25 March 2019

News Flash

स्मोकिंग करणाऱ्यांच्या आसपास आहात? मग हे नक्की वाचा

पॅसिव्ह स्मोकिंग धोक्याचे

प्रातिनिधिक छायाचित्र

१४ मार्च हा इंग्लंडमध्ये राष्ट्रीय नो स्मोकिंग डे म्हणून पाळला जातो. स्मोकिंग करणे आरोग्यासाठी धोकादायक असते हे सगळ्यांना माहित असते. मात्र व्यसन असलेल्या व्यक्तीला कळत असूनही या गोष्टी वळत नाहीत. स्मोकिंगबाबतची जगातील आकडेवारी अतिशय धक्कादायक आहे. दरवर्षी ७० लाख लोक स्मोकिंगमुळे मृत्युमुखी पडतात. त्यातील ६० लाख व्यक्ती धूम्रपान केल्याने, तर १० लाख व्यक्ती पॅसिव्ह स्मोकिंगमुळे प्राण गमावतात. ही आकडेवारी जागतिक आरोग्य संघटनेने मे २०१७ मध्ये प्रसिद्ध केलेली आहे.

स्मोकिंग करण्याची विविध कारणे आहेत. कधी ट्रेंड म्हणून तर कधी टेन्शनवर उतारा म्हणून ही कृती केली जाते. कालांतराने व्यक्ती सवयीचा गुलाम होऊन त्याचे व्यसनात रुपांतर होते. धूम्रपानाइतकेच त्यामुळे होणारे सेकंडहॅण्ड म्हणजेच पॅसिव्ह स्मोकिंगदेखील तितकेच धोकादायक असते. आता थर्डहॅण्ड स्मोकिंग अशी पॅसिव्ह स्मोकिंगची एक नवी गोष्ट लक्षात आली आहे. पॅसिव्ह स्मोकिंगचे दोन प्रकार पडतात. पहिल्यात धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीने सिगरेटचा झुरका घेऊन सोडलेला धूर असतो तर दुसऱ्या प्रकारात ‘कश’ न घेता, फक्त हातात धरलेल्या जळत्या विडी-सिगारेटच्या टोकातून, हातात धरलेल्या पाईपमधून, हुक्क्याच्या तंबाखूमधून, तंबाखू जळून येणारा धूर असतो.  हा धूर आजूबाजूच्या निर्व्यसनी व्यक्तींच्या श्वसनातून त्यांच्या फुफ्फुसात जाणे म्हणजे पासिव्ह स्मोकिंग. या धुरात निकोटिन आणि इतर ४०००  विषारी पदार्थ मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना, धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींना होणारे कर्करोगासहित सर्व आजार तितक्याच गंभीरपणे होतात.

दीर्घकाळ होणाऱ्या पॅसिव्ह स्मोकिंगमुळे होणारे आजार 

* घसा, स्वरयंत्र, सायनसेस, मेंदू, मूत्राशय, जठर, गुदाशय, स्तन या महत्वाच्या अवयवांचे कर्करोग होतात.

* हृदय आणि रक्तवाहिन्यांवर विपरित परिणाम होऊन हृदयविकाराचा किंवा अर्धांगवायूचा झटका येऊ शकतो.

* पॅसिव्ह स्मोकिंगमुळे कमालीचे मानसिक नैराश्यही येऊ शकते.लहान मुले सतत आजारी पडू लागतात. त्यांना सर्दी, खोकला, दमा, कान फुटणे असे साधे आणि दमा, ब्रॉन्कायटिस, न्युमोनियासारखे श्वसनाचे गंभीर आजार होण्याची शक्यता असते.

* सिगारेटच्या धुरामुळे या मुलांना दम्याचा अॅटॅक येऊ शकतो. या मुलांना लिम्फोमा, रक्ताचा कर्करोग, मेंदूचे ट्युमर्स तसेच यकृताचे गंभीर आजार होऊ शकतात.

* नवजात अर्भकाचा सिगारेटच्या धुराने श्वास गुदमरून अचानक मृत्यू होऊ शकतो, याला ‘सडन इन्फंट डेथ सिंड्रोम’ म्हणतात.

धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीने सोडलेली धूम्रवलये आणि त्याच्या विडी-सिगारेटमधून निघणारा धूर आपण समजतो तसा विरून जात नाही. काही काळाने, या धुरातील कर्करोग निर्माण करणारी विषारी द्रव्ये वातावरणातील वायूमध्ये विलीन होतात आणि दीर्घकाळ त्यांचे अस्तित्व राहते. हे कण श्वासातून फुफ्फुसात जाऊन आरोग्याला धोकादायक ठरतात. यालाच थर्ड हँड स्मोकिंग म्हणतात. पॅसिव्ह किंवा थर्ड हँड स्मोकिंग जास्त झाले तरच हे त्रास होतात असे नसून, नाममात्र पासिव्ह स्मोकिंगमुळेही हे त्रास उद्भवू शकतात. हे धोके लक्षात घेऊनच सर्व सरकारी, निमसरकारी कार्यालयात, बॅंका, बसेस, रेल्वे, विमानतळ, हॉटेल्स, रेस्टॉरंट, बागा, शाळा-कॉलेजेस, शॉपिंग सेन्टर्स अशा सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान निषिध्द केले गेले आहे. म्हणूनच धूम्रपान करुन स्वतःच्या आणि आपल्या प्रियजनांच्या, मित्रांच्या, सहकाऱ्यांच्या आरोग्याला बाधा आणण्यापेक्षा या सवयीचा त्याग करण्याचा नक्की विचार करा.

-डॉ. अविनाश भोंडवे

फॅमिली फिजिशियन

First Published on March 14, 2018 11:00 am

Web Title: health problems occur due to passive smoking one should stop smoking