पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती होती. त्यामुळे घरातील प्रत्येक सदस्य रात्रीचं जेवण एकत्र बसून जेवत असे. कौलारु घर आणि चुलीसमोर शेणाने सारवलेल्या जमिनीवर बसून जेवण करण्याची रंगत त्याकाळी काही औरच होती. मात्र काळ बदलत गेला तसं सारं काही बदललं. एकत्र कुटुंब पद्धती लोप पावली. शेणाच्या जमिनीऐवजी डायनिंग टेबल आले. परंतु हे नवीन बदल माणसाने जितके पटकन स्वीकारले तितक्याच वेगाने त्यांच्या मागे नवनवीन आजारही लागले. पूर्वी जमिनीवर बसून जेवल्यामुळे त्या काळातील कोणत्याही व्यक्तीला संधीवात, कंबरदुखी, वाढलेलं वजन या समस्या नव्हत्या. मात्र आजच्या काळात या समस्या अनेकांना आहेत. त्यामुळे जमिनीवर बसून जेवणाचे नक्की काय फायदे आहेत हे आपण जाणून घेऊयात.

१. पचनक्रिया सुधारते –
ज्यावेळी आपण जमिनीवर जेवायला बसतो त्यावेळी सहाजिकच मांडी घालून बसतो. ही स्थिती अर्धपद्मासनाची असते. या स्थितीमध्ये बसल्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. जेवणाचं ताट जमिनीवर असल्यामुळे जेवणाचा घास घेण्यासाठी वाकावं लागतं. त्यामुळे शारीरिक हालचाल होते. परिणामी, पोटाजवळील स्नायूंना चालना मिळते व पचनाची क्रियादेखील सुधारते.

२. वजन घटवण्यास मदत होते –
जमिनीवर बसून जेवल्यामुळे मेंदू शांत होतो आणि आपलं संपूर्ण लक्ष जेवणावर केंद्रीत होतं. त्यामुळे शरीराला आवश्यक तेवढं जेवण आपण जेवतो. टेबलापेक्षा जमिनीवर बसून जेवल्याने, जेवणाचा वेग मंदावतो व पोट आणि मेंदूतील समन्वयता सुधारते. परिणामी अतिप्रमाणात खाण्याची वृत्ती कमी होते व वजनही नियंत्रणात राहते.

३. लवचिकता वाढवते –
पद्मासनात बसल्याने, पाठीचे, कमरेतील तसेच पोटाजवळील स्नायूंवर ताण आल्याने पचनसंस्थेचा मार्ग सुधारतो. पोटाजवळील स्नायूंवर ताण आल्याने शरीर लवचिक व आरोग्यदायी बनण्यास मदत होते.

४ शरीराची स्थिती सुधारते –
शरीराची स्थिती उत्तम राखणे हे निरोगी आरोग्याचे गमक आहे. उत्तम शारीरिक स्थितीमुळे काही अपघात टळू शकतात तर शरीरातील काही स्नायू व सांध्यांवरील अतिरिक्त ताण कमी करून थकवा कमी होण्यासदेखील मदत होते. जमिनीवर बसून जेवताना पाठीचा कणा ताठ राहतो व पोट, खांदा व पाठीच्या स्नायूंची योग्य प्रमाणात हालचाल होते.

५. गुडघे व कमरेतील सांधे मजबूत होतात –
जमिनीवर पद्मासनात बसल्यामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते. पचन संस्थेसोबतच सांधेदुखीचा त्रास होत नाही. गुडघा, घोटा व कंबरेतील सांधे लवचिक राहिल्याने अनेक विकार दूर होण्यास मदत होते.