22 November 2017

News Flash

आरोग्यपूर्ण जीवनशैलीमुळे मानसिक आरोग्यात सुधारणा

आरोग्यपूर्ण जीवनशैली राखल्यामुळे मानसिक आरोग्यामध्ये होणारी घसरण रोखणे शक्य आहे.

पीटीआय, वॉशिंग्टन | Updated: September 9, 2017 4:13 AM

आरोग्यपूर्ण जीवनशैली राखल्यामुळे मानसिक आरोग्यामध्ये होणारी घसरण रोखणे शक्य आहे. आरोग्य चांगले राहिल्याने विचार करण्याची क्षमता वयासोबत कायम राहते. त्यामुळे योग्य आहार आणि व्यायामाला जोड देत आरोग्यपूर्ण जीवनशैली निर्माण करण्याचा सल्ला अमेरिकन हार्ट असोसिएशनने दिला आहे.

हृदय आणि मेंदूला पुरेसा रक्तप्रवाह होणे आवश्यक असते. मात्र बऱ्याच लोकांमध्ये त्यांच्या आयुष्यात मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या हळूहळू संकुचित किंवा बंद होत जातात. अशा अवस्थेला अ‍ॅथ्रोसक्लोरोसिस असे म्हटले जाते. हृदयविकाराचा झटका अथवा स्ट्रोक येण्याचे हे प्रमुख कारण आहे.

अ‍ॅथ्रोसक्लोरोसिस होण्याचे अनेक धोके आरोग्यदायी आहार घेणे, आवश्यक त्या प्रमाणात शारीरिक व्यायाम करणे आणि तंबाखूसंबंधित उत्पादने दूर करणे यामुळे टाळता येऊ शकतात, असे संशोधकांनी म्हटले आहे.

ज्या कारणांमुळे अ‍ॅथ्रोसक्लोरोसिस होतो, त्यामधीलच काही कारणे मानसिक बिघाड, अल्झायमर आजार होण्यासाठी कारणीभूत ठरत असल्याचे अमेरिकेतील न्यूरोसायन्स सेंटरच्या फिलिप गोरेलिक यांनी म्हटले आहे.

खालीलपैकी सात सोप्या नियमांचे अनुसरण करून तुम्ही तुमचे जीवन अतिशय निरोगी करू शकता. यामुळे तुमचा फक्त हृदयविकाराच्या येणाऱ्या झटक्यापासूनच बचाव न होता तुमच्या मानसिक आरोग्यामध्येही मोठय़ा प्रमाणात सुधारणा होते, असे गोरेलिक यांनी म्हटले आहे.

आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी रक्तदाब व्यवस्थापित करा, कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवा, रक्तातील साखरेचे प्रमाण सामान्य ठेवा, शारीरिकदृष्टय़ा क्रियाशील अर्थात पुरेसा व्यायाम करा, निरोगी आहार घ्या, अतिरिक्त वजन कमी करा आणि धूम्रपान करू नका. यामुळे तुमची जीवनशैली आरोग्यदायी होऊन अनेक आजार दूर होण्यास मदत होईल, असे त्यांनी म्हटले आहे.

आरोग्यदायी मेंदू म्हणजे लक्ष केंद्रित करणे, एखादी गोष्ट समजून घेणे, शिकणे आणि समजून घेणे, संवाद साधणे आणि भावनांवर नियंत्रण मिळविणे होय. मानसिक आरोग्यामध्ये बिघाड निर्माण झाल्यास वरील कार्ये करण्यामध्ये बाधा निर्माण होते. स्ट्रोक या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या या संशोधनामध्ये तुमचा मेंदू शक्य तितका निरोगी ठेवण्यासाठी तात्काळ पावले उचलण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कारण अ‍ॅथ्रोसक्लोरोसिसमुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, हृदय बंद पडणे अगदी लहान वयातही सुरू झाले आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपले जीवनशैली आरोग्यपूर्ण ठेवण्याकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक असल्याचे संशोधकांनी सांगितले आहे.

First Published on September 9, 2017 4:13 am

Web Title: healthy lifestyle improve mental health