Harley-Davidson आणि चिनी मोटरसायकल क्षेत्रातील दिग्गज कंपनी Qianjiang संयुक्तपणे एक स्वस्त आणि परवडणारी Harley-Davidson मोटरसायकल बाजारात उतरवण्याच्या तयारीत आहे. सध्या केवळ या बाइकचं ‘डिझाइन स्केच’ समोर आलं आहे. अन्य कोणताही फोटो समोर आलेला नाही. पण भारतात ही बाइक लाँच झाल्यास Royal Enfield च्या बुलेटला तगडी टक्कर मिळेल असं म्हटलं जातंय.

या बाइकच्या प्रोडक्शनसाठी परवानगी मिळाली आहे. आता कंपनी आपल्या ‘बेबी हार्ले’च्या प्रोडक्शनला सुरूवात करणार असल्याचं स्पष्ट झालंय. या नव्या बाइकमध्ये 338 cc क्षमतेचं पॅरेलेल-ट्विन इंजिन असेल. ‘मोअर रोड्स टू हार्ले-डेविडसन’ अशी योजना कंपनीनं आखली आहे. त्याद्वारे अनेक देशांत आपला विस्तार करण्याची कंपनीची योजना आहे. ‘मोअर रोड्स टू हार्ले-डेविडसन’अंतर्गत कंपनी नव्या मॉडेलची मालिका सादर करणार आहे. यामध्ये LiveWire इलेक्ट्रिक बाइक, Bareknuckle, Bronx आणि पॅन अमेरिकाचा समावेश आहे.

Harley-Davidson या बाइकमध्ये 338 cc क्षमतेचं इंजिन दिलं जाण्याची शक्यता वर्तवली जातेय. या बाइकचं डिझाइन Benelli 302S प्रमाणे असेल असंही म्हटलं जातंय. ही बाइक दक्षिण-पूर्व आशिया, भारत आणि चीनच्या बाजारात लाँच केली जाऊ शकते. या बाइकचं नाव HD350 असू शकतं. पुढील काही महिन्यांमध्ये या बाइकबाबत अधिक माहिती समोर येईल.