काय यार ही किती दादागिरी करते. हिला वाटतं हिचा नवरा हीचं ऐकतो म्हणजे ऑफिसमधल्यानी पण तिचं ऐकायला हवं, बॉस असली म्हणून काय झालं, सगळ्यांसमोर ती बोलली की लाज निघते पार. समजते काय ही स्वतःला…बाई आहे तर बाई सारखंच का नाही राहात, उगाच तोरा दाखवायला जाते. ही काय स्वत:ला डॉन समजते का? थांब आता दाखवतोच हीला….असे संवाद ऑफिसमध्ये महिला बॉसच्या मागे सर्रास ऐकू येतात. महिलेला बॉस म्हणून मान्य करणं आणि तिचं ऐकून घेणं हे काळ कितीही पुढे गेला तरी म्हणावं तितकं रुजलं नाही. महिलांनी आपल्या क्षमता सिद्ध केल्या खऱ्या, त्यामुळे त्या वरिष्ठ पदावरही पोहोचल्या. पण स्त्री बॉस पुरुषी मानसिकतेला आजही म्हणावी तितकी पटलेली नाही. महिलेच्या हाताखाली काम करणे यात पुरुषांना आजही कमीपणाच वाटतो. महिला असून ही मला सगळ्यांसमोर कसे काही बोलू शकते असा प्रश्न या पुरुष सहकाऱ्यांना अनेकदा पडतो.  काही जण हे स्पष्ट बोलून दाखवतात तर काही बोलून न दाखवता कृतीतून ते व्यक्त करतात.

पुरुषी मानसिकता, पुरुषप्रधान संस्कृती, पुरुषी अहंकार हे शब्द ऐकायला काही प्रमाणात जड वाटतात. आम्ही कुठे तुम्हाला कमी लेखतो? असं म्हणत असले तरीही प्रत्यक्ष वेळ आली की स्त्रियांना या मानसिकतेचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. मग कितीही पुढारलेले, शिकलेले पुरुषही याला अपवाद राहत नाहीत. यात त्यांची चूक आहे का नाही, समाज आणि पूर्वीपासून चालत आलेल्या रुढी यांमुळे हे झाले का हा आणखी एक स्वतंत्र विषय आहे. पण कामाच्या ठिकाणी प्रमुख पदावर काम करणाऱ्या महिलांना येणारे अनुभव म्हणावे तितके चांगले नसतात.

आता इथेच या महिला बॉसची खरी कसोटी असते. तिला आपल्या कर्मचाऱ्यांकडून कामही करून घ्यायचे असते, त्यांना दुखवायचेही नसते आणि परिस्थिती नीट राहील असेही पहायचे असते. मग तिची खरी कसरत सुरू होते, कधी इतर सहकार्यांमार्फत काम करून घेत, कधी गोड बोलून एखाद्या पुरुषी मानसिकतेला सामोरे जात तर कधी स्वतःवर ताबा ठेऊन तिला परिस्थितीशी दोन हात करावे लागतात. पण स्त्री कितीही संयमी, समजून घेणारी, सगळ्यांना घेऊन पुढे जाणारी असली तरी तीही एक माणूस असते आणि त्यामुळे तिलाही काही मर्यादा असतातच हे सगळ्यांनीच मान्य करायला हवे. पण परिस्थिती हाताबाहेर गेली की त्यामुळे होणारा त्रागा, त्याचा तिच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होणारा परिणाम, त्यामुळे तिची होणारी चिडचिड आणि याचा परिणाम म्हणून तिचे बिघडणारे कौटुंबिक आणि सामाजिक संबंध असे चक्र नकळत सुरू होते. यामुळे एकूणच वातावरण खराब होते आणि असे घडणे सगळ्याच बाबतीत अनारोग्याचे लक्षण आहे.

त्यामुळे केवळ बॉस म्हणूनच नाही तर स्त्रीला स्त्री म्हणून वागवण्यापेक्षा माणूस म्हणून तिच्याकडे पाहिले तर अनेक गोष्टी सहज शक्य होतील. त्यामुळे हीच स्त्री तिच्याकडे असणाऱ्या क्षमतांपेक्षा कित्येक पटीने जास्त चांगले काम करू शकेल. याचा वातावरण चांगले राहण्याचा फायदा होईलच पण स्त्रियांचे सामाजिक स्तरावरील स्थान उंचावण्यासही याची निश्चितच मदत होईल. चला तर मग या महिला दिनाच्या निमित्ताने आपण स्त्री सहकारी आणि बॉसकडे माणूस म्हणून पाहण्याचा संकल्प करूया…..

 

sayali.patwardhan@loksatta.com