ज्या व्यक्तींचा रक्तगट ‘ओ’ या रक्तगटाशिवाय वेगळा असतो, त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता अधिक असते, असे संशोधनात दिसून आले आहे. या व्यक्तींना पक्षाघाताची शक्यताही अधिक असते. वैज्ञानिकांनी म्हटले आहे की, ए, बी व एबी रक्तगटाच्या व्यक्तींमध्ये रक्त गोठण्याचे प्रथिन जास्त प्रमाणात असते. ही एक शक्यता असली तरी हृदयरुग्णांनी धूम्रपान सोडून आहार चांगला ठेवला पाहिजे. युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजी काँग्रेसच्या अधिवेशनात याबाबत सादर करण्यात आलेले संशोधन हे १.३ दशलक्ष लोकांचा अभ्यास करून मांडण्यात आले आहे. ‘ओ’ रक्तगट नसलेल्या एक हजार लोकांपैकी, पंधरा जणांना हृदयविकाराचा झटका आल्याचे दिसून आले आहे, तर ओ रक्तगट असलेल्या १००० पैकी १४ जणांना हृदयविकाराचा झटका आल्याचे दिसून आले. यात जोखमीचे प्रमाण तसे पाहिले तर फार थोडे आहे. ‘एबी’ रक्तगट असलेल्या व्यक्तींना हृदयविकाराच्या झटक्याची शक्यता २३ टक्के अधिक असते. असे असले तरी हृदयविकाराची शक्यता ही धूम्रपान, जास्त वजन व अनारोग्यकारक जीवनशैली यामुळे वाढते. ब्रिटनमध्ये ‘ओ’ रक्तगट असलेले ४८ टक्के लोक आहेत. माणसाचा रक्तगट हा ती व्यक्ती आई-वडिलांकडून कोणती जनुके घेते यावर अवलंबून असतो. नेदरलॅण्ड्समधील युनिव्हर्सिटी सेंटर ग्रॉनिंगेन या संस्थेच्या टेसा कोल यांनी हे संशोधन सादर केले आहे. त्यांच्या मते हृदयविकारात रक्तगटाचा विचार करणे महत्त्वाचे असते.