भारतात आरोग्यविषयक मनुष्यबळाची कमतरता आहे. त्यातच तंबाखू सेवनाचे प्रमाण वाढल्याने असंसर्गजन्य रोगांच्या प्रमाणातही वाढ झाली आहे, असे आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी सांगितले. ते जागतिक आरोग्य संस्थेच्या दक्षिण-पश्चिम विभागाच्या ६९व्या सभेत बोलत होते. ही सभा श्रीलंकेतील कोलंबो येथे आयोजित करण्यात आली होती.

नड्डा म्हणाले, भारतात लोकसंख्येचे वाढते प्रमाण हे मोठे आवाहन आहे. भारताप्रमाणे आणखी काही देश व जगात वैद्यकीय मनुष्यबळाच्या कमतरतेचे आव्हान आहे. भारतात वैद्यकीय सुविधांच्या किमती वाढलेल्या आहेत. भारतात तंबाखू सेवन आणि मानसिक ताणाचे वाढते प्रमाण ही मोठी समस्या बनत चालली आहे. भारतात लोकसंख्येच्या प्रमाणात ८५लाख जण असंसर्गजन्य रोगांमुळे दगावतात. भारत या रोगांशी सामना करण्यासाठी प्राथमिक आरोग्य पातळीत सुधारणा करणार आहेत. यासाठी उत्तम योजना राबविल्या जाणार असून संशोधनही हाती घेण्यात येणार आहे. सध्या ही आवाहने जरी मोठी असली तरी भविष्यात आम्ही यातून बाहेर पडू अशी आशा नड्डा यांनी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले, की भारतातील लोकांचे आयुर्मान हे दुपटीने वाढले आहे तर पाच वर्षां खालचा आणि गर्भ मृत्यूदरही ६० टक्क्य़ाने घटला आहे.

(टीप : आरोग्यवार्तामधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी लोकसत्ताचा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)