फ्लू किंवा न्यूमोनियाचा संसर्ग झालेल्या लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका सहापटीने वाढत असल्याचा दावा एका अभ्यासात करण्यात आला आहे. श्वसनाद्वारे संसर्ग करणाऱ्या जिवाणूंमूळे हृदयविकाराच्या झटक्याचा धोका अधिक असतो यामध्ये न्यूमोनिया आणि इन्फ्लूएन्झाच्या जिवाणूंचा समावेश आहे. त्यामूळे या संसर्गापासून बचाव आणि लसीकरण हा हृदयविकाराला आळा घालण्याचा एक मार्ग आहे. हृदयविकाराचा झटका, श्वसनाचे आजार हे मागील १५ वर्षांमध्ये जगात सर्वाधिक प्राणघातक ठरले आहे. आणि या आरोग्याच्या समस्यांचा जगातील मोठय़ा लोकसंख्येवर परिणाम होत आहे, असे ब्रिटनमधील लंडन स्कूल ऑफ हायजिन अ‍ॅण्ड ट्रॉपिकल मेडिसिन येथील सहकारी प्राध्यापिका शार्लेट वारेन-गॅश यांनी म्हटले.

फ्लू किंवा न्यूमोनियाची लागण झाल्यानंतर आठवडाभर हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका असतो. हा धोका एका महिन्यापर्यंत राहू शकतो, असे अभ्यासात आढळून आले. यासाठी संशोधकांनी या रोगांचा संसर्ग झालेल्या आणि हृदयविकाराचा एक झटका येऊन गेलेल्या १,२२७ लोकांचा २००४ ते २०१४ दरम्यान अभ्यास केला.

या लोकांमध्ये संसर्गाची लागण झाल्यानंतर आलेला हृदयविकाराचा झटका आणि त्यानंतरच्या काळात आलेल्या हृदयविकाराच्या समस्या यांचे संशोधकांनी विश्लेषण केले. यातून मिळालेल्या माहितीतून फ्लू आणि न्यूमोनियाची लागण झाल्यानंतर तीन दिवस हृदयविकाराच्या झटक्याचा धोका सहा पटीने वाढत असल्याचे आढळले. ६५ वर्षांखालील लोकांना या रोगांमूळे हृदयविकाराच्या झटक्याचा धोका अधिक असल्याचे संशोधकांना आढळले.  हा अभ्यास युरोपियन रेस्पिरोटरी जर्नल या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे.