News Flash

आरोग्य विमा किती रुपयांचा असावा ?

सर्व गोष्टींचा योग्य पद्धतीने विचार करायला हवा

सध्या आरोग्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. कोणत्याही व्यक्तीला आरोग्याच्या तक्रारी कधी आणि कशा उद्भवतील सांगता येत नाही. पण एकाएकी आपल्या कुटुंबातील व्यक्ती आजारी पडल्यास आपण आपल्या पैशांचे व्यवस्थापन कसे करणार असा प्रश्न घरातील जबाबदार व्यक्तीला पडतोच. मग रुग्णालयाचा खर्च करताना अक्षरश: दमछाक होते. आरोग्य विम्याचा उत्तम पर्याय आपल्याकडे असतो. त्याचा योग्य पद्धतीने वापर करणे आवश्यक आहे.

आरोग्य विमा वापरा

अनेक भारतीयांना अजूनही असे वाटते की, ते फक्त त्यांच्या मेहनतीच्या कमाईतूनच हॉस्पिटलायझेशनचा खर्च करू शकतात. चिंतेची बाब म्हणजे, २०१६ च्या राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणामधून ८० टक्क्यांहून अधिक भारतीयांकडे कोणत्याही प्रकारचा आरोग्य विमा नाही. यांपैकी कितीतरी लोक अडी-अडचणीच्या वेळी लागेल असा विचार करून त्यांचे उत्पन्न रोख स्वरूपात बाळगतात. विशेषत: कुटुंबातील सदस्य आजारी पडला तर. त्यामुळे तुम्ही तुमच्या हॉस्पिटलायझेशनचा खर्च आरोग्य विमा योजनेमार्फत करायला हवा. सहसा, अशा योजनेसाठी दरवर्षी काही हजार रुपयांहून जास्त खर्च येत नाही. यामुळे तुमचे कष्टाने कमावलेले पैसे म्युच्युअल फंडामार्फत संपत्ती निर्माण किंवा कर्जाची परतफेड अशा जास्त अर्थपूर्ण उपक्रमांकडे तुम्हाला वळवता येतात.

गरजेची गणना कशी करावी?

प्रथमत:, कोणीही आरोग्यविमा विना राहू नये. हे तुमचे भाडे किंवा हप्ते भरण्याइतके किंवा किराणा सामान घेण्याएवढे महत्त्वाचे आहे. ही एक मूलभूत गरज आहे, हे समजून घेऊन आरोग्य सुरक्षेच्या गरजांची गणना कशी करावी यासाठी काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे.

वय : तुमचे वय जेवढे जास्त असेल, तेवढी तुमची आरोग्यविम्याची गरज जास्त असते. म्हणूनच ४० वर्षांची व्यक्ती तुलनेने अधिक निरोगी असणाऱ्या २५ वर्षीय व्यक्तीहून जास्त प्रिमियम भरते. तुमचे वय वाढते, तसे तुम्ही जास्त सुरक्षा मिळवू पाहता.
आरोग्य : तुमचे भूतकाळात हॉस्पिटलायझेशन झाले आहे किंवा तुमच्यावर उपचार झालेले आहेत का? भविष्यात तसेच उपचार तुमच्यावर पुन्हा होण्याची शक्यता आहे का? जर हो, तर तुम्ही किमान आवश्यक सुरक्षा म्हणून उपचाराच्या खर्चांचा वाढत्या महागाईनुसार विचार करावा.

कौटुंबिक इतिहास : अनेक रोग आनुवंशिक असतात. तुम्ही तुमच्या जवळच्या कौटुंबिक सदस्यांच्या आरोग्याचा इतिहास तपासून पाहावा आणि तुम्ही वारशाने मिळवलेल्या काही आरोग्य संबंधित जोखमी आहेत का ते समजून घ्यावे. या रोगांच्या उपचारांच्या खर्चाची गणना करून, तुम्ही पायाभूत सुरक्षा रक्कम समजून घेऊ शकता.

तुम्ही कुठे राहता : तुम्ही जर मोठ्या शहरात राहत असाल, तर तुमच्या स्थानिक रुग्णालयातील खर्चांचे तुम्ही मूल्यांकन करायला हवे. कारण कोणत्या शहरात राहता यावरही तुमच्या हॉस्पिटलायझेशनचा खर्च अवलंबून असतो.

तुमचे उत्पन्न : एक उपयुक्त नियम म्हणजे तुमच्या सध्याच्या वार्षिक उत्पन्नाच्या किमान १०० टक्के असणारी सुरक्षा बाळगणे. असे समजा की तुमचे वय ३० वर्षे आहे आणि तुम्ही वर्षाला ५ लाख रुपये कमावता, तर तुमची सुरक्षेची रक्कम निदान तेवढी असायला हवी.

उपचाराचा प्रकार : प्रत्येक आरोग्य विम्याचे स्वत:चे काही प्रस्ताव असतात. मात्र पॉलिसी घेताना सर्व गोष्टींचा योग्य पद्धतीने विचार करणे आवश्यक आहे. तुम्ही अशी पॉलिसी विकत घ्यावीत जी तुम्हाला उपचारादरम्यान हवी असणारी सोय घेऊ देते.
पॉलिसी घेण्याची आदर्श रचना

२० लाख रुपयांचा विमा खरेदी करणे

प्रत्येक व्यक्ती वर दिलेल्या परिमाणांनुसार त्याची स्वतंत्र विम्याची आवश्यकता मोजू शकते. एक ३० वर्षीय व्यक्ती, जी वर्षाला ५ लाख रुपये कमावते. पाहूयात विमा खरेदी करताना कोणती काळजी घ्यायला हवी….

पायाभूत सुरक्षा : ५ लाख रुपयांच्या  पायाभूत आरोग्य सुरक्षेने सुरुवात करा. आरोग्य सुस्थितीत असलेली तरुण व्यक्ती म्हणून, तुम्ही ही मर्यादा ओलांडण्याची शक्यता कमी असते. तुमच्यासाठी किमान आवश्यक विम्याच्या रकमेची सुरुवात रु ५,२०० च्या जवळपास होईल. तुम्ही अधिक चांगली वैशिष्ट्ये मिळवण्यासाठी जास्त प्रिमियम भरू शकता.

टॉप-अप सुरक्षा : आता, तुम्ही टॉप-अप सुरक्षेचा विचार करायला हवा. धरून चालू की तुमच्या आरोग्याच्या जोखमी जास्त आहेत. एक नवी, नियमित पॉलिसी घेण्याऐवजी, तुम्ही टॉप-अप पॉलिसी घ्यायला हवीत जी तुम्ही तुमची पायाभूत सुरक्षा वापरून संपल्यानंतरच वापरली जाते. १५ लाख रुपयांच्या टॉप अपसाठी, तुमचे वार्षिक प्रिमियम वर्षाला रु. १९४७ पासून सुरु होतात, जी अतिशय कमी रक्कम आहे.

म्हणूनच, साधारण ७२०० रुपयांमध्ये, तुम्ही वर्षाला २० लाखांचे संरक्षण मिळवलेले असते. यामुळे बहुतेक आरोग्य संबंधित परिस्थितींमध्ये तुम्ही सुरक्षित राहू शकता. तुम्ही तरुण असताना विमा घेणे महत्त्वाचे असते. आरोग्य योजना आयुष्यभर नुतनीकृत करता येऊ शकत असल्याने, तुमच्या प्रिमियमच्या खर्चांत लक्षणीय बचत करता येऊ शकते.

 

आदिल शेट्टी

कार्यवाह, बँकबझार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 18, 2017 4:28 pm

Web Title: health insurance policy needed for hospital expenses
Next Stories
1 जिओच्या ३९९ रुपयांच्या रिचार्जवर मिळेल २५९९ रुपयांची कॅशबॅक
2 आनंदी राहण्यासाठी खास टिप्स
3 विविध रोगांविरोधात लसूण उपयुक्त
Just Now!
X