ब्रिटन आणि भारत या दोन देशांमधील आरोग्य आणि त्याच्याशी जोडलेल्या विविध क्षेत्रांतील गुंतवणूक आणि सहकार्यविषयक झालेल्या सामंजस्य कराराविषयी चर्चा करण्यासाठी ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य सेवेचे (एनएचएस)चे अध्यक्ष सर मालकोम गॅ्रन्ट यांच्या नेतृत्वाखाली एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ भारतभेटीवर आले आहे.

या प्रतिनिधी मंडळाचा भारतदौरा हा सुनियोजित असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ब्रिटन दौऱ्यावेळी दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी आरोग्य क्षेत्रातील भरीव गुंतवणूक आणि परस्पर सहकार्यासाठी भर देण्याचे मान्य केल्याचे ब्रिटनच्या उच्च आयोगाच्या सूत्रांनी सांगितले. त्याचबरोबर या भेटीदरम्यान भारत आणि ब्रिटन या दोन्ही देशांमध्ये ११ आरोग्य संस्थांच्या उभारणीवरदेखील विशेष भर दिला जाणार आहे.

या अंतर्गत जून ६ ते ८ ला ब्रिटनमधील आधुनिक आरोग्य क्षेत्रातील आघाडीवर असलेल्या २३ कंपन्यांचे एक पथक मुंबईला भेट देणार असून भारताच्या स्मार्ट हेल्थ केअरच्या मोहिमेला या अंतर्गत पाठिंबा दिला जाणार आहे.

या वेळी सर मालकोम यांच्या हस्ते दिल्लीतील एका प्रदर्शिनीचे उद्घाटन केले जाणार असून त्यादरम्यान आरोग्य मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी आणि उत्तरेकडील प्रमुख रुग्णालयांसोबत आयोजित बैठकीतदेखील सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर आरोग्य क्षेत्रात नावीन्यपूर्ण काम करणाऱ्या विविध कंपन्या आणि गुंतवणूकदार यांच्याशी देखील संवाद साधणार आहेत. तर मुंबईतील एका प्रदर्शिनीचे उद्घाटनदेखील केले जाणार असून याप्रसंगी महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री दीपक सावंत आणि अपोलो हॉस्पिटलचे प्रताप रेड्डीदेखील उपस्थित राहणार आहेत. या वेळी महाराष्ट्रातील आरोग्यविषयक विविध सेवांचे सक्षमीकरण आणि खासगी रुग्णालयांच्या, नावीन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या कंपन्या आणि मुंबईच्या किंग एडवर्ड मेमोरियल (केईएम) वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांशीदेखील संवाद साधणार आहेत.