Harley Davidson कंपनीने LiveWire या आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक बाइकचं प्रोडक्शन बंद केलं आहे. ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’च्या वृत्तानुसार, बाइकच्या चार्जिंग इक्विपमेंटमध्ये आलेल्या समस्येमुळे कंपनीने प्रोडक्शन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. काही बाइकमध्ये अशाप्रकारची समस्या उद्भवली होती असंही कंपनीने स्पष्ट केलंय.

घरांमधील लोअर व्होल्टेज आउटलेट्समध्ये चार्जिंग करताना समस्या उद्भवू शकते असं कंपनीने म्हटलं आहे. अंतिम गुणवत्ता तपासणीदरम्यान ही बाब समोर आल्यानंतर प्रोडक्शन आणि डिलिव्हरी बंद करण्याचा निर्णय घेतला व पुन्हा अतिरिक्त चाचण्यांना सुरूवात करण्यात आली असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. प्रोडक्शन पुन्हा केव्हा सुरू केलं जाईल याबाबत कंपनीकडून अद्याप काहीही माहिती देण्यात आलेली नाही. कंपनीकडून ग्राहकांना या बाइकसाठी डीलरशिप्समध्येच चार्जिंग करण्याची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे. बाइकच्या गुणवत्तेबाबत तडजोड केली जाणार नाही असं कंपनीने स्पष्ट केलं आहे.

आणखी वाचा- 16 वर्षांचा प्रवास थांबणार? Karizma लव्हर्ससाठी बॅड न्यूज !

कंपनीने LiveWire ही इलेक्ट्रिक बाइक सर्वप्रथम २०१४ मध्ये कॉन्सेप्ट मोटरसायकल (concept motorcycle) म्हणून सादर केली होती. त्यानंतर हा प्रोजेक्ट बराच चर्चेत राहिल्यानंतर अचानक गायब झाला. नंतर कंपनीने नोव्हेंबर २०१८ मध्ये ही बाइक पुन्हा सादर केली. सप्टेंबर महिन्यापासून कंपनीने या बाइकची डिलिव्हरी सुरू केली होती. जवळपास ३० हजार डॉलर (सुमारे २२ लाख रुपये) या बाइकची किंमत आहे. यात १५.५ kWh बॅटरी आणि मॅग्नेटिक मोटर आहे. याद्वारे १०५ hp ऊर्जा निर्माण होते. अवघ्या तीन सेकंदांमध्ये ही बाइक ० ते १०० किलोमीटर प्रति तास वेग पकडते असा कंपनीचा दावा आहे. १७७ किमी प्रतितास इतका टॉप स्पीड असलेली ही बाइक ४० मिनिटांत ८० टक्के आणि एक तासात १०० टक्के चार्ज होते.