बेरोजगार असणाऱ्या लोकांच्या तुलनेत, कमी वेतनावर काम करणाऱ्या किंवा अतिशय तणावाची कामे करणाऱ्या लोकांना आरोग्याच्या तक्रारींना तोंड द्यावे लागण्याची शक्यता जास्त असते, असे शास्त्रज्ञांना आढळले आहे. या संशोधनामध्ये भारतीय वंशाच्या एका संशोधकाचा समावेश करण्यात आला होता.

ब्रिटनमधील मँचेस्टर युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी यासाठी वय वर्षे ३५ ते ७५ दरम्यानच्या १ हजार लोकांचा अभ्यास केला. सहभागी झालेले लोक २००९-२०१० मध्ये बेरोजगार होते.

त्यांचा पुढील काही वर्षांत अभ्यास केला असता, त्यांना तीव्र ताण आणि इतर आरोग्याच्या समस्या आढळून आल्या. ही तपासनी हार्मोन्स आणि तणावासंबधित बायोमार्कर वापरून करण्यात आली. मँचेस्टर विद्यापीठाच्या प्राध्यापक तारानी चंदोला यांच्यासह इतर संशोधकांनी या संशोधनामध्ये सहभाग घेतला. जे बेरोजगार होते त्यांच्या तुलनेत ज्यांची अतिशय कमी पगारावर बोळवण करण्यात आली होती, तसेच ज्यांचे काम अतिशय साधारण होते त्यांच्यामध्ये तीव्र ताणाची उच्च पातळी संशोधकांना दिसून आली.

जे लोक चांगल्या दर्जाचे काम करत होते त्यांच्यामध्ये बायोमार्करची पातळी अतिशय कमी आढळून आली. चांगल्या दर्जाचे काम करणे याचा मानसिक आरोग्याशी संबंध आहे. बेरोजगाराच्या तुलनेत खराब काम करण्यामुळे मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात, असे निदर्शनास आले.

चांगले काम करणे हे आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहे. खराब दर्जाचे काम आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते ही बाब कायम आपण लक्षात ठेवायला हवी, असे संशोधकांनी सांगितले. हे संशोधन एपिडेमिलॉजी या आंतरराष्ट्रीय नियतकालिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे.