News Flash

हृदयातील झडपा : विकार व उपचार

आपल्या समाजामध्ये हृदयातील झडपांच्या विकाराचे प्रमाण मोठे आहे. मानवी हृदयामध्ये चार झडपा असतात. हृदयाच्या उजव्या कप्प्यामध्ये दोन आणि डाव्या कप्प्यामध्ये दोन.

हृदयातील झडपांना काही विकार झाल्यास ही रक्तप्रवाहाची साखळी बाधित होऊन हृदयावरती अतिरिक्त ताण येऊन ते निकामी होण्याचा धोका संभवतो.


आरोग्य

डॉ. सूरज चव्हाण – response.lokprabha@expressindia.com

आपल्या समाजामध्ये हृदयातील झडपांच्या विकाराचे प्रमाण मोठे आहे. मानवी हृदयामध्ये चार झडपा असतात. हृदयाच्या उजव्या कप्प्यामध्ये दोन आणि डाव्या कप्प्यामध्ये दोन. डाव्या बाजूला ऐरोटिक (Aortic) आणि मिट्रल (Mitral) असे दोन आणि उजव्या बाजूला पल्मिनरी (Pulmonary) आणि ट्रिक्युसाईड (Tricusyid) अशा दोन झडपा असतात. झडपा सर्वसाधारणपणे फुलाच्या पाकळ्यांप्रमाणे अगदी कोमल असतात. या झडपांचे कार्य कोणत्याही मशीन किंवा कारमध्ये असलेल्या झडपांप्रमाणेच (व्हॉल्व) असते. हृदयातील रक्ताचा प्रवाह एकाच दिशेने मार्गस्थ करणे हे त्यांचे मुख्य कार्य असते. हृदयातील रक्तप्रवाह उलटय़ा दिशेने होण्यास त्या प्रतिबंध करतात.

शरीरातील अशुद्ध रक्त हृदयाच्या उजव्या बाजूच्या वरील कप्प्यामध्ये एकत्रित जमा होते. ते नंतर उजव्या बाजूच्या खालील पंपिंग चेंबरमध्ये ढकलले जाते. तिथून ते फुप्फुसामध्ये जाते आणि तेथे त्यात ऑक्सिजन मिसळला जाऊन ते शुद्ध होते. हे शुद्ध रक्त डाव्या बाजूच्या वरील कप्प्यामध्ये जमा होते. तिथून ते डाव्या बाजूच्या खालील पंपिंग चेंबरमध्ये येऊन महारोहिणीद्वारे संपूर्ण शरीरामध्ये प्रवाहित केले जाते. या प्रत्येक दोन कप्प्यांमध्ये आणि त्यांना जोडल्या गेलेल्या मुख्य रक्तवाहिन्यांमध्ये झडपा असतात. या झडपांमुळेच वर सांगितलेल्या क्रमाने हृदयातील रक्तप्रवाह एकाच दिशेने अखंडित प्रवाहित होत असतो.

हृदयातील झडपांना काही विकार झाल्यास ही रक्तप्रवाहाची साखळी बाधित होऊन हृदयावरती अतिरिक्त ताण येऊन ते निकामी होण्याचा धोका संभवतो.

हृदयातील झडपांचे विकार हे साधारणपणे दोन प्रकारचे असतात.

स्टेनोटिक डिसिज (Stenotic Disease) : म्हणजेच यामध्ये झडपा आकाराने रुंद होऊन त्यामधून होणाऱ्या रक्तप्रवाहास अडथळा निर्माण करतात.

रेग्युर्गिटंट डिसिज (Regurgitant Disese) : या विकारामुळे झडपा पूर्णपणे बंद होऊ न शकल्याने रक्तप्रवाह उलटय़ा दिशेने प्रवाहित होऊन हृदयावरील ताण वाढवतात.

झडपांच्या विकाराची कारणे:

मुख्यत्वेकरून खालील कारणांमुळे हृदयातील झडपा खराब होतात.

झडपांचे जन्मजात विकार :

ज्यांच्या हृदयाच्या झडपा जन्मत:च कमकुवत असतात, अशा रुग्णांमध्ये रक्तप्रवाह उलटय़ा दिशेने होऊन हृदयावरील ताण वाढतो. अशा झडपा बंद झाल्यानंतर रक्तप्रवाह उलट न फिरू देण्याची जी ताकद नॉर्मल झडपांमध्ये असते ती या कमकुवत झडपांमध्ये नसते. जन्मत:च त्यांच्या रचनेमध्ये असलेल्या दोषांमुळे असे घडते.

रुमॅटिक हार्ट डिसीज:

हा विकार आपल्यासारख्या प्रगतिशील देशांमध्ये अजूनही भरपूर प्रमाणात दिसून येतो. प्रगत राष्ट्रांमध्ये मात्र झडपांचे हे विकार आढळत नाहीत. शाळकरी मुलांच्या घशातील जंतुसंसर्गावर नीट उपचार झाले नाहीत तर ते जंतू झडपांपर्यंत जाऊन तिथे संसर्ग निर्माण करतात. त्यामुळे ती झडप हळूहळू खराब होऊ लागते. असे आजार शक्यतो स्टेनोटिक प्रकारामध्ये मोडतात. स्त्रियांमध्ये त्यांचे प्रमाण अधिक आढळते.

डिजनरेटिव्ह व्हॉल्व्युलर हार्ट डिसिज (Degenerative Valvular Heart Disease) : वयोमानानुसार हृदयाच्या डाव्या बाजूच्या झडपा या तेथे असलेल्या उच्च रक्तदाबामुळे हळूहळू खराब होतात. मोठय़ा प्रमाणावर कॅल्शियम जमा झाल्याने त्या अरुंद होतात. या विकारामुळे रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो.

इन्फेक्टिव्ह इण्डोकार्डिटिस (Infective endocarditis): हृदयाच्या आतील आवरणास जंतुसंसर्ग झाल्यास तो झडपा खराब होण्यास कारणीभूत ठरतो.

हृदयविकाराच्या झटक्यानंतर हृदयातील काही भाग कमकुवत होतो. त्यामुळे हृदयातील झडपा लीक होऊ शकतात.

रुग्णातील लक्षणे :

दम लागणे : रुग्णास काही अंतर चालल्यास तसेच काही अंगमेहनतीची कामे केल्यास दम लागतो. वेळीच उपचार न केल्यास हे अंतर कमी कमी होत जाऊन रुग्ण अगदी घरातल्या घरात जरी चालला तरी दम लागतो. दिवसेंदिवस त्याच्या हृदयावरील ताण वाढत जातो.

छातीमध्ये वेदना होणे.

पायांवर सूज येणे.

वारंवार चक्कर येणे : झडपा अरुंद झाल्याने मेंदूला होणारा रक्तपुरवठादेखील कमी होतो. त्यामुळे असे प्रकार घडू शकतात.

छातीमध्ये धडधड जाणवणे : अशा रुग्णांमध्ये हृदयाचा आकार वाढल्याने हृदयाचे ठोके अनियमित होतात. ज्यामुळे रुग्णास छातीमध्ये धडधड झाल्यासारखे जाणवते.

निदान :

वरील लक्षणे घेऊन येणाऱ्या रुग्णाला तपासल्यानंतर त्याला झडपांचा आजार असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात येते. रुग्णास स्टेथॅस्कोपच्या साहाय्याने तपासल्यास  झडपांच्या विकारानुसार काही विशिष्ट आवाज (Murmur) ऐकू येतात. त्यातून प्राथमिक निदान करता येते. खालील तपासण्या केल्यावर झडपांच्या विकारांचे खात्रीलायक निदान करता येते.

ईसीजी : ईसीजीमुळे रुग्णाच्या नाडीतील बदल तसेच अतिरिक्त ताणामुळे हृदयाच्या कोणत्या कप्प्याचे आकारमान वाढलेले आहे याचा अंदाज येतो.

छातीचा एक्स-रे : यामध्ये हृदयाच्या आकारामध्ये झालेले बदल बघता येतात आणि त्याप्रमाणे कोणती झडप खराब झाली आहे याचा अंदाज येतो.

टू डी इको : ही झडपांच्या आजाराचे रोगनिदान निश्चित करणारी सर्वात महत्त्वाची चाचणी आहे. यामध्ये आपणास खालील माहिती मिळते.

  • – कोणती झडप किती प्रमाणात खराब झाली आहे, ती किती प्रमाणात अडथळा निर्माण करते किंवा किती प्रमाणात लीक आहे हे कळते.
  • – हृदयाचा प्रत्येक कप्पा आणि हृदयाशी संलग्न असणाऱ्या सर्व महत्त्वाच्या रक्तवाहिन्यांच्या आकारमानाचा अंदाज येतो.
  • – हृदयाच्या कप्प्यामध्ये रक्ताची गुठळी झाली आहे का आणि तिचे आकारमान किती आहे हे कळते.
  • – पूर्ण हृदयाची कार्यक्षमता किती आहे याचा अंदाज येतो.

पल्मिनरी हायपरटेंशन (Pulmondary Hypertension) :  हृदयातील झडपांच्या विकारामुळे रुग्णाच्या फुफ्फुसावर ताण येतो. तो किती वाढला आहे याचा इकोमुळे अंदाज येतो.

कोरोनरी अँजिओग्राफी (Coronary Angiography) : ४० वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्या, झडपांचे विकार असलेल्या रुग्णांची झडप खूप मोठय़ा प्रमाणावर लीक होत असेल तर अशा रुग्णांना कोरोनरी अँजिओग्राफीचा सल्ला दिला जातो. कधी कधी चाळिशीच्या आतील रुग्णांमध्ये देखील हा विकार उद्भवू शकतो. त्यात हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे आहेत का हे तपासले जाते. अडथळे आढळल्यास झडपांच्या शस्त्रक्रियेच्या वेळीच बायपास शस्त्रक्रिया करून हे अडथळे दूर करणे सहज शक्य होते.

कार्डिअ‍ॅक एमआरआय (Cardic MRI) : हृदयाच्या झडपांच्या विकारासंबंधी आणखी जास्त बारकाईने माहिती आवश्यक असल्यास या तपासणीचा सल्ला दिला जातो.

सीटी अँजिओग्राफी (CT Angiography) : काही रुग्णांमध्ये जन्मत:; संपूर्ण शरीरातील मांसपेशींमधील लवचीकता खूप वाढलेली असते. (Marfans Syndrome) अशा वेळी हृदयातील झडपा लीक होतात आणि त्याबरोबरच हृदयाशी संलग्न असणाऱ्या महारोहिणीचा (Aorta) आकारदेखील प्रचंड वाढतो. अशा रुग्णांमध्ये झडपेसोबत महारोहिणीचा हृदयाशी संलग्न असणारा सुरुवातीचा भाग (Ascendinr Aorta)  देखील बदलणे आवश्यक असते, त्यावेळी झडप तसेच आणि महारोहिणीविषयी आवश्यक सर्व माहिती या चाचणीद्वारे समजते आणि अशा प्रत्येक रुग्णास ही तपासणी करण्याचा सल्ला दिला जातो.

उपचार :

हृदयातील झडपांचा विकार सौम्य असेल तर तो औषधोपचारानेच बरा होऊ शकतो किंवा शस्त्रक्रिया शक्य तितकी लांबणीवर टाकता येऊ शकते. अशा रुग्णांना औषधोपचार करताना खालील औषधांचा वापर केला जातो.

हार्ट रेट कंट्रोलिंग एजंट्स (Heart Rate Controling Agents) हृदयाचे ठोके नियंत्रित करण्यासाठी ही औषधे वापरली जातात.

Self Diuretics : हृदय आणि फुप्फुसावरील ताण कमी करण्यासाठी यांचा वापर होतो.

अँटिकोगुलंट (Anticoagulant) : हृदयातील झडपांचा आकार अरुंद झाल्याने रक्तप्रवाहास अडथळा निर्माण होऊन हृदयाच्या काही कप्प्यांमध्ये रक्ताची गुठळी निर्माण होण्याचा धोका संभवतो. तसेच हृदयाची गती अनियमित असल्यासदेखील असा प्रकार घडू शकतो. अशी गुठळी हृदयातून सटकून शरीराच्या इतर कोणत्याही अवयवांमध्ये अडकल्यास तो अवयव निकामी होण्याची शक्यता बळावते. ही शक्यता लक्षात घेऊन रुग्णाचे रक्त काही प्रमाणात पातळ ठेवण्याचे काम वरील औषधे करतात. त्यामुळे हृदयातील कप्प्यांमध्ये रक्ताची गुठळी होण्यास अटकाव होतो.

झडपांच्या गंभीर स्वरूपाच्या विकारासाठी शस्त्रक्रिया करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. या शस्त्रक्रिया खालील प्रकारच्या असतात.

बलून व्हाल्व्होटॉमी (Balloon Valvotomy) : झडपा अरुंद झाल्या असतील आणि त्यावर फार कॅल्शियम जमा झाले नसले तर वरील उपचाराचा सल्ला दिला जातो. त्यामध्ये रुग्णाच्या मांडीमध्ये सुई टोचून एका कॅथेटरद्वारे तेथील रक्तवाहिनीमार्फत हृदयातील झडपेपर्यंत पोहोचून एका बलूनच्या मदतीने ती फुगवून झडप मोठी केली जाते.

ओपन हार्ट सर्जरी : या प्रकारामध्ये शस्त्रक्रिया करून हृदय उघडले जाते आणि त्यावर खालील प्रकारे शस्त्रक्रिया केल्या जाऊ शकतात.

क्लोज्ड मायट्रल व्हॉल्व्होटॉमी (Closed Mitral Valvotomy) : या प्रकारामध्ये हृदय छातीच्या बाजूकडून उघडले जाते आणि चालू हृदयावरच झडप मोठी करण्याची शस्त्रक्रिया केली जाते.

व्हॉल्व्ह रिपेअर (Valve Repair) : यामध्ये हार्ट लंग मशीनच्या साहाय्याने हृदय पूर्णपणे बंद केले जाते आणि रुग्णाची झडप दुरुस्त केली जाते. या शस्त्रक्रियेचा रुग्णासाठी मुख्य फायदा म्हणजे रुग्णाची नैसर्गिक झडपच कायम राहते आणि नवीन कृत्रिम झडप न टाकल्याने रुग्णास रक्त पातळ होण्याची गोळी घ्यावी लागत नाही. त्यापासूनच्या संभाव्य धोक्यांपासून रुग्णाचा बचाव होतो.

व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट (Valve Replacement) : रुग्णाची झडप  दुरुस्त करण्यापलीकडे खराब झाली असेल तर ती बदलण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही. या शस्त्रक्रियेमध्येदेखील वरील शस्त्रक्रियेप्रमाणे हृदय बंद केले जाते आणि खराब झालेला झडप काढून त्याजागी कृत्रिम झडप बसवितात. ही झडप धातूपासून (Metallic Valve) तयार केलेली असते किंवा प्राण्याची झडप (Bioprosthetic or Tissue Valve) देखील बसविता येते. धातूपासून केलेली झडप बसविल्यास रुग्णास रोज रक्त पातळ होण्याची गोळी घ्यावी लागते. रुग्णाचे लिंग, वय, इतर आजार यांचा विचार करून कोणती झडप बसविणे गरजेचे आहे याचा निर्णय घेतला जातो.

तावी (TAVI) : ही आधुनिक व्हॉल्व्ह रिप्लेसमेंटची शस्त्रक्रिया आहे. यामध्ये ओपन हार्ट सर्जरी करायची आवश्यकता नसते. रुग्णाच्या मांडीमध्ये सुई टाकून कॅथेटरच्या साहाय्याने रक्तवाहिनीद्वारे खराब झडपेच्या जागेवर कृत्रिम झडप बसवली जाते. ही शस्त्रक्रिया अगदी वृद्ध रुग्णांसाठी फार महत्त्वाची शस्त्रक्रिया आहे.

झडपांच्या विकाराचे रुग्ण तज्ज्ञांकडे लवकर आल्यास त्यांना शस्त्रक्रियेविना बरीच  वर्षे आयुष्य चांगल्या प्रकारे जगता येते. वेळीच योग्य मार्गदर्शन घेतल्यास योग्य ती शस्त्रक्रिया करून आणि आवश्यकता पडल्यास योग्य ती कृत्रिम झडप (व्हॉल्व) बसवून रुग्ण निरोगी जीवनाचा आनंद घेताना पाहावयास मिळतात. पण रुग्णाने शस्त्रक्रियेनंतर निष्काळजी न राहता  वेळोवेळी तज्ज्ञांचा सल्ला घेणेही तितकेच आवश्यक आहे.

सौजन्य – लोकप्रभा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 19, 2021 4:35 pm

Web Title: heart valve heart valve disease treatment cardiac arrest heart failure heart attack cardiac surgeon heart surgeon arogya dd 70
Next Stories
1 झुरळांपासून सुटका करुन घेण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय नक्की करुन पाहा
2 स्वस्तात Poco X3 PRO खरेदी करण्याची आज संधी, जाणून घ्या सविस्तर
3 स्वस्त झाला ‘जंबो बॅटरी’चा दमदार Samsung Galaxy M21, जाणून घ्या नवीन किंमत आणि फिचर्स
Just Now!
X