अधिक स्थूल किंवा वजनाने अधिक असणाऱ्या व्यक्तींना पुढील आयुष्यात हृदयरोगाचे जास्त धोका असतो, असे नव्या संशोधनातून सिद्ध झाले आहे.

ब्रिटनमधील ब्रिस्टॉल विद्यापीठाच्या वैद्यकीय शाखेतील कैथलिन वेड आणि अन्य संशोधकांनी यासंबंधी केलेल्या संशोधनाचे निष्कर्ष सक्र्युलेशन नावाच्या वैद्यकीय नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहेत.

या संशोधकांनी १७ आणि २१ वर्षांच्या हजारो नागरिकांच्या वजन आणि आरोग्यविषयक घटकांचा अभ्यास केला. त्यात असे दिसून आले की, ज्यांचे वजन जास्त होते त्यांना पुढे आयुष्यात हृदयरोगाचा त्रास उद्भवण्याची शक्यता जास्त होती. त्यामुळे बॉडी-मास इंडेक्स (शरीराचे उंची आणि वजनाचे गुणोत्तर) नियंत्रणता राखल्यास हृदयरोग टाळण्यास मदत होते, असे कैथलिन वेड यांनी सांगितले. अधिक बॉडी-मास इंडेक्स असल्यास शरीराला रक्ताभिसरण करण्यास अधिक ताण पडतो. त्याने रक्तदाब वाढतो.

ही स्थिती बराच काळ कायम राहिल्यास हृदयातील डाव्या बाजूच्या व्हेंट्रिकल या कप्प्याचा आकार वाढतो. तसेच रक्तवाहिन्यांच्या आतील पृष्ठभागावर चरबी साठून धमनीकाठिण्याचाही त्रास होतो. या अभ्यासात असे दिसून आले की, अधिक वजन असलेल्या व्यक्तींमध्ये रक्तवाहिन्यांवर परिणाम होण्यापूर्वीच हृदयाच्या आकारावर परिणाम होण्यास सुरुवात होते. या अभ्यासातून वजनावर नियंत्रण ठेवून हृदयरोग टाळण्यास मदत होऊ शकते, असे संशोधकांनी म्हटले आहे.