आर्थिक स्थिती कमकुवत असणाऱ्या लोकांचे आयुर्मान हे २.१ वर्षांनी कमी होत आहे. लठ्ठपणा अथवा मद्याचे अतिप्रमाणात सेवन करण्यामुळे होणाऱ्या मृत्यूपेक्षा गरिबीमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण हे अधिक असल्याचा इशारा नवीन संशोधनात देण्यात आला आहे.

गरिबी आणि कमी शिक्षणाचा आरोग्य आणि लवकर मृत्यू येण्याचा परस्परसंबंध असल्याचे संशोधकांना आढळून आले आहे. या घटकांवर विचार करणे आवश्यक असल्याचे संशोधकांनी अभ्यासात म्हटले आहे.

इम्पीरियल कॉलेज लंडनने केलेल्या संशोधनानुसार, आरोग्यावर धूम्रपान अथवा बैठी काम करण्यामुळे परिणाम होत असून, त्यामुळे सरासरी २.१ वर्षांनी आयुर्मानामध्ये घट होत असल्याचे दिसून येते.

सामाजिक आर्थिक स्थिती ही वैयक्तिक किंवा कुटुंबाधारित असते. उत्पन्न, शिक्षण, व्यवसाय यांचा आर्थिक स्थितीशी परस्परसंबंध असतो. या घटकांचा आरोग्यावर परिणाम होत असल्याचे यापूर्वी अनेक वेळा सिद्ध झाले आहे. मात्र सामाजिक आर्थिक स्थिती दयनीय असेल तर त्याचा आरोग्यावर आणि इतर घटकांवर मोठय़ा प्रमाणात परिणाम होत असल्याचे संशोधन आतापर्यंत करण्यात आले नव्हते.

आरोग्याच्या धोरणांमध्ये गरिबी आणि कमी शिक्षण यांचा धोका विचारात घेण्यात येत नाही. मात्र यामुळे आरोग्यावर परिणाम होऊन मृत्यू होण्याच्या अनेक घटना घडत असल्याचे संशोधनात म्हटले आहे.

अमेरिका, फ्रान्स, स्वित्र्झलड, पोर्तुगाल, इटली, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियातील १.७ दशलक्ष लोकांचा अभ्यास करून हे संशोधक करण्यात आले आहे. लोकांचा व्यवसाय आणि त्यांच्या मृत्यूचे वय यांच्याबाबत यामध्ये अभ्यास करण्यात आला. तंबाखू, शारीरिक आळस, खराब अन्न घेणे तसेच मद्यसेवनाच्या तुलनेत सामाजिक आर्थिक स्थितीमुळे (गरिबीमुळे) मृत्यू येण्याचे प्रमाण हे जास्त असल्याचे अभ्यासात म्हटले आहे. हे संशोधन लॅन्सेट नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आले आहे.