करोना विषाणूच्या संसर्गापासून बचावासाठी सध्या डॉक्टरांपासून सर्वच तज्ज्ञ मंडळी आपल्याला वारंवार हात धुण्याचा सल्ला देत आहेत. हे खरंच गरजेचं आहे का? असे अनेकांच्या मनात प्रश्नही येत असतील. याचं उत्तर विविध व्यक्तींच्या सवयींच्या एका निरिक्षण अभ्यासातून समोर आलं आहे.

या अभ्यासानुसार, आपल्याला प्रत्येक २० मिनिटांनंतर हात स्वच्छ धुणे गरजेचं आहे. कारण, कोणताही विषाणू हातांच्या मार्फतच आपल्या शरिरात प्रवेश करु शकतो. कारण, हातांचा आपण चेहऱ्याला विविध कारणांसाठी वारंवार स्पर्श करीत असतो. यामध्ये नाक, डोळे, तोंड या अवयवांना स्पर्श होतो. या अवयवांच्या मार्गाने करोनासारखा विषाणूही आपल्या शरिरात प्रवेश करु शकतो.

खरतंर तुम्ही किती वेळा हात धुता हे देखील संसर्गापासून प्रतिबंध करण्यासाठी पुरेसं नाही. यासाठी सर्वात प्रभावी प्रतिबंधात्मक बाब म्हणजे शक्य तेवढ्या कमी वेळा चेहऱ्याला हाताचा स्पर्श होईल याकडे लक्ष देणं. मात्र, चेहऱ्याला हात न लावणे हे वाटतं तितकं सोप काम नाही. यामध्ये कोणत्या प्रकारची व्यक्ती किती वेळा आपल्या चेहऱ्याला हाताचा स्पर्श करते ते या अभ्यासातून समोर आलं आहे. याबाबत टाइम्स ऑफ इंडियानं American Journal of Infection Control या नियतकालिकाच्या http://www.ajicjournal.org या वेबसाईटच्या हवाल्यानं वृत्त दिलं आहे.

वैद्यकीय विद्यार्थी चेहऱ्याला २३ वेळा हातांचा करतात स्पर्श

या अभ्यासातील निरिक्षणानुसार, ऑस्ट्रेलियातील २६ वैद्यकक्षेत्रातील विद्यार्थ्यांचे निरिक्षण केले असता असे आढळून आले की, ते प्रत्येक तासाला सरासरी २३ वेळा आपल्या चेहऱ्याला हाताचा स्पर्श करतात. यापैकी सर्वसाधारणपणे नाक, तोंड आणि डोळे या अवयवांना हा स्पर्श केला जातो. २०१५ मध्ये हा निरिक्षण अभ्यास झाला आहे.

कार्यालयीन काम करताना १६ वेळा लोक चेहऱ्याला हातांचा स्पर्श करतात

२००८ मध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार, हाताचा चेहऱ्याला स्पर्श करण्याचे प्रमाण आणि श्वसनातून संसर्ग होण्याचे प्रमाण हे कार्यालयीन काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये जास्त आढळते. या अभ्यासानुसार, कार्यालयात काम करणारे कर्मचारी तासाभरात १६ वेळा आपल्या चेहऱ्याला हाताचा स्पर्श करतात.

डॉक्टर्स १९ वेळा करतात चेहऱ्याला हातांचा स्पर्श

२०१४ मधील एका अभ्यासानुसार, डॉक्टरांच्या काही गटांचे निरिक्षण करण्यात आले आहे. यामध्ये ही डॉक्टरमंडळी आपल्या चेहऱ्याला दोन तासांत १९ वेळा हातांचा स्पर्श करतात. मात्र, आपल्या हातांची व्यवस्थित स्वच्छता करुनच ते असा स्पर्श करतात.