती नागमोडी वळणं घेत बरोब्बर मारुती मंदिर समोर येते. बाजूलाच जिल्हा परिषदेच्या शाळेचे स्वच्छ आवार आहे. आमच्यासारख्या डोंगर भटक्यांची तिथे मुक्कामाची छान सोय होते. वाटेत एका कंपनीने सीएसआर उपक्रमअंतर्गत बसविलेल्या पाण्याच्या टाक्या आहेत. एरवी पावसाळ्यात इथे भरपूर पाणी असले तरी उन्हाळ्यात अशा दुर्गम वाडी वस्त्यांवर भीषण पाणीटंचाई जाणवते. त्यामुळे या कामाचे कौतुक करावे तेवढे कमीच.

४०-५० घरांच्या या हाश्याच्या पट्टीत इयत्ता चौथीपर्यंत शाळा आहे. पुढच्या शिक्षणासाठी माथेरानला जावं लागतं. पण पावसाळ्यात तिथं येणं-जाणं अवघड होतं. नाहीतर मग खाली गावातल्या आश्रम शाळेतला पर्याय आहे. अगदीच थोडी पावसाळी शेती सोडली तर एरवी माथेरानमध्ये छोटी मोठी कामं किंवा खालच्या आंबेवाडी, चौक, धोदाणी वगरे गावात जाऊन बिगारी मोलमजुरी हेच इथल्या लोकांचं उदरनिर्वाहाचं साधन आहे. वाणसामान खरेदीसाठीसुद्धा त्यांना हाच मार्ग उपलब्ध आहे. इथं सर्वाचं आडनाव एकच- पारधी. गार पाणी पिऊन, सोबतच्या बाटलीत थोडं पाणी भरून वाटेची चौकशी करून निघालो. हाश्याच्या पट्टीतून मुख्य दोन वाटा निघतात. एक धोदाणीत तर दुसरी दक्षिणेकडे लुईझाला डाव्या हाताला ठेवत वळसा घालत हुंबर्णेत जाते. तिथून पुढे चालत आंबेवाडी कमीत कमी तासभर, त्यामानाने धोदाणीची वाट कमीतकमी वेळात थेट गावात जाते. आंबेवाडीच्या तुलनेत धोदाणीत एसटीच्या फेऱ्या जास्त आहेत. थोडक्यात सांगायचं तर कर्जत भागात जाण्यासाठी हुंबर्णे तर नेरे पनवेलसाठी धोदाणी असे सोपे गणित आहे. आम्ही ज्या घरात थांबलो होतो, तिथल्या मावशीचे माहेर आंबेवाडी, पण ते लोक हुंबर्णेची वाट टाळून वर माथेरान चढून वन ट्री हिलच्या वाटेने थेट आंबेवाडीत जातात. कारण तुलनेत ती वाट अधिक वापराची आणि एकटय़ा दुकटय़ाला सोयीची आहे. मळलेल्या वाटेने मावळतीच्या दिशेला निघालो. सूर्यदेव प्रबळगडामागे निघाले होते. वाडीबाहेरचा हा मदानी भाग फारच आवडून गेला. मागे डावीकडील कोरोनेशन पॉइंटपासून लुईझापर्यंत पूर्ण माथेरानची िभत, समोर प्रबळगड तर दक्षिणेकडे मोरबे धरणाचा परिसर आणि उजवीकडे आम्ही उतरणार होतो तो चिंचवाडी धोदाणीचा भाग होता. या मदानातून प्रबळच्या दिशेने एक दांड उतरत होता. त्यावरची मळलेली पायवाट भलतीच उठून दिसत होती. दोन्ही बाजूला दरी असलेली ही वाट. आधी लुईझावरून पहाताना आम्हाला हीच वाट धोदाणीत जाते की काय असे वाटले होते; पण ही वाट पलीकडे रानात जाऊन निमदा डोंगराच्या िखडीत जाते. क्वचित गुराखी या वाटेने जातात.

याच वाटेवर थोडं खाली उतरल्यावर एक उंबराचे झाड होते. त्याच्याजवळ एक बाकडे आहे. त्या समोरून खाली व्यवस्थित रुळलेली वाट धोदाणीच्या दिशेने उतरते. बाकडय़ावर बसून शांतपणे वाऱ्याची झुळूक अनुभवली. नंतर वेळ पाहून उतरायला सुरुवात केली. वळणावळणाची वाट टप्प्याटप्प्यात उतरते. खालून गावकरी तांदळाचे पोते खांद्यावर डोक्यावर घेऊन येत होते. रेशनचे तांदूळ घेऊन ही मंडळी धोदाणीतून येत होती. पुढे छोटा ओढा पार करून वाट डावीकडे वळली. या वाटेवर थोडाफार झाडोरा आहे. वरून निघालेल्या त्या दांडाला डावीकडे ठेवत आणखी खाली उतरत जंगलातून मळलेल्या वाटेने निघालो. आता एकदम सौम्य उतरणं घेत वाट हाश्याच्या पट्टीतून आलेल्या ओढय़ात उतरली. तसेच दिशेप्रमाणे जात राहिलो. पलीकडे वाट दिसत नव्हती. ओढय़ातून एवढे अंतर चालत ही मंडळी एवढा बोजा घेऊन तिन्ही ऋतूत जातात. खरं तर पावसाळ्यात ओढय़ातून एवढं चालणं अवघडच आहे. थोडं अंतर गेल्यावर डावीकडून आणखी एक वाट बाहेर येऊन ओढा पार करून उजवीकडे गेली. थोडक्यात आम्ही या वाटेने न येता आधीच ओढय़ात उतरलो होतो. साधारण चढउतार पार करत रानाच्या बाहेर आलो. उजवीकडे आम्ही दुपारी चढलो ती सनसेट पॉइंटची वाट होती. थोडे डोळे बारीक करून पाहिलं तर सनसेट पहायला रेिलगवर जमा झालेली माणसं ठिपक्यांसारखी दिसत होती. पावसाळी शेती केलेल्या बांधावरून मळलेली वाट होती. त्याच ठिकाणी गावातली पोरं क्रिकेट खेळत होती. एका मोठय़ा चिंचेच्या झाडाजवळ येताच डावीकडे खालच्या बाजूला उतरत चिंचवाडीची वाट गेली. आम्ही तसेच पुढे निघत दुपारी थांबलो होतो त्या वडाच्या झाडाखाली आलो. धोदाणीत शेवटचा टप्पा उतरत असताना समोर, दुपारच्या उन्हात करपून निघालेले म्हैसमाळ चंदेरी, नािखडा, पेब मावळत्या प्रकाशात खुलून दिसत होते.
सौजन्य – लोकप्रभा