हवाप्रदूषणाचे दुष्परिणाम आता सर्वत्र अधिक ठळकपणे दिसण्यास सुरुवात झाली आहे. हवामानातील सतत होणाऱ्या बदलामुळे २०३० मध्ये हवाप्रदूषणाची संबंधित अकाली मृत्यू येणाऱ्यांची संख्या जागतिक स्तरावर ६० हजार आणि या शतकाच्या अखेरीस २ लाख ६० हजार इतकी होणार असल्याचा इशारा एका अभ्यासात देण्यात आला आहे. अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना (यूएनएससी) युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी याबाबत अभ्यास केला. बदलत्या वातावरणाचा शरीरावर होणाऱ्या संभाव्य परिणामांचा त्यांनी अभ्यास केला. हे परिणाम अतिशय नकारात्मक असल्याचे त्यांना आढळून आले. वातावरणातील बदलामुळे हवाप्रदूषण होऊन त्याचा शरीरावर कसा व्यापक परिणाम होतो याबाबत करण्यात आलेले हे आतापर्यंतचे सर्वात मोठे संशोधन आहे, असे संशोधकांनी सांगितले. वातावरणामध्ये झालेला बदल हवाप्रदूषकांवर (प्रदूषण घडवून आणणारे घटक) परिणाम करतो. त्याचा जगभरातील लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. वायुप्रदूषकांच्या संपर्कात आल्यामुळे प्रत्येक वर्षी लाखो लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता असल्याचे संशोधकांनी सांगितले.

सध्या पृथ्वीतलावरील तापमानामध्ये कमालीची वाढ होताना दिसत असून, त्यामुळे रासायनिक प्रतिक्रिया होण्यास गती मिळत आहे. त्याचाच परिपाक म्हणून प्रदूषके तयार होत असून, त्याचा फटका ओझोनला बसत आहे. यामुळे सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

ज्या ठिकाणी कोरडे हवामान आहे, त्या ठिकाणीही हवाप्रदूषणामध्ये वाढ होऊ शकतो. कमी पाऊस पडणे, आगीचे तसेच धुळीमुळेही प्रदूषणामध्ये वाढ होते. या प्रदूषणामुळे अकाली मृत्यू येण्याचे प्रमाण वाढणार असल्याचा इशारा संशोधनामध्ये देण्यात आला आहे. हे संशोधन ‘नेचर क्लायमेट चेंज’ या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे.