रात्रीच्या वेळी कृत्रिम प्रकाशाचा वाढता वापर हा केवळ मानवाच्या आरोग्यासाठी चिंतेची बाब नसून त्यामुळे परिस्थितीकीचीही मोठी हानी होत असल्याचे एका अभ्यासात दिसून आले आहे. (परिस्थितीकी म्हणजे सजीवांचा त्यांच्या सभोवतालच्या भौतिक वातावरणाशी येणारा संबंध. यात विशिष्ट भागातील सर्व प्राणी तसेच वनस्पतींचा परस्परांशी तसेच वातावरणाशी येणारा संबंध व परिणाम याचा समावेश आहे.)
याबाबत अमेरिकेतील ओहियो स्टेट विद्यापीठाच्या माईका सुलिव्हन यांनी सांगितले की, रात्रीच्या कृत्रिम प्रकाशामुळे पर्यावरणातील केवळ सजीवांवरच नाही, तर त्यांचे समुदाय व परिस्थितीकीवरही परिणाम होतो, हे दाखविणाऱ्या पहिल्या काही अभ्यासांपैकी हा एक अभ्यास आहे.
‘जर्नल इकोलॉजिकल अॅप्लिकेशन्स’ या पत्रिकेत हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. त्याच्या वरिष्ठ लेखिका असलेल्या सुलिव्हन म्हणाल्या की, रात्रीच्या वेळी वापरल्या जाणाऱ्या कृत्रिम प्रकाशाचे परिणाम हे संपूर्ण परिस्थितीकीवर होतात. अनेक लोकांना याची जाणीव नसली तरी, कृत्रिम प्रकाश हा प्रदूषणकारी असून मानव-प्राणी तसेच वनस्पतींचे नैसर्गिक जीवनचक्र त्यामुळे बदलत आहे.
या अभ्यासातून कोलंबस आणि परिसरातील जलप्रवाह आणि पाणथळींच्या जागांवर प्रकाशाचा काय परिणाम होतो आहे हे दिसून आले. प्रवाहांवर तेथील कृत्रिम प्रकाशाचा होणारा परिणाम संशोधन पथकाने तपासला. त्यांनी पाणथळींच्या ठिकाणी प्रकाशाचे नियमन केले. या सर्व ठिकाणी झाडांचा पर्णसंभार आणि पृष्ठभागावरील सजीवसृष्टीने अशा प्रकाशाचा परिणाम रोखण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणांहून संशोधकांनी अपृष्ठवंशीय जलचर, भूचरांच्या अनेक प्रजाती गोळा केल्या. प्रकाशाच्या तीव्रतेनुसार या प्रजातींची रचना बदलत असल्याचे संशोधकांना दिसून आले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 23, 2018 12:06 am