‘बोअरिंग…. सुपरबोअरिंग…. ठार कंटाळवाणं आयुष्य जगतेय मी काही कळतंय का तुला? की न करण्याचा आव आणतेयस तू?’ रिमा तिच्या शेजारच्याच डेस्कवर बसलेल्या डेझीला उद्देशून म्हणत होती. डेझी तिच्या मोबाईलमध्येच डोकावत असल्यामुळे रिमाला आलेला तो ठार कंटाळा तिच्या रागाचा पारा आणखी चढवत होता. पण, डेझीने ज्या अंदाजात रिमाला उत्तर दिलं ते पाहून ती पुरती हललीच. बेब्स यू नीड अ नाईट आऊट. इनफॅक्ट वी ऑल नीड अ नाईट आऊट. रिमासाठी नाईट आऊट हा शब्द नवा नसला तरीही तिच्यासाठी स्वत: एखाद्या नाईट आऊटचा भाग होणं हे तिच्यासाठी नवीनच होतं. वयाच्या २३ व्या वर्षापर्यंत आजपर्यंत एकदाही तिने नाईट आऊट वगैरे केला नव्हता. मुळात ती काहीशी चौकटीबद्ध राहणाऱ्या मुलींच्या पठडीतीलच एक. त्यामुले अतीक्रांतीकारी विचार असल्यामुळे ही आपल्यात नकोच असं म्हणून तिच्या नजरेआड कित्येक असे बेत आखले गेले होते. पण, यावेळी मात्र ही अतिक्रांतीकारी रिमा डेझी पुढे नरमली आणि चक्क नाईट आऊटचे बेत आखू लागली होती.

वाचा : Women’s Day 2018 : ट्रेकिंगच्या वळणवाटांवरची स्वच्छंद ‘ती’

ऑफिसच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत या पोरींच्या नाईट आऊटच्या चर्चा सुरु होत्या. मुळात या चर्चा त्यांच्या प्लॅनपेक्षा त्या नाईट आउटला नेमकं करणार काय याविषयी जास्त रंगत होत्या. मुळात बाजूच्या डेस्कवरचा ध्रुव मोठ्या उत्साहात आला आणि म्हणाला, तुमच्या नाईट आऊटमध्ये काय, मालिकांच्या पुढचा प्लॉट कसा असणार यावर चर्चा होणारेय वाटतं, ती एचआरमधली स्मृती खरेदीला कोणासोबत गेली होती… तो कोण होता, याचा शोध घेणार आहात तुम्ही?
ध्रुवच्या या आचरट प्रश्नावर डेझीने त्याच्यावर फक्त एक कटाक्ष टाकला ज्यानंतर तो आल्यापावली परत गेला. विकेंड असल्यामुळे त्या दिवशी तसं ऑफिसमधलं वातावरण थंडावलेलं होतं. प्रत्येकजण सुट्टीच्या मूडमध्ये होता. त्यामुळेच डेझीने संधी साधतच हा नाईट आऊटचा प्लॅन केला होता. ऑफिसमधली ही चौकडी तिच्याच घरी जाणार होती. रेवती, निशा, डेझी आणि रिमा या चौघी ऑफिसमधून निघतेवेळीसुद्धआ अगदी ऐटीत निघाल्या. जणू काही मोहिमच फत्ते करण्यासाठीच जातानाचा उत्साह त्यांच्या चेहऱ्यावरुन झळकणार असे भाव होते.

एकटी रिमा सोडली तर नाईट आऊट वगैरे बाकीच्या तिघांना सवयीचं होतं. मुळात रिमा कितीही नाही म्हणाली तरीही तिलाही या दिवसाची, अहं… या रात्रीची प्रतिक्षा होती. कारण, तिला या गोष्टीचा अनुभव घ्यायचा होता. नाईट आऊट सुरु झाला… आणि बस्स… मग काय… घड्याळ, मोबाईल हे म्हणजे किस झाड की पत्ती असं म्हणत चौघींनीही गप्पांना सुरुवात केली. आज त्यांच्यात कसलेही वाद, ऑफिसच्या टार्गेटच्या चर्चा किंवा काही वायफळ गप्पा नव्हत्याच. आज उत्सवमूर्ती रिमा असल्यामुळे तिच्यापासूनच गप्पांची सुरुवात झाली होती. ज्याप्रमाणे मुलांमध्ये ‘मुली’, चर्चेचा विषय असतो त्याचप्रमाणे या ‘वुमनिया’सुद्धा मुलांची मापं काढण्यात… हो मापचं काढण्यात अजिबात कचरत नाहीत, याची प्रचिती तेव्हा रिमाला आली. बघता विषय वाढत गेले आणि आयुष्याकडे पाहण्याचे प्रत्येकाचे दृष्टीकोन समोर आल्यावर रिमा काहीशी भारावली. अरे या त्याच मुली आहेत ना ज्या ऑफिसमध्ये आरशासमोर लिपस्टीक लावत, ती नीट करत उभ्या असतात यावर तिचा अर्ध्या मिनिटासाठी विश्वासच बसेना.

या नाईट आऊटमध्ये कसल्याच सीमा नसल्यामुळे सर्व स्तरावरच्या चर्चा, गप्पा, शंकानिरसन आणि एकमेकींच्या आयुष्यातले काही असे किस्से समोर आले, ज्यामुळे ती रात्र एका वेगळ्याच वळणवाटेच्या घाटातील प्रवासारखी वाटत होती. वरवर स्मार्ट, हॉट आणि मादक वाटणाऱ्या डेझीच्या मनात पुरुषांप्रती असणारी चीड आणि त्यातही तिची भूमिका रिमासाठी नवी होती. पुरुषांसाठी ज्याप्रमाणे बऱ्याचदा महिला म्हणजे शरीरसुखाचं साधन असतात त्याचप्रमाणे डेझी त्यांच्याकडे पाहात होती. तर रिमाचं प्रकरण वेगळं होतं. खरंतर त्या रात्री खरी रिमा सर्वांसमोर उलगडली होती. नाईट आऊट आणखीनच बोल्ड होत गेला होता… बेसुमार नाचणं असुदे किंवा दारुचा प्याला एका घोटात घटकन पिणं असूदे, तिचं हे रुप पाहून रमचा घोट घेताना रेवतीला चांगलाच ठकसा लागला होता. त्यांच्या या नाईट आऊटमध्ये लग्नबिग्न आणि शॉपिंग बिपिंग अशा काहीच गप्पांची दूरदूरपर्यंत चिन्हं नव्हती. मुळात या मुली स्टार्पअपच्या विचारात होत्या. आता हे नवं काय खुळ हाच प्रश्न तुम्हालाही पडेल. पण हेच खरं होतं. कारण त्या एका रात्रीने या मुलींच्या आयुष्यात एक वेगळीच पहाट आणली होती. त्या रात्री डोक्याच आलेल्या एका कल्पनेवर या मुलींनी मेहनत घेण्याचं ठरवलं आणि आता त्या चौघीही अॅडव्हेंचर ट्रॅव्हल आणि इव्हेंट मॅनेजमेंटची यशस्वी कंपनी चालवत होत्या. हा नाईट आऊटचा किस्सा रिमाच्या डोळ्यांसमोर अगदी तसाच्या तसाच जिवंत होता. गॉसिप, रडगाणी, फॅशन ट्रेंडच्या चर्चा या साऱ्याच्या पलीकडे जाऊन झालेल्या एका नाईट आऊटने चार मैत्रीणींच्या आयुष्यात वेगळं वळण आणलं आणि त्यानंतर पुढे जाऊन असे नाईट आऊट होतच गेले…. होतच आहेत… होतच राहतील…

sayali.patil@loksatta.com