चालण्याच्या संथ गतीमुळे हृदयविकाराचा उच्च धोका असल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनात स्पष्ट झाले आहे.

रोगांसंबंधी महत्त्वपूर्ण संशोधन करणारी ब्रिटमधील ‘युके बायोबँक’ या संशोधन संस्थेने २००६ ते २०१० या कालावधीतील ब्रिटनमधील मध्यमवयीन व्यक्तींच्या आरोग्याचा अभ्यास केला. कर्करोग, हृदयरोग नसलेल्या चार लाख २० हजार ७२७ लोकांची आरोग्यविषयक माहिती गोळा करण्यात आली. त्यानंतर ६.३ वर्षांनी ८,५९८ जणांचा मृत्यू झाला. १,६५४ जणांचा हृदयविकाराने तर ४,८५० जणांचा कर्करोगाने मृत्यू झाल्याचे संशोधकांची आकडेवारी सांगते.

मृत्यू झालेले सर्वजण संथ गतीने चालत असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे आमचे संशोधन महत्त्वाचे ठरते. त्यामुळे हृदयरोग आणि कर्करोगाचा धोका वाढत असल्याचेच स्पष्ट झाले, असे ब्रिटनमधील लायसेस्टर विद्यापीठातील टॉम याट्स या संशोधकाने सांगितले. वेगाने चालणाऱ्यांच्या तुलनेत संथ चालणारांचे हृदयविकाराने मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे स्पष्ट झाल्याचेही याट्स यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे रुग्णांकडून धूम्रपान, विशिष्ट आहार या इतर धोकादायक बाबींची माहिती मिळाली नसल्याचेही याट्स यांनी सांगितले. हे आजार रोखण्यासाठी शारीरिक तंदुरुस्ती चांगली असणे आवश्यक असल्याचे याट्स यांनी सांगितले.