नव्वदीच्या दशकात टेलिव्हिजनवर ‘पॉपॉय- द सेलर मॅन’ हे कार्टुन लागायचं. त्यामधील पॉपॉय हा हिरो अंगात शक्ती येण्यासाठी पालक खायचा. या पालकामुळे त्याच्या अंगात दहा हत्तींचे बळ संचारायचे. या माध्यमातून कुठेतरी पालकाची भाजी ही आरोग्यासाठी पोषक असल्याचे मुलांच्या मनावर बिंबवले जात होते. यामुळे लहान मुले नाखुशीने का होईना आपल्या लाडक्या हिरोचे अनुकरण करण्यासाठी पालकापासून बनवलेले पदार्थ खात असतं. मात्र, काही दिवस उलटल्यानंतर पुन्हा मुलांकडून पालक खाण्यास टाळाटाळ करायला सुरूवात होते. हल्लीच्या मुलांची परिस्थितीही यापेक्षा वेगळी नाही. कार्टूनमधला विनोदाचा भाग सोडला तर पालक आरोग्यासाठी खरोखरच गुणकारी असते. पालक खाण्याचे अनेक फायदे असतात.

पालक खाण्याचे फायदे
– पालकामध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस तसेच अमायनो अ‍ॅसिड, प्रथिने, खनिजे, तंतूमय आणि पिष्टमय पदार्थ, अ, ब व क जीवनसत्त्व, फॉलिक अ‍ॅसिड भरपूर प्रमाणात असते. या गुणधर्मामुळे सर्वच आजारांमध्ये पालक ही पथ्यकर अशी भाजी आहे.
– मांसाहार न घेणाऱ्यांसाठी पालक सेवन फायदेशीर आहे कारण मांसाहारातून जेवढय़ा प्रमाणात प्रथिने मिळतात तितकीच प्रथिने पालकातून मिळतात.
– अ‍ॅनिमया या आजारावर पालक अत्यंत उपयुक्त आहे. पालकात रक्तवर्धक गुणधर्म असल्याने रक्तकण निर्माण होण्याची प्रक्रिया लगेच सुरू होते. तसेच पालक रक्त शुद्ध होऊन हाडेही मजबूत बनतात.
– अ जीवनसत्त्वाने परिपूर्ण अशी पालक भाजी खाल्ल्याने डोळ्यांच्या तक्रारी कमी होतात. तसेच रातांधळेपणा या विकारावर पालक हे एक उत्तम परिपूर्ण औषध आहे.