15 December 2018

News Flash

Women’s day 2018 : रिअल इस्टेटमध्येही तिचाच डंका

पुरुषप्रधान क्षेत्रात महिलांची उल्लेखनीय कामगिरी

Women’s day 2018 : रिअल इस्टेटमध्येही तिचाच डंका

आपला देश हा पुरुषप्रधान देश असूनही आता प्रत्येक क्षेत्रात महिला आगेकूच करताना दिसत आहे. कठीणातील कठीण कामात महिलावर्ग उतरून त्यांचे कर्तृत्व जगासमोर दाखवताना दिसत आहेत. खरं तर महिलांबद्दल बोलण्यासाठी किंवा लिहिण्यासाठी केवळ जागतिक महिला दिनाची गरज नसावी. वैमानिक, पोलिस, डॉक्टर, इंजिनीअर, सुरक्षा रक्षक, सैनिक, रायडर, अग्निशामक अधिकारी, राजकारणी, बिझनेस अशा अनेक क्षेत्रांत आज महिला धडाडीने पुढे येताना दिसत आहेत. कॉर्पोरेट क्षेत्रही याला अपवाद नाही. कॉर्पोरेट क्षेत्रात महिलांची आघाडी विशेष उल्लेखनीय आहे. रिअल इस्टेट क्षेत्र म्हटलं तर या क्षेत्रात पुरुषांचंच वर्चस्व अधिक असं म्हणणारे खूप आहेत, पण याच संकल्पनेला मोडून काढत आता महिलांनी रिअल इस्टेट जगात प्रवेश घेतला आहे. जागतिक महिला दिनानिमित्त रिअल इस्टेट आणि कॉर्पोरेट जगामध्ये प्रगतीच्या शिखरावर पोहोचलेल्या महिलांचा घेतलेला हा आढावा..

रिअल इस्टेट पाहायला गेलं तर खूप खोल आणि अभ्यास करण्याजोगा विषय आहे. पण हा खूप किचकट विषय असल्यामुळे या क्षेत्रामध्ये खूप कमी लोक वळलेले दिसतात . पुरुषांना अशा क्षेत्रात जास्त रस असतो आणि किचकट कामामुळे फक्त पुरुष या क्षेत्रात काम करू शकतात असा समज आहे. पण याच संकल्पनेला मोडीत काढत रिअल इस्टेटमध्ये आपलं स्थान मानाने निर्माण करणारी महिला मंजु याज्ञिक. नरेड्को सारख्या राष्ट्रीय स्तरावरील रिअल इस्टेटच्या संस्थेमध्ये मंजु याज्ञिक या महाराष्ट्राच्या उपाध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत. नरेड्कोसह ‘नाहर ग्रुप’च्या देखील त्या उपाध्यक्षा आहेत. कुरुक्षेत्र विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण झाल्यावर मंजु यांनी आव्हानात्मक क्षेत्र निवडण्याचा निर्णय घेतला व त्यांनी नाहर ग्रुप जॉईन केला. इथे त्यांचा रिअल इस्टेटमधील प्रवास सुरू झाला. एवढेच नव्हे, तर नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काऊन्सिलच्या उपाध्यक्षा म्हणूनही काम पाहतात. नुकताच मंजु यांना रिअल इस्टेट व बांधकाम क्षेत्रातील कामगिरीसाठी महिला सुपर अचिव्हर हा पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला आहे. रिअल इस्टेट जितकं कठीण आहे त्याचा आभासदेखील तितकाच आव्हानात्मक! पण ज्या मुलांना रिअल इस्टेट मध्ये आपलं भविष्य उज्ज्वल करायचं असेल त्यासाठी रेमी (रिअल इस्टेट मॅनेजमेंट इन्स्टिटयूड) सारखी शैक्षणिक संस्था पुढे आली. या संस्थेला यशस्वीपणे पुढे नेणारीसुद्धा एक महिलाच आहे. शुभिका बिल्खा या तरुणीने रेमी मध्ये शिकणारा प्रत्येक विद्यार्थी हा रियल इस्टेट मॅनेजमेंट मध्ये सम्यक ज्ञान घेऊनच बाहेर पडेल याची खात्री दिली. शुभिका बिल्खा रेमीची बिझनेस हेड असून त्यांनी तंत्रज्ञान आणि शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात काम केलेलं असून याआधी स्वत: दोन कॉर्पोरेट कंपन्या देखील स्थापित केल्या आहेत.

manju yagnik and shubhika मंजु याज्ञिक, शुभिका बिल्खा

सामान्य लोकांना बाहेरून फॅशन इंडस्ट्री खूप चकमकीत आणि रंगीत दिसते. पण त्या मागे केलेल्या मेहनतीची माहिती सहसा कोणाला नसते. सध्या चर्चेत असलेली वेबसाईट ‘स्टाईलक्रॅकर’ खासकरून तरुणींमध्ये प्रसिद्ध आहे. मात्र या अनोख्या वेबसाईटमागे अर्चना वालावलकर या मराठमोळ्या महिलेचा हात आहे. अर्चना यांनी ऑनलाइन शॉपिंगला एक वेगळा चेहरा दिला आहे. अर्चनाने आलिया भट्ट , दीपिका पदुकोण, कतरीना कैफसारख्या अनेक सुप्रसिद्ध अभिनेत्रींचे स्टायलिंग करता करता ‘स्टाईलक्रॅकर’ची निर्मिती केली आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अभिनेत्री आलिया भट्टनेदेखील तिच्या मेहनतीचे कौतुक करत स्टाईलक्रॅकरमध्ये गुंतवणुकही केली.

Archana Walavalkar अर्चना वालावलकर

बऱ्याच लोकांची अशी धारणा झालेली आहे की कॉर्पोरेट आणि बिझनेस क्षेत्रामध्ये फक्त पुरुष कार्यरत राहू शकतात. कारण त्यांना घराची जबाबदारी, घरातील कामं, मुलाबाळांचा सांभाळ या गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज नसते किंबहुना त्यासाठी घरातील स्त्री एकमेव उपाय असते. मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून महिला आपल्या चौकटीबाहेर जात विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करून दाखवली आहे. मात्र पुरूषप्रधान संस्कृतीला आव्हान देत आजच्या युगात महिला त्यांच्या विरोधकांना आपल्या कर्तृत्वाने सडेतोड उत्तर देत आहेत.

First Published on March 8, 2018 11:49 am

Web Title: happy womens day 2018 remarkable women who proved themselves in real estate