ताजे मासे आणि ऑलिव्ह तेलाचा समावेश असलेल्या परिपूर्ण सकस आहारामुळे स्तनांच्या कर्करोगाचा धोका परतवून लावणे शक्य असल्याचा दावा एका संशोधनानंतर करण्यात आला आहे. या आहारामुळे स्तनांच्या कर्करोगाचा धोका पुन्हा उद्भवू शकत नाही, असेही संशोधकांचे म्हणणे आहे.
या आधी झालेल्या संशोधनानुसार सकस आहार पहिल्या टप्प्यातील कर्करोगाचा धोका कमी करण्यास लाभदायक ठरत असल्याचे सिद्ध झाले आहे. त्याचप्रमाणे हा आहार हृदयरोगालाही प्रतिबंध करणारा आहे. इटलीतील पियासेन्झा रुग्णालयातील संशोधकांनी ३०० महिलांचा अभ्यास करून हा निष्कर्ष मांडला आहे. पहिल्या टप्प्यातील स्तनांचा कर्करोग असलेल्या महिलांची दोन गटांमध्ये विभागणी करण्यात आली. पहिल्या गटातील महिलांना सकस आहार देण्यात आला. तर दुसऱ्या गटातील महिलांना नियमित आहार देण्यात आला. तीन वर्षांनंतर नियमित आहार घेणाऱ्या गटातील ११ महिलांमधील स्तनांचा कर्करोग विकसित झाल्याचे स्पष्ट झाले. तर सकस आहार घेणाऱ्या गटातील महिलांचा कर्करोगाचा धोका टळल्याचे संशोधकांनी सांगितले.
ताजे मासे, पालेभाज्या, डाळी, ऑलिव्ह तेल, दूध या सकस आहारामुळे स्तनांचा कर्करोग पुन्हा उद्भवण्याचा धोका मोठय़ा प्रमाणात टाळता येतो. या आहारामुळे कर्करोगाचा धोका टाळणे शक्य असल्याचे पियासेन्झा रुग्णालयातील क्लाऊडिया बियासिनी यांनी सांगितले.

(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)