सतत डोकेदुखीचा त्रास होणाऱ्यांना आता लवकरच दिलासा मिळणार आहे. डोकेदुखी सुरू होण्याआधीच ती रोखणाऱ्या औषधाचा शोध नुकताच लावल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.

नव्या औषधामुळे डोकेदुखीसाठी कारणीभूत ठरणाऱ्या घटकांवर प्रभावी उपचार करणे शक्य आहे. तसेच, डोकेदुखी सुरू होण्याआधीच त्यावर नियंत्रण मिळविणे शक्य आहे.

डोकेदुखीवर बाहेर कोणताही उपचार न घेणाऱ्यांना हे औषध अधिक उपयोगी ठरणार आहे, असे अमेरिकेतील थॉमस जेफरसन विद्यापीठातील स्टेफन डी. सिल्बरस्टन यांनी सांगितले. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार जगभरातील अंदाजे १२७ ते ३०० दशलक्ष लोकांना डोकेदुखीचा त्रास होतो. महिनाभरात अंदाजे १५ वेळा हा त्रास होत असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. डोकेदुखी रोखण्यासाठी अनेक उपचार करूनही ती थांबत नसेल तर ती कमजोरी ठरते.

संशोधकांनी शोधलेल्या नव्या औषधाचे नाव फ्रेमॅनेझुमाब असे असून ते डोकेदुखीवर प्रभावी ठरणारे आहे.

हे औषध डोकेदुखी सुरू होण्याआधीच रोखते असा दावा संशोधकांनी केला आहे. डोकेदुखीला साहाय्यभूत ठरणाऱ्या कॅल्सिटोनिन या प्रथिनावर हे औषध थेट परिणाम करते, असेही संशोधकांनी स्पष्ट केले आहे. हे संशोधन नुकतेच ‘न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.