‘लवकर निजे, लवकर उठे, त्यास आरोग्य लाभे’ असे म्हणतात. पण बदलत्या जीवनशैलीमुळे झोपेचा कालावधी रोडावला आहे. अपुरी झोप झाल्याने हमखास सर्दी होते, असा दावा अमेरिकी शास्त्रज्ञांनी केला आहे.
प्रत्येक व्यक्तीला दररोज रात्री सात तास झोप घेणे आवश्यक आहे. मात्र सहा किंवा त्यापेक्षा कमी झोप झाल्यास विषाणूंचा प्रसार होऊन सर्दी होते, असे मत या शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे.
कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांनी ‘आपल्या आरोग्यासाठी झोपेचे महत्त्व’ या नावाचा अहवाल तयार केला आहे. ‘‘माणसाला नैसर्गिक झोप मिळणे खूपच आवश्यक आहे. जर अपुरी झोप मिळाली तर माणूस लगेच आजारी पडतो. त्याला हमखास सर्दी होते,’’ असे या संशोधकांच्या चमूचे नेतृत्व करणारे प्रा. अॅरिक प्राथर यांनी सांगितले.
पुरेशी झोप आपल्या आरोग्यासाठी आवश्यक आहे, हे यापूर्वीच शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे. ज्या लोकांना चटकन झोप लागत नाही किंवा ज्यांची दररोज अपुरी झोप होते, असे लोक नेहमी आजारी पडतात. पुरेशी झोप झाली असेल तर आपले रक्ताभिसरणही व्यवस्थित होते, असे प्रा. प्राथर यांनी सांगितले. मात्र पुरेशी झोप झाली नसेल, तर सर्दीच्या विषाणूचा प्रसार होतो, हे या शास्त्रज्ञांनी प्रयोगानिशी सिद्ध करून दाखविले आहे. त्यासाठी त्यांनी १६४ जणांचा अभ्यास केला. ज्या लोकांची पुरेशी झोप झाली आहे, ते ताजेतवाने वाटले, पण ज्यांची पुरेशी झोप झाली नाही, त्यांना सर्दी झाल्याचे दिसून आले.
पुरेशी झोप झाली नसेल तर तात्काळ एखाद्या विकाराचा संसर्ग होती. विषाणूंचा प्रसार होऊन सर्दी होते. त्यामुळे प्रत्येकाने किमान सात तास झोप घेणे आवश्यक आहे.
– प्रा. अॅरिक प्राथर,
संशोधक
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 7, 2015 6:37 am