आजच्या तरुणाईमध्ये नवनवीन फॅशन करण्याची तुफान क्रेझ आहे. त्यामुळे बाजारात येणाऱ्या प्रत्येक गोष्टी ट्राय करण्यावर त्यांचा भर असतो. त्यातच जर ट्रेंडी रहायचं असेल तर मग त्या अनुषंगाने एखादी हटके स्टाईल कॅरी करणं हे ओघाओघाने आलंच. यामध्ये सनग्लासेस किंवा गॉगल्स यांचं आजच्या तरुणांना विशेष वेडं आहे. तरुणाईची ही आवड लक्षात घेता अनेक सनग्लासेस कंपन्यांनी वेगवेगळ्या आकाराचे, रंगाचे गॉगल्स बाजारात आणले. अनेक वेळा हे सनग्लासेस प्लास्टिक किंवा फायबरचे असतात. मात्र पहिल्यांदाच पर्यावरणपूरक असे सनग्लासेस बाजारात उपलब्ध होणार आहेत. विशेष म्हणजे हे सनग्लासेस कॉफीपासून तयार करण्यात येणार आहे.

युक्रेनमधील आयवेअर ब्रँण्ड ‘ओचिस’ ही कंपनी विशेष लोकप्रिय असून ट्रेंडी सनग्लासेस तयार करण्यासाठी ती कंपनी ओळखली जाते. अनेक वेळा नवनवीन ट्रेंड बाजारात आणण्याचा प्रयत्न करणारी यावेळी पर्यावरणपूरक अशा सनग्लासेसची निर्मिती करणार आहे. ही कंपनी लवकरच कॉफीपासून सनग्लासेस तयार करणार आहेत.सनग्लासेस फॅशनेबल असण्यासोबतच ते इको-फ्रेंडली असावेत याकडे कंपनीचा कल असल्यामुळे त्यांनी कॉफीपासून सनग्लासेस तयार करण्याता निर्णय घेतला आहे.

“जगभरामध्ये कॉफीचं अनेक ठिकाणी उत्पन्न घेण्यात येण्यात येतं. त्यामुळे लागणारे टाकाऊ घटक हे सहज उपलब्ध होतील. त्यातच कॉफीचा रंगही काळा असतो आणि तरुणाईकडून काळ्या रंगाच्या फ्रेम्सला पसंती असते आणि कॉफीचा रंगही काळाच असतो. त्यामुळे या फ्रेम्स करणं अधिक सोपं आहे. त्याच हे सनग्लासेस फेकून दिले तरी त्यापासून खतनिर्मिती करता येऊ शकते”, असं ओचिस या कंपनीकडून सांगण्यात आलं.

दरम्यान, या सनग्लासेसची किंमत ५ हजारांपासून सुरू होणार आहे. यापूर्वी कंपनीने पुदिना, पासर्ली, वेलचीपासून सनग्लासेसची फ्रेम तयार करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना अपयश आलं.