दुग्धजन्य पदार्थ, मांस, अंडी यांचे मर्यादित सेवन प्राणघातक स्तनाच्या कर्करोगाला नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयुक्त असल्याचा दावा संशोधकांनी एका अभ्यासात केला आहे. संशोधकांनी यासाठी प्रयोगशाळेत केलेल्या प्रयोगात आहारात अस्पेरॅगिनचे प्रमाण कमी केल्यास त्याचा स्तनाच्या कर्करोगाच्या फैलावावर परिणाम होत असून त्याचा वेग कमी करण्यात मदत होत असल्याचे आढळले. हा अभ्यास जर्नल नेचर या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे. दुग्धजन्य पदार्थ, मांस, अंडी, मासे, बटाटे, अस्पेरॅगस, सोयाबीन, शेंगा, धान्य आदीमध्ये अस्पेरॅगिन अमिनो आम्लांचे प्रमाण जास्त असते. तर बहुतांश फळे आणि भाज्यांमध्ये अमिनो आम्लांचे प्रमाण कमी असते. आहारामुळे आजारावर परिणाम होतो याचे पुरावे सतत आपल्यासमोर येत असून या अभ्यासामुळे त्यात भर पडली आहे, असे अमेरिकेतील सेडर्स-सिनाई वैद्यकीय केंद्राचे सहकारी संचालक सायमन नॉट यांनी सांगितले. या अभ्यासामुळे केवळ स्तनाच्या कर्करोगावरच नाही इतर कर्करोगांच्या उपचारासाठी देखील परिणाम होणार असल्याचे, सेडर्स-सिनाई वैद्यकीय केंद्राचे रवी थडाणी यांनी सांगितले. यासाठी संशोधकांनी स्तनाच्या विकसित कर्करोगाचा अभ्यास केला. जो इतर कर्करोगांच्या तुलनेने अधिक गतीने पेशींमध्ये पसरतो. अभ्यासाचे परिणाम हे अत्यंत सूचक असून आहारात बदल केल्याने एखादी व्यक्ती प्राथमिक उपचाराला कशाप्रकारे प्रतिसाद देते आणि प्राणघातक रोगाची शरीरात वाढ होण्यास कशाप्रकारे परिणाम होऊ शकतात हे कळते, असे ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठाचे ग्रेगरी जे हॅनॉन यांनी म्हटले. या अभ्यासात आता निरोगी लोकांना सहभागी करून त्यांना अस्पेरॅगिनची मात्रा कमी असणारा आहार दिला जाणार आहे. या अभ्यासातून त्यांच्या शरीरातील अस्पेरॅगिन अमिनो आम्लांची मात्रा कमी झाल्याचे आढळून आल्यास कर्करोगांच्या रुग्णांना अस्पेरॅगिनची मात्रा कमी असणारा आहार देऊन पुढील परिणाम पडताळण्यात येणार आहे.